बांधकामावर काम करणारे तीन कामगार मारीला आपल्या घरी परतत होते. “पंधरा वर्षं झाली,” त्यांच्यातला एक, अजय पासवान सांगतो. “वाटेत एक सुनसान मस्जिद होती. वाटलं, आत जाऊन पहायला पाहिजे. खूप उत्सुकता होती.”
जमिनीवर शेवाळं चढलं होतं आणि सगळीकडे झाडोरा वाढला होता.
“अंदर गये तो हम लोगों का मन बदल गया,” रोजंदारीवर काम करणारा ३३ वर्षीय अजय सांगतो. “कुणास ठाऊक, अल्लाचीच इच्छा असेल आम्ही आत जावं.”
मग त्या तिघांनी, अजय पासवान, बाखोरी बिंद आणि गौतम प्रसाद साफसफाई करण्याचं ठरवलं. “आम्ही जंगल काढून टाकलं आणि मशिदीला रंग दिला. समोर एक मोठा चबुतरा बांधला,” अजय सांगतो. रोज संध्याकाळी त्यांनी तिथे दिवा लावायलाही सुरुवात केली.
मग या तिघांनी एक साउंड सिस्टिम आणली आणि मशिदीवर भोंगा लावला. “त्या साउंड सिस्टिमवर आम्ही अझान लावायची असं ठरवलं,” अजय सांगतो. आणि मग काय, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या मारी गावात दिवसातून पाच वेळा मशिदीत अझान सुरू झाली.












