“जिथे कुठे आम्ही जातो, तिथे एकत्रच जातो,’’ आपल्या शेजारी उभ्या असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे - सकुनीकडे आपलेपणाने बघत गीता देवी सांगते.

जवळच्या जंगलात जाऊन या दोघी साल (शोरिया रोबस्टा) वृक्षाची पानं गोळा करतात. त्यापासून द्रोण आणि ताटल्या तयार करून पलामू जिल्हयाचं मुख्यालय असलेल्या डाल्टनगंज शहरात नेऊन विकतात.

गेल्या तीस वर्षांपासून गीता आणि सकुनी देवी या एकमेकींच्या शेजारणी आहेत. कोपे गावातल्या नादीटोला या लहानशा पाड्यात त्या राहतात. झारखंड राज्यातल्या इतर बहुतेकांसारख्या गीता आणि सकुनीसुद्धा आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून आहेत.

त्यांचे सात - आठ तास जंगलात जातात. गुरं चरून घरी जायला निघाली की त्या माघारी फिरतात. पुरेशी पानं गोळा करण्यासाठी त्यांना साधारण दोन दिवस लागतात. वेळ भुर्रकन निघून जातो, अधेमधे त्या थोडी विश्रांती घेतात, आपल्या घरच्यांबद्दल, आसपासच्या घटनांबद्दल गप्पा मारतात.

‘निघालीये...’ दररोज सकाळी आपल्या शेजारणीचा हा आवाज कानावर येण्याची वाट गीता बघत असते. काही क्षणात दोघी घराबाहेर पडतात. प्रत्येकीकडे आपली आपली एक जुन्या सिमेंटच्या पोत्यापासून बनवलेली पिशवी, पाण्याची प्लास्टिकची बाटली, एक छोटी कुऱ्हाड आणि एखादं जुनंपानं कापड असतं. झारखंडमधल्या पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील हेहेगरा जंगलाच्या दिशेने त्या चालू लागतात.

या दोघी मैत्रिणी वेगवेगळ्या समुदायाच्या आहेत - गीता भुईया दलित आहे आणि सकुनी उराव आदिवासी समुदायाची आहे. चालता चालता गीता सावधानतेचा इशारा देते : “इथे एकटं येऊ नकोस,’’ ती सांगते, “कधी कधी जंगली जनावरंही दिसतात. बिबटेही आमच्या नजरेस पडलेत.’’ साप आणि विंचवांचाही धोका वाढलाय आणि सकुनी पुढे सांगते, “अनेकदा आम्हाला हत्तींचा सामना करावा लागलाय.’’ २०२१च्या वन्यजीव गणनेनुसार पलामू व्याघ्र प्रकल्पात ७३ बिबटे आणि २६७ हत्ती आहेत.

Sakuni (left) and Geeta Devi (right), residents of Kope village in Latehar district, have been friends for almost three decades. They collect sal leaves from Hehegara forest and fashion the leaves into bowls and plates which they sell in the town of Daltonganj, district headquarters of Palamau
PHOTO • Ashwini Kumar Shukla
Sakuni (left) and Geeta Devi (right), residents of Kope village in Latehar district, have been friends for almost three decades. They collect sal leaves from Hehegara forest and fashion the leaves into bowls and plates which they sell in the town of Daltonganj, district headquarters of Palamau
PHOTO • Ashwini Kumar Shukla

लातेहार जिल्ह्यातल्या कोपे गावच्या रहिवासी असलेल्या सकुनी (डावीकडे) आणि गीता देवी (उजवीकडे) या जवळपास तीन दशकांपासूनच्या मैत्रिणी. हेहेगरा जंगलातून त्या सालाची पानं गोळा करतात. त्यापासून द्रोण, ताटल्या अशा वस्तू तयार करून पलामूचं जिल्हा मुख्यालय असलेल्या डाल्टनगंज शहरात नेऊन विकतात

धुकं भरलेल्या थंडीतली सकाळची वेळ आहे. वयाच्या पन्नाशीत असलेल्या गीता आणि सकुनी यांनी उबेसाठी अंगावर फक्त हलकी शाल ओढलीय. लातेहार जिल्ह्यामधल्या मनिका तालुक्यातल्या त्यांच्या घराजवळून वाहणारी औरंगा नदी त्या सगळ्यात आधी पार करतात. हिवाळ्यात पाणी कमी असतं तेव्हा त्या सहज चालत नदी ओलांडतात; पण पावसाळ्यात बऱ्याचदा गळ्यापर्यंत चढलेलं पाणी कापत किनारा गाठावा लागतो.

एकदा दुसरा किनारा गाठला की, पुढे ४० मिनिटं चालावं लागतं- त्यांच्या चपलांच्या टक टक टक अशा लयबद्ध आवाजाने जंगलातली शांतता भंग पावते. मोहाच्या (मधुका लोंगिफोलिया) एका मोठ्या वृक्षाच्या दिशेने त्या चालत निघाल्या आहेत. हे झाड म्हणजे साल वृक्षांनी नटलेल्या या भागासाठीचा मैलाचा दगडच!

“आता जंगल पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी अगदी घनदाट होतं... इथपर्यंत यावं लागायचं नाही आम्हाला,’’ सकुनी सांगते. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०२२ या काळात झारखंडने ५.६२ किलो हेक्टर वृक्षक्षेत्र गमावलं.

काही दशकांपूर्वीच्या जंगलातल्या भटकंतीची आठवण सांगताना सकुनी म्हणते, “कधीही पाहा, ३०-४० लोक जंगलात असायचे. आता त्यात प्रामुख्याने गुरंढोरं आणि शेळ्यांचे गुराखी तसंच लाकूडफाटा गोळा करायला आलेले लोक असतात.’’

गीता सांगते, अगदी चार वर्षांपूर्वीही हे हस्तकलेचं काम अनेक महिला करत होत्या. पण उत्पन्न अगदीच कमी; त्यांना हे काम सोडावं लागलं. आता ज्या उरल्यासुरल्या महिला हे हस्तकलेचं काम करतात, त्यात या दोघी मैत्रिणी आहेत.

विकण्यासाठी लाकूड गोळा करायला आता बंदी आहे, त्यामुळेही महिला या कामातून बाहेर पडल्यात. “२०२०मध्ये लॉकडाऊनच्या काळात हे थांबलं,’’ सकुनी सांगते. झारखंड सरकारने सुरुवातीला लाकूड गोळा करण्यावर शुल्क आकारलं आणि नंतर ते मागे घेतलं. तरीसुद्धा सुकं लाकूड विकायचं असेल तर अजूनही शुल्क भरावं लागतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

In the area known as Naditola, Geeta lives with her large family of seven and Sakuni with her youngest son (right) Akendar Oraon
PHOTO • Ashwini Kumar Shukla
In the area known as Naditola, Geeta lives with her large family of seven and Sakuni with her youngest son (right) Akendar Oraon
PHOTO • Ashwini Kumar Shukla

नादिटोला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात गीता आपल्या सात जणांच्या मोठ्या कुटुंबासह आणि सकुनी (उजवीकडे) अकेंदर उराव या तिच्या धाकट्या मुलासोबत राहते

आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी या मैत्रिणी जंगलात पानं गोळा करत भटकतात. विशीत असताना सकुनीने या कामाला सुरुवात केली. ती सांगते, “लहान होते, तेव्हाच माझं लग्न झालं. आणि दारुडा नवरा जेव्हा सोडून गेला, तेव्हा सकुनीला स्वतःचा आणि तिच्या तीन मुलांचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग शोधावा लागला. “फारकमी काम (उपलब्ध) होतं,’’ ती सांगते, “पानं आणि दातून विकून मी माझ्या मुलांचा सांभाळ केला.’’

आपला १७ वर्षांचा धाकटा मुलगा अकेंदर उराव याच्या सोबत सकुनी आता दोन खोल्यांच्या कच्च्या घरात राहते. तिच्या दोन मोठ्या मुलांचं लग्न झालंय. ती कोपे या गावातच स्वतंत्र बिऱ्हाड करून राहतात.

सकुनीच्या घरापासून काही घरं सोडून गीताचं मातीचं घर आहे. तिथे ती आपल्या सात जणांच्या मोठ्या कुटुंबासोबत राहते - एक मुलगी, तीन मुलं, एक सून आणि दोन नातवंडं. पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं. गीताची धाकटी २८ वर्षांची मुलगी उर्मिला देवीसुद्धा द्रोण विकते. पण आपल्या मुलीचं काही वेगळं भविष्य असावं असं गीताला वाटतं. “मी माझ्या मोठ्या मुलीचं लग्न एका गरीब कुटुंबात लावून दिलं. धाकट्या मुलीबाबत मात्र असं करणार नाही. गरज पडली तर मी हुंडा देईन,’’ गीता सांगते.

सात भावंडांमधली सगळ्यात धाकटी गीता. लहानपणापासून कामाला जुंपली गेल्यामुळे ती कधीच शाळेत गेली नाही. “मी शाळेत गेले असते तर घरची कामं करायला कोण होतं?’’ ती विचारते. तिचा दिवस आताही भल्या पहाटे चारच्या सुमारास सुरू होतो. जंगलात जाण्यापूर्वी ती स्वयंपाक व साफसफाई उरकते, गुरांना (एक गाय आणि दोन बैल) चरायला सोडते. तिच्या मैत्रिणीचीही दिनचर्या अशीच आहे. पण गीताची सून जशी घरकामाला हातभार लावते, तसं सकुनीच्या मदतीला कुणीच नाही.

*****

बफर झोनमध्ये पोहोचल्यानंतर दोघी आपापली पिशवी खाली ठेवतात. या थंडीतल्या सकाळीच्या वेळीही चालून चालून त्यांना घाम फुटलाय. कपाळ आणि मानेवरून ओघळणारा घाम त्या आपल्या पदराच्या टोकाने पुसतात.

कामाला सुरुवात करण्यापूर्वी सोबत आणलेल्या जुन्या कापडाची टोकं त्या तात्पुरत्या पिशवीला बांधतात. त्यात त्या गोळा केलेली पानं ठेवतील. पदर कंबरेला खोचून आणि पिशवी खांद्याला अडकवून त्या आता काम सुरू करायला तयार आहेत.

Every morning, Sakuni and Geeta cross the Auranga river near their home and make their way on foot to the forest. Even four years ago, there were many women involved in the craft of dona and pattal -making, but poor earnings has deterred them from continuing. The friends are among the last women in their village still engaged in this craft
PHOTO • Ashwini Kumar Shukla
Every morning, Sakuni and Geeta cross the Auranga river near their home and make their way on foot to the forest. Even four years ago, there were many women involved in the craft of dona and pattal -making, but poor earnings has deterred them from continuing. The friends are among the last women in their village still engaged in this craft
PHOTO • Ashwini Kumar Shukla

रोज सकाळी सकुनी आणि गीता घराजवळची औरंगा नदी ओलांडून पायी जंगलात जातात. अगदी चार वर्षांपूर्वीही हे द्रोण व ताटल्या बनवायचं हस्तकलेचं काम अनेक महिला करत होत्या. पण उत्पन्न अगदीच कमी; त्यामुळे त्यांना हे काम सोडावं लागलं. आता ज्या उरल्यासुरल्या महिला हे हस्तकलेचं काम करतात, त्यात या दोघी मैत्रिणी आहेत

The two women also cut and collect branches of the sal tree which they sell as datwan( a stick to clean teeth), sometimes with help from family members . One bundle of datwan costs 5 rupees. 'People don’t even want to pay five rupees for the datwan. They bargain,' says Sakuni
PHOTO • Ashwini Kumar Shukla
The two women also cut and collect branches of the sal tree which they sell as datwan( a stick to clean teeth), sometimes with help from family members . One bundle of datwan costs 5 rupees. 'People don’t even want to pay five rupees for the datwan. They bargain,' says Sakuni
PHOTO • Ashwini Kumar Shukla

दात साफ करण्यासाठीची कांडी अर्थात दातून म्हणून विकल्या जाणाऱ्या सालाच्या झाडाच्या डहाळ्या कापून गोळा करण्याचं कामही या दोघी कधी कधी घरच्यांच्या मदतीने करतात. दातूनचं एक बंडल ५ रुपयाला पडतं. “लोकांना दातूनसाठी पाच रुपयेसुद्धा द्यायचे नाहीयेत. त्यातही ते सौदा करतात,’’ सकुनी सांगते

डाव्या हाताने फांदी पकडून उजव्या हाताने मोठी, लांब गोलसर पानं त्या तोडतात. “या झाडावर मट्ट्या (लाल मुंग्या) आहेत, जरा सांभाळून!,’’ सकुनी आपल्या मैत्रिणीला सावध करते.

“आम्ही चांगली पानं शोधतो, कमी छिद्रं असणारी,’’ आपल्या पिशवीत काही पानं ठेवता ठेवता गीता सांगते. ती पानं त्या खालच्या फांद्यांवरून तोडतात, पण पानं उंचावर असली तर झाडावर चढून कुऱ्हाडीने पानं तोडावी लागतात.

सालाची झाडं सहसा हळूहळू वाढत जवळपास १६४ फुटांपर्यंत पोहोचतात. या जंगलात मात्र सालाची झाडं लहान असतात साधारण ३०-४० फूट उंचीची!

सकुनी साधारण १५ फूट उंचीच्या एका झाडावर चढायच्या तयारीत आहे. ती आपली साडी उचलून गुडघ्यांमधे गुंडाळते. गीता तिच्या हातात कुऱ्हाड देते आणि एका फांदीकडे बोट दाखवत म्हणते, “ती काप.’’ डहाळ्या आता एकसारख्या लांबीपर्यंत कापल्या जातील आणि दात स्वच्छ करण्यासाठीची कांडी म्हणून वापरल्या जातील. या दातून कांड्यासुद्धा या दोघीजणी विकतात.

“ती योग्य जाडीची असावी,’’ एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे जाताना कुऱ्हाडीने आपल्या मार्गातली झुडपं साफ करता करता गीता म्हणते, “सालाच्या डहाळ्या खूप चांगल्या असतात, कारण त्या लवकर वाळत नाहीत. १५ दिवसही त्या ठेवता येतात.’’

पानं आणि डहाळ्या गोळा करणं हे सोपं काम नाही. “हिवाळा हा त्यासाठी सगळ्यात अवघड महिना! आमचे हात बधीर होऊन जातात,’’ असं सांगून गीता पुढे म्हणते, “कुऱ्हाड घट्ट पकडली की माझे हात दुखून येतात.’’

They collect leaves for 7-8 hours a day, twice a week. T his time, on the second day, they are joined by Geeta's son Ajit and daughter-in-law Basanti (right) who have brought along their baby. If the baby cries, the three of them take turns soothing her
PHOTO • Ashwini Kumar Shukla
They collect leaves for 7-8 hours a day, twice a week. T his time, on the second day, they are joined by Geeta's son Ajit and daughter-in-law Basanti (right) who have brought along their baby. If the baby cries, the three of them take turns soothing her
PHOTO • Ashwini Kumar Shukla

आठवड्यातून दोनदा दिवसातून साताठ तास त्या पानं गोळा करतात. यावेळेला दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत गीताचा मुलगा अजित आणि सून बसंती (उजवीकडे) आपल्या बाळाला घेऊन आले आहेत. बाळ रडलं तर तिघंही आळीपाळीने बाळाला जोजवतात

Left: Eight years ago, Ajit migrated to Punjab, where he works as a daily wage labourer, earning Rs. 250 a day.
PHOTO • Ashwini Kumar Shukla
Right:  Work stops in the evening when they spot the cattle heading home after grazing. On the third day, Geeta and Sakuni return to the forest to collect the sacks and make their way to Hehegara station from where they catch a train to Daltonganj
PHOTO • Ashwini Kumar Shukla

डावीकडे: आठ वर्षांपूर्वी अजित ने पंजाबला स्थलांतर केलं . तिथे तो रोजंदारीवर आहे . दिवसाला २५० रुपये कमवतो. उजवीकडे: संध्याकाळी गुरं चरून घरी परतताना दिसल्यावर काम थांबत . तिस ऱ्या दिवशी गीता आणि सकुनी त्यांच्या भरलेल्या पिशव्या आण ण्यासाठी जंगलात परततात. मग हेहेगरा स्थानका कडे जायला जातात. ति थून त्या डाल्टनगंजला जाणारी रेल्वे पकडतात

एप्रिल-मे महिन्यात नवी पालवी फुटण्याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सालाची पानगळ होते. तेव्हा त्यांचं काम थांबतं. या काळात सकुनी मोहाची फळं गोळा करतात. या वर्षाच्या सुरुवातीला (२०२३) त्यांनी जंगलातून १०० किलो मोह गोळा केला आणि तो सुकवून स्थानिक व्यापाऱ्याला ३० रुपये किलो दराने विकला. मोहाच्या हिरव्या फुलाचा वापर दारू बनवण्यासाठी केला जातो आणि त्याच्या फळाच्या बियांपासून खाद्यतेल काढलं जातं.

या काळात गीता मात्र काही कमावत नाही. स्थलांतरित मजूर म्हणून काम करणाऱ्या तिच्या तीन मुलांच्या उत्पन्नातून या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या घरचं मोहाचं झाड त्यांच्या घरच्या गरजा भागवतं.

*****

जंगलातल्या तीन दिवसांच्या मजुरीनंतर गीता आणि सकुनी यांच्याकडे पुरेशी पानं आणि डहाळ्या आहेत. डाल्टनगंजला नेण्यासाठी त्या त्यांच्या भरलेल्या पिशव्या गोळा करतात. अंदाजे ३० किलो वजनाच्या पिशव्या उचलून चालत त्या तीस मिनिटात हेहेगरा रेल्वे स्थानकावर पोहोचतात. गीता हसत म्हणते, “यावेळी मी जास्त दातून घेतलंय.’’ त्यांच्या पाठीवरच्या पिशव्यांमध्ये भरीला आता एक उबदार घोंगडीसुद्धा आहे.

हेहेगरा स्टेशनवर एकीला एका झाडाखालची जागा सापडते आणि दुपारी बाराच्या लोकलची वाट पाहत त्या थांबतात. ही लोकल त्यांना डाल्टनगंजला घेऊन जाईल.

“पट्टा – दातून विकणाऱ्यांना तिकिट काढावं लागत नाही,’’ रेल्वेच्या दरवाज्याशेजारील सीटवर आपलं सामान ठेवत सकुनी सांगते. या धीम्या पॅसेंजर रेल्वेला ४४ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तीन तास लागतात. “सगळा दिवस नुसता प्रवासात वाया गेला,’’ नि:श्वास टाकत सकुनी सांगते.

गाडी पुढे जाऊ लागते आणि गीता आपल्या २.५ एकर जमिनीबद्दल बोलायला लागते. त्या जमिनीवर ती पावसाळ्यात भात, मका आणि हिवाळ्यात गहू, सत्तू आणि हरभरा घेते. “यावर्षी भात चांगला झाला नाही, पण आम्ही २५० किलो मका ५,००० रुपयांना विकला,’’ ती सांगते.

सकुनी देवीकडे अंदाजे एकरभर जमीन आहे. त्यावर ती खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेती करते. “यावेळी मी काहीच पिकवलं नाही. भाताची पेरणी केली, पण काही उगवलंच नाही,’’ ती सांगते.

Carrying the loads on their heads, the two women walk for around 30 minutes to get to the station. The slow passenger train will take three hours to cover a distance of 44 kilometres. 'A whole day wasted on the journey alone,' Sakuni says
PHOTO • Ashwini Kumar Shukla
Carrying the loads on their heads, the two women walk for around 30 minutes to get to the station. The slow passenger train will take three hours to cover a distance of 44 kilometres. 'A whole day wasted on the journey alone,' Sakuni says
PHOTO • Ashwini Kumar Shukla

डोक्यावर ओझ घेऊन दोघीजणी साधारण अर्धा तास पायी चालत स्टेशनवर पोहोचता त. धीम्या पॅसेंजर रेल्वे ला ४४ किलोमीटरच अंतर कापायला तीन तास लाग तात . सकुनी म्हण ते, गळा दिवस नुसता प्रवासात वाया गेला

On the train, Geeta and Sakuni Devi talk about farming. Geeta owns 2.5 acres of land where she cultivates paddy and maize during the monsoons and wheat, barley and chickpeas during winter. Sakuni Devi owns around an acre of land, where she farms in both kharif and rabi seasons. While they chat, they also start making the donas
PHOTO • Ashwini Kumar Shukla
On the train, Geeta and Sakuni Devi talk about farming. Geeta owns 2.5 acres of land where she cultivates paddy and maize during the monsoons and wheat, barley and chickpeas during winter. Sakuni Devi owns around an acre of land, where she farms in both kharif and rabi seasons. While they chat, they also start making the donas
PHOTO • Ashwini Kumar Shukla

रेल्वेत गीता आणि सकुनी देवी त्यांच्या शे ता बद्दल सांग तात. गीताकडे अडीच एकर शेती असून त्या पावसाळ्यात भात, मका आणि हिवाळ्यात गहू , सत्तू आणि हरभरा पिकवतात. सकुनी देवीकडे साधारण एक एकर जमीन आहे , त्यावर त्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेती करतात. गप्पा मारता मारता दुसरीकडे त्या दोना म्हणजेच द्रोणही बन वायला घे तात

गप्पा मारताना त्यांचे हात द्रोणाला आकार देऊ लागतात. एकावर एक अशी चार-सहा पानांची मांडणी करून बांबूच्या धाग्याने त्या दोना शिवतात. गुळगुळीत पानं अनेक वेळा दुमडली तरी तुटत नाहीत, त्यामुळे त्यापासून ताटल्याही तयार होतात. “पान मोठं असेल तर दोन पानांपासून एक दोना बनवता येतो. नाहीतर एकाला चार - सहा पानं लागतात,’’ सकुनी सांगते.

पानांच्या कडा दुमडून त्यांना गोलाकार दिला जातो. त्यामुळे त्यात जेवण वाढलं गेल्यावर ते बाहेर येत नाही.  गीता देवी सांगते, “आम्ही त्यात पातळ आमटी घातली तरी ती सांडत नाही.’’

१२ द्रोणांचं एक बंडल चार रुपयांना विकलं जातं आणि प्रत्येक बंडलमध्ये अंदाजे ६० पानं असतात. सुमारे १५०० पानं तोडणं, त्यांना आकार देणं आणि त्यांची वाहतूक करणं यातून कमाई होते १०० रुपये!

या बायका १०-१० ची बंडल बनवून दातून आणि पोला (सालाची पानं) विकतात. त्यांची किंमत अनुक्रमे पाच आणि दहा रुपये आहे. “दातूनसाठी पाच रुपये द्यायलाही लोक खळखळ करतात. त्यातही ते सौदा करतात,’’ सकुनी सांगतात.

संध्याकाळी ५ वाजता गाडी डाल्टनगंजला पोहोचते. स्टेशनच्या बाहेर रस्त्याच्या कडेला गीता जमिनीवर निळ्या रंगाची पॉलिथिनची चादर पसरवते आणि दोघी पुन्हा द्रोण बनवायला घेतात. या दोघी ताटल्यांचीही ऑर्डर घेतात. एक थाळी तयार करण्यासाठी १२-१४ पानं लागतात आणि तशी थाळी त्या प्रत्येकी एक ते दीड रुपयाला विकतात.

गृहप्रवेश, नवरात्रोत्सव किंवा मंदिरातल्या अन्नवाटपासाठी त्यांचा उपयोग केला जातो. १०० किंवा त्याहून अधिक ताटल्यांच्या मोठ्या ऑर्डरसाठी अनेकजण एकत्र येतात.

Outside Daltonganj station, Geeta spreads a blue polythene sheet on the ground and the two resume the task of crafting donas. The women also take orders for pattals or plates. Their 'shop' is open 24x7 but they move into the station at night for safety. They will stay here until all their wares are sold
PHOTO • Ashwini Kumar Shukla
Outside Daltonganj station, Geeta spreads a blue polythene sheet on the ground and the two resume the task of crafting donas. The women also take orders for pattals or plates. Their 'shop' is open 24x7 but they move into the station at night for safety. They will stay here until all their wares are sold
PHOTO • Ashwini Kumar Shukla

डाल्टनगंज स्थानकाच्या बाहेर गीता जमिनीवर निळ्या रंगाची पॉलिथिनची चादर पसरवते आणि दोघी पुन्हा द्रोण बनवायला घेतात. या दोघी ताटल्यांचीही ऑर्डर घेतात. त्यांचं ‘दुकान’ चोवीस तास उघडं असतं, पण सुरक्षिततेसाठी त्या रात्री स्थानकात जातात. जोपर्यंत त्यांचा सगळा माल विकला जात नाही तोपर्यंत त्या तिथेच थांबतात

Left: Four to six leaves are arranged one upon the other and sewn together with strips of bamboo to make the dona . They fold the edges to create a circular shape so that when food is served, it won’t fall out. A bundle of 12 donas sells for four rupees.
PHOTO • Ashwini Kumar Shukla
Right: Bundles of datwan are bought by passengers from the night train.
PHOTO • Ashwini Kumar Shukla

एकावर एक अशी चार-सहा पानांची मांडणी करून बांबूच्या धाग्याने त्या द्रोण शिवतात. पानांच्या कडा दुमडून ती गोल वळवली जातात. त्यामुळे त्यात जेवण वाढलं गेल्यावर ते बाहेर येत नाही. १२ द्रोणांचं एक बंडल चार रुपयांना विकलं जातं.  उजवीकडे : रात्रीच्या गाडीचे प्रवासी दातूनचं बंडल विकत घेतात

सगळा माल खपेपर्यंत गीता आणि सकुनी देवी इथेच राहतील. “कधीकधी यासाठी एकापेक्षा जास्त दिवस लागू शकतात, आठवडा लागू शकतो,’’ सकुनी सांगतात, “जर इतर द्रोण विक्रेतेही दिसले तर...’’ अशा प्रसंगी निळ्या रंगाची पॉलिथीनची चादर रात्रीसाठी त्यांचं तात्पुरतं अंथरूण बनते आणि त्यांनी नेलेली घोंगडीही कामी येते. जर जास्त दिवस थांबावं लागलं तर त्या दिवसातून दोनदा सत्तू (चण्याची लापशी) खातात आणि दररोज ते विकत घेण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये खर्च करतात.

त्यांचे ‘दुकान’ चोवीस तास उघडं असतं आणि रात्रीच्या गाडीचे प्रवासी त्यांच्याकडून दातून विकत घेतात. संध्याकाळी गीता आणि सकुनी स्टेशनमध्ये जातात. डाल्टनगंज हे एक लहानसं शहर आहे आणि इथलं स्टेशन हे एक सुरक्षित आश्रयस्थान आहे.

*****

तीन दिवसांनी गीताने द्रोणांची ३० बंडल आणि दातूनची ८० बंडल विकून ४२० रुपये कमावले आहेत, तर सकुनीने द्रोणांची २५ बंडल आणि दातूनची ५० बंडल विकून ३०० रुपये कमावले आहेत. आपल्या कमाईच्या जोरावर या दोघी रात्री उशीरा सुटणाऱ्या पलामू एक्स्प्रेसमध्ये चढतात. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बरवाडीहला घेऊन जाईल. तिथून त्यांना हेहेगराला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडावी लागेल.

सकुनी तिच्या कमाईवर खूश नाही. “हे कष्टाचं काम आहे आणि यात जेमतेमच कमाई होते,’’ आपली पोती बांधता बांधता ती सांगते.

पण काही दिवसातच त्यांना परत यावं लागेल. “ही माझी उपजीविका आहे,’’ गीत सांगते, “जोपर्यंत माझे हातपाय काम करतायत तोपर्यंत मी हेच करत राहीन.’’

य लेखाला मृणालिनी मुखर्जी फाऊंडेशनच्या (एमएमएफ) फेलोशिपचं साहाय्य लाभलं आहे.

Ashwini Kumar Shukla

अश्विनी कुमार शुक्ला झारखंड स्थित मुक्त पत्रकार असून नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन इथून त्यांनी पदवी घेतली आहे. ते २०२३ सालासाठीचे पारी-एमएमएफ फेलो आहेत.

यांचे इतर लिखाण Ashwini Kumar Shukla
Editor : Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

यांचे इतर लिखाण Sarbajaya Bhattacharya
Translator : Amruta Walimbe

अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.

यांचे इतर लिखाण Amruta Walimbe