अहमदोस सितारमेकर पॅरिसला जाऊन आले असते. पण वडील नाही म्हटले. “बाहेरची दुनिया पाहिलीस तर तू परत यायचा नाहीस” त्यांचे शब्द होते. आज ते सगळं आठवून ९९ वर्षांच्या अहमदोसचाचांच्या चेहऱ्यावर हसू पसरतं.
सितार बनवणाऱ्यांची त्यांची पाचवी पिढी. ते तेव्हा तिशीच होते. पॅरिसहून दोघी जणी सतार कशी बनवायची ते शिकायला त्यांच्या गावी पोचल्या होत्या. “काही लोकांशी बोलल्यावर त्या इथे आल्या आणि मी त्यांना शिकवायला सुरुवात केली,” अहमदोस चाचा सांगतात. मिरजेच्या सितारमेकर गल्लीतल्या त्यांच्या दुमजली बैठ्या घरात आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. इथेच त्यांच्या किती तरी पिढ्या राहिल्या आहेत आणि सतार तयार करत आल्या आहेत. घराच्या तळमजल्यावर बसलेले चाचा आमच्याशी बोलत होते.
“त्या काळी आमच्या घरी संडास नसायचे,” ते सांगू लागतात. “एका दिवसात आम्ही संडास बांधून घेतला. आम्ही त्यांना आमच्यासारखं उघड्यावर जायला कसं सांगणार?” त्यांचं बोलणं सुरू आहे आणि मागून सतारीचे सूर जुळवायचा हलका आवाज कानावर पडतोय. गौस सितारमेकर काम करत असणार.
त्या दोघी फ्रेंच तरुणी नऊ महिने त्यांच्या घरी राहिल्या. पण शेवटच्या काही गोष्टी शिकण्याआधीच त्यांचा व्हिसा संपला. काही महिन्यांनी त्यांनी अहमदोस चाचांना राहिलेल्या गोष्टी शिकवण्यासाठी पॅरिसला यायचं निमंत्रण दिलं होतं.
पण आपल्या वडलांचा शब्द पाळून चाचा इथेच राहिले. सांगली जिल्ह्याच्या मिरजेत. हे गावच वाद्य तयार करण्याच्या कलेसाठी ओळखलं जातं. अहमदोस चाचांचं घराणं १५० वर्षांपासून, किमान सात पिढ्यांपासून या कामामध्ये गुंतलेलं आहे. आणि आज, वयाच्या ९९ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत.












