एजाझ, इम्रान, यासीर आणि शमिमा. पुर्या दहा वर्षांचीही नाहीत ही मुलं. काही वर्षंच शाळेत गेली आहेत. पण दर वर्षी पालकांबरोबर वर हिमालयात जातात तेव्हा चार महिने त्यांची शाळा बुडते, अभ्यास बुडतो, महत्त्वाच्या वर्षातलं महत्त्वाचं शिक्षण बुडतं. गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रं, लेखन कौशल्य, शब्दभांडार अशा सगळ्यावरच याचा परिणाम होतो.
ही मुलं दहा वर्षांची होतील, तेव्हा त्यांचा शाळेबाहेरचा काळ संपूर्ण एक वर्षाचा झालेला असेल. अगदी हुशार मुलांसाठीही हे प्रचंड नुकसान आहे, कधीही भरून न येणारं.
पण आता यापुढे एजाझ, शमिमा आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींचं असं नुकसान होणार नाही. त्यांची कुटुंबं हिमालयात निघाली आणि मुलं शाळेतून बाहेर पडली की ‘प्रवासी’ शिक्षक अली मोहम्मद त्यांच्या पाठोपाठ जातात. काश्मीरमधल्या लिद्दर खोर्यातल्या खालन गावात जाण्याचं पंचविशीच्या अलींचं हे तिसरं वर्ष. जून ते सप्टेंबर असे उन्हाळ्याचे चार महिने ते या या पशुपालक कुटुंबांसोबत आणि त्यांच्या मुलांसोबत इथे असतील. गुज्जर समाज हा काश्मीरमधला पशुपालक समाज. उन्हाळ्यात चराऊ कुरणांच्या शोधात ते हिमालयात वर जातात. खालन ही त्यांची इथली वस्ती.
‘‘मला पण शिक्षक व्हायचंय,’’ लाजाळू शमिमा जान हळूच म्हणते आणि समोरच असलेल्या सरकारने दिलेल्या व्यवसाय पुस्तिकेत डोकं खुपसते. मुलांना लागणारं लेखनसाहित्य चटकन उपलब्ध व्हावं यासाठी अली कधीकधी पदरचे पैसे खर्च करतात.












