‘‘कोई सरकार नही चंगी आम लोकां लायी (लोकांसाठी कोणतंच सरकार चांगलं नाही),’’ सत्तर वर्षांच्या गुरमित कौर म्हणतात. काही बायकांसोबत त्या एका शेडखाली बसलेल्या असतात. या सार्याजणी जगरावला किसान मजदूर महापंचायतीसाठी आल्या आहेत, लुधियानामधल्या बस्सियां गावातून.
‘‘मोदींनी नोकर्या देतो असं वचन दिलं होतं, पण त्यांनी कोणतंच आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आता एहना दा कोई हक नहीं सादे एथ्थे आ के व्होटा मांगन दा (इथे येऊन मतं मागण्याचा त्यांना अधिकारच नाही),’’ त्या म्हणतात. गुरमित कौर भारतीय किसान युनियन (बीकेयू एकता) दाकौंदाशी जोडलेल्या आहेत. आपण २०१९ च्या निवडणुकीत मोदींना मत दिल्याचं त्या ‘पारी’ला सांगतात.
जागरावच्या नव्या धान्य बाजारात २१ मे रोजी ही महापंचायत झाली. संपूर्ण राज्यातून ५०००० लोक त्याला आले होते. वेगवेगळ्या शेतकरी संघटना, कामगार संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, वैद्यकीय व्यावसायिक संघटना अशा अनेक संघटना आपली ताकद दाखवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षा(भाजप)चा निषेध नोंदवण्यासाठी इथे आल्या होत्या. ‘बीजेपी हराओ, कॉर्पोरेट बजाओ, देश बचाओ’… स्टेजवरच्या बॅनरवर लिहिलं होतं.
‘‘आम्ही पंजाबमध्ये मोदींना काळे झेंडे दाखवणार आहोत,’’ महापंचायतीला आलेले हरिंदर सिंग लाखोवाल म्हणाले. बीकेयूच्या लाखोवाल गटाचे ते अध्यक्ष आहेत.
पंजाबमध्ये १ जून, २०२४ ला निवडणुका आहेत आणि जिथे शेतकरी आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय म्हणून निषेध करतायत, निदर्शनं करतायत, त्या राज्यात मोदी आपला निवडणूक प्रचार सुरू करणार आहेत. काय मागण्या आहेत शेतकर्यांच्या? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, लखीमपूर खिरी हत्याकांडातील बळींना न्याय, शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी पेन्शन योजना आणि २०२०-२१च्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई.
वाचा : शेतकरी आंदोलनाचं ‘पारी’चं संपूर्ण कव्हरेज












