“आमच्या पिढीतल्या स्त्रिया शिकल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती,” किशनगढ सेधा सिंह वाला इथल्या आपल्या घराच्या व्हरांड्यात बसलेल्या सुरजीत कौर सांगत असतात. पाचवीत असताना त्यांना शाळा सोडायला भाग पाडलं गेलं. आज त्यांच्या शेजारी बसलेली त्यांची नातवंडं आज पाचवीत आहेत.
“शिक्षणामुळे तिसरा डोळा उघडतो माणसाचा!’’ ६३ वर्षांच्या सुरजीत कौर ठामपणे नोंदवतात.
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ७५ वर्षीय जसविंदर कौर मान हलवून सहमती दर्शवतात. “जेव्हा बायका घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांना जगरहाटी कळते,” त्या म्हणतात.
आपलं शालेय शिक्षण पूर्ण करण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नसली, तरी एका घटनेनं त्यांना बरंच काही शिकवलं, असं त्यांचं म्हणणं आहे. सुरजीत आणि जसविंदर यांच्यासह गावातल्या १६ महिलांनी २०२०-२०२१ मध्ये ऐतिहासिक शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीच्या सीमेवर १३ महिने तळ ठोकला होता.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रणाली खिळखिळी होईल आणि खाजगी व्यापारी आणि कॉर्पोरेशन्सना फायदा होईल या भूमिकेतून त्यांच्यासारखे लाखो शेतकरी ते अख्खं वर्ष दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले होते.
२०२४ च्या मे महिन्यात किशनगड सेधा सिंह वाला हे पंजाबमधल्या इतर अनेक गावांसारखंच कापणीच्या तयारीला लागलं होतं. सत्तारूढ पक्षाच्या शेतकरीविरोधी कारवायांविरोधातल्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच १ जून रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठीही नागरिकांनी कंबर कसली होती.
“जर भाजप पुन्हा जिंकला तर ते हे (कृषी) कायदे पुन्हा या ना त्या मार्गाने आणतील,” ६० वर्षीय जरनैल कौर सांगतात. किशनगड सेधा सिंह वालामध्ये त्यांच्या कुटुंबाची १० एकर जमीन आहे. “आपण फार विचार करून मतदान करण्याची गरज आहे.”
(Update: Harsimrat Kaur Badal of Shiromani Akali Dal won the Bhatinda Lok Sabha seat in the 2024 elections. Results were announced on June 4, 2024).
(ताज्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी २०२४ च्या निवडणुकीत भटिंडा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाला.)
















