सरस्वती बावरीला काय करावं ते कळत नव्हतं.
सबूज साथी सायकल चोरीला गेली तेव्हापासून शाळेत कसं जायचं हा मोठा प्रश्नच होता. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या नववी आणि दहावीच्या मुलींना एका सरकारी योजनेतून ही सायकल दिली जात होती. काय भारी होती ती सायकल! उन्हात कशी मस्त चमकत होती.
आज ती ग्राम प्रधानांकडे आलीये, नव्या सायकलसाठी अर्ज द्यायला. “सायकल तो पेये जाबी रे छुरी, किंतु तोर इस्कुल-टा आर कोद्दिन थाकबे सेटा द्याख आगे [पोरी, तुझी सायकल तुला मिळेलही पण तुझी शाळा अजून इथे फार दिवस असेलच असं नाही],” खांदे उडवत अगदी बेफिकीरपणे सरपंच सांगतात. हे ऐकून सरस्वतीच्या पायाखालची वाळूच सरकल्यासारखं झालं. ग्राम प्रधान नक्की काय म्हणत होते? खरं तर शाळेत जायला तिला सायकलवरही पाच किलोमीटर पॅडल मारत जावं लागतं. आता जर हे अंतर १०-२० किलोमीटर झालं तर मग तिचं काही खरं नाही. तिचे वडील तिचं लग्न लावून देण्याच्या मागे लागले होते. वर्षभरासाठी कन्याश्री योजनेत मिळणारे एक हजार रुपये आता पुरे पडणार नाहीत.
सायकल
पोरी गं पोरी, शाळेत ती चालली
सरकारी सायकलवर ओलांडून गल्ली
लोहाच्या फाळासारखी कणखर जरी
सरकारी बाबूंना जमीन आहे प्यारी
शाळाच बंद झाल्या तर होईल काय?
पोरी गं पोरी कुणवर चिडशील, झालंय काय?
*****
फुलकी टुडू बुलडोझरच्या अजस्त्र चाकांच्या निशाण्यांशी खेळतोय.
उमेद किंवा आशा म्हणजे तिच्यासाठी चैन. करोनानंतर तर ही चैनही महागलीये. सरकारने घुगनी-चॉपची तिची छोटीशी गुमटी म्हणजे टपरी बुलडोझर लावून तोडून टाकली, त्यानंतर सगळंच बदललं. खाण्याच्या टपऱ्या आणि त्यावर तळली जाणारी भजी हे आपल्या उद्योजकतेचं प्रतीक मानणारं हेच ते सरकार बरं. टपरी सुरू करण्यासाठी तिने तिच्याकडची सगळी गंगाजळी ज्यांना ‘अर्पण’ केली तेच आता अतिक्रमणविरोधी मोहीम राबवतायत.
कर्जाचा बोजा वाढत चाललाय. त्यामुळे तिचा नवरा बिगारीवर बांधकामावर मजुरी करण्यासाठी कामाच्या शोधात मुंबईला गेलाय. “ही पार्टी म्हणते, ‘आम्ही तुला महिन्याला १२०० रुपये देऊ.’ ती पार्टी म्हणते, ‘आम्ही तर तुझ्यासाठी साक्षात भगवंतालाच भूतलावर आणू!’ खड्ड्यात गेली लोक्खीर भांडार आणि मसणात जाऊ दे त्यांचं मोंदिर-मोस्जिद. मला काय फरक पडतोय?” फुलकी दीदीचा अगदी तळतळाट होतो. आणि ती म्हणते, “होतोभागार दोल, आगे आमार ५० हजार टाकार कट-मनी फेरोत दे [नालायक साले! लाच म्हणून दिलेले ५० हजार रुपये आधी परत करा म्हणावं!]”
बुलडोझर
कर्ज म्हणजे जन्मसिद्ध हक्क, आणि
उमेद म्हणजे नरक
भज्यांच्या पिठात बुडून जायचं, पडतो काय फरक?
लोक्खीर भांडार
जा तेल लावत
देशच तोललाय पाठीवर, गळतोय घाम
पंधरा लाख येणार होते खात्यात. मोजतोय दाम.
*****
बाकीच्या कुण्णाला जमलं नाही ते लालू बागडीने करून दाखवलं होतं. मनरेगाचे त्याचे पूर्णच्या पूर्ण १०० दिवस भरले. पण उपयोग काय. त्याचं काम केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेखाली होतं का राज्य सरकारच्या मिशन निर्मल बांग्ला खाली हेच सरकारी बाबूंना माहीत नाही. आणि या सगळ्या दुष्टचक्रात लालू बागडीचा पगार काही त्याच्या हातात पडलेला नाही.
“सोब शाला मकाल पोल [सगळे बिनकामाचे आहेत साले],” असं म्हणत लालू बागडीच्या तोंडाचा पट्टा सुटतो. झाडून काढा...लोटून काढा. कचरा शेवटी कचराच. हो की नाही? योजनेचं नाव काही पण द्या. केंद्राची, राज्याची.. काय फरक पडतोय? पडतो. फरक पडतो.
कचराकुंडी
राम राम निर्मलभाऊ. काय चाललंय, सांगा?
“फुकटात राबलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या रांगा.”
इथल्या नद्यांमध्ये प्रेतं नाहीत
कामगार कायदे? कुणाला माहीत...
काय म्हणताय, स्वच्छकुमार, तुम्ही काय म्हणणार?
“घामाचा रंग भगवा, रक्त हिरवंगार!”
*****
फारुक मोंडलला क्षणाचीही उसंत नाही! अनेक महिने पावसाचा पत्ता नव्हता. दुष्काळ सरून पाऊस आला. पिकं काढणीला आली पण तेवढ्यात अचानक पूर आला आणि सगळंच वाहून गेलं. “हाय अल्ला, हे मा गोंधेश्वरी, एटो निठूर क्याने तोमरा? [हाय अल्ला, आई गोंढेश्वरी, इतके क्रूर का बरं झालात तुम्ही?]” एवढा एकच प्रश्न त्याच्या मनात येत होता.
हा आहे जंगलमहलचा प्रांत. पाण्याचं दुर्भिक्ष्य कायम. पण वचनांचा, धोरणांचा आणि प्रकल्पांचा मात्र सुकाळ. सजल धारा, अमृत जल. नावापासूनच वादाला सुरुवात. जोल का पानी? पाइपलाइन आल्या, दानधर्म झाले पण पिण्याच्या पाण्याचा एक थेंब अजून आलेला नाही. “ हाय अल्ला, हे मा गोंढेश्वरी, एटो पाषाण कायने तोमरा? [हाय अल्ला, आई गोंढेश्वरी, इतके पाणाहृदयी का बरं झालात तुम्ही?] ”
भेगाळलेली भुई
अमृत लिहायचं का अम्रुत?
मातृभाषा जपायची,
का विसरून जायची?
केसर, केशर, सॅफरन, झाफरान... काय आहे मामला?
आटपाट नगरालाच मत द्यावं?
का फोडून टाकावा जुमला?
*****
सोनाली महातो आणि इटुकला रामू हॉस्पिटलच्या दारात थिजून गेल्यासारखे उभे होते. आधी बाबा आणि आता आई. एकाच वर्षात दोघांना दुर्धर आजाराचं निदान.
हातात सरकारी आरोग्य विम्याचं कार्ड घेऊन ते या कचेरीतून त्या कचेरीत नुसत्या खेटा मारत होते. आर्जव करत, विनवण्या करत. स्वास्थ्य साथीने दिलेली ५ लाखांची हमी काही पुरेशी नव्हती. भूमीहीन होतेच आणि बेघरही होण्याची वेळ आलेलं हे कुटुंब आता आयुष्मान भारतकडे आशेने डोळे लावून होते. पण ही योजना मिळणार का, त्यातून काही मदत होणार का, कुणीच सांगू शकत नव्हतं. काही जण म्हणत होते की आपल्या राज्यात ही योजना राबवायची नाही असं इथल्या सरकारने ठरवलंय. काहींनी सांगितलं की यामध्ये पुनर्रोपणासारख्या शस्त्रक्रिया होत नाहीत. काही जण म्हणाले यातला पैसा पुरेसा नाही. माहितीच्या नावाखाली नुसता गोंधळ होता, गोंधळ.
“द द दीदी रे, तोबे जे इश्कुले ब ब बोले शोरकार आमादेर प प पाशे आच्छे? [दीदी, सरकार आमच्या पाठीशी आहे असंच तर आम्ही शाळेत शिकलो होतो ना?]” रामू चाचरत म्हणतो. आपण लहान आहोत याची त्याला कल्पना आहे. सोनाली तर थंड डोळ्याने फक्त शून्यात पाहत बसली होती. निःशब्द.
वचने
आशा ताई, आशा ताई, मदत करा ना जरा!
आईला लागणारे किडनी नवं हृदय बाबाला.
तत सत स्वास्थ्य, साथी म्हणजे दोस्त
आमची जिस्म-ओ-जमीन, आम्ही विकून टाकली स्वस्त
आयुष, अरे दोस्ता, ऐक आमचा धावा,
का येशील फक्त अंगावर, आणि घेशील चावा?
*****
सूची
चॉप - मसालेदार सारण असलेला भजीसारखा
पदार्थ
घुगनी – मटार किंवा चण्याची उसळ
गुमटी - टपरी
गोंढेश्वरी – एक नदी आणि देवता
डाक्टर - डॉक्टर
दफ्तर - कचेरी
तत् सत् – तेच सत्य आहे
माने - म्हणजे
जिस्म-ओ-जमीन – शरीर व मन
या कविता रचताना स्मिता खटोर हिच्या अनेक कल्पना केंद्रस्थानी होत्या. त्याबद्दल तिचे अगदी मनापासून आभार.