कर्नाटकाच्या किनारी भागात विविध सणसमारंभांमध्ये गरनाल सायबेर किंवा फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या कलकारांना मोठी मागणी असते. भुता कोला, सण, समारंभ, लग्नं, वाढदिवस किंवा वास्तुशांत आणि अगदी मृत्यूनंतर दफनविधीवेळी देखील त्यांचा सहभाग फार महत्त्वाचा मानला जातो.
गरनाल म्हणजे फटाका आणि सायबेर हा या भागात मुस्लिम व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द.
आमीर हुसैन मुल्की शहरातला गरनाल सायबेर आहे. तो सांगतो की त्याच्या वडलांनी त्याला ही कला शिकवली आणि हा वारसा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सुपूर्द केला जातो.
“फटाक्यांचं, ते हवेत फेकण्याचं काम तसं जोखमीचं आहे, खास करून मोठी आतषबाजी तर नक्कीच,” नितेश आंचन म्हणतात. ते कर्नाटकातील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन इथे संशोधक आहेत.
मुश्ताक अथराडी, उडुपी जिल्ह्यातल्या अथराडी गावचा रहिवासी. तो गरनाल तयार करतो आणि भुता उत्सवांमध्ये ते आकाशात फेकण्याचं काम करतो. त्याची खासियत म्हणजे तो काडोणी म्हणून ओळखला जाणारा सगळ्यात मोठा धमाका करणारा गरनाल तयार करू शकतो. “वेगवेगळ्या प्रकारची दारू किंवा रसायनं विशिष्ट पद्धतीने एकत्र करून काडोणी तयार केला जातो,” तो सांगतो. काडोणी जिथे फोडला जातो तिथली जमीन देखील हादरते असं लोक सांगतात.


