तिला पळता येतं आणि त्यांना पळायला शिकवता येतं.
मग काय? जयंत तांडेकरांनी आठ वर्षांच्या ऊर्वशीला पळण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी चक्क आपल्या घरी ठेवून घेतलं.
आपलं स्वप्न आता आपल्या या शिष्येच्या पावलांमधून साकार व्हावं यासाठीच त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत.
तर अगदी दुर्गम गावातली एक छोटीशी मुलगी, तिचे आईवडील आणि खिसा छोटा पण मोठी स्वप्नं डोळ्यात असणारा एक प्रशिक्षक यांची ही गोष्ट.
दोन वर्षांपूर्वी, वयाच्या आठव्या वर्षी ऊर्वशी तांडेकर सरांच्या घरी रहायला आली. भंडारा शहराच्या वेशीवरच त्यांचं दोन खोल्यांचं भाड्याचं घर आहे. आपलं थोडं फार सामान घेऊन ही चिमुकली सरांकडे आली. ऊर्वशीच्या आई-वडलांकडे पैसा नाहीच. भंडारा शहरापासून २५ किलोमीटरवर असलेल्या दव्वा गावी ते राहतात. ऊर्वशीच्या स्वप्नांना काही आकार यायचा असेल तर तांडेकर सरांवर आणि ऊर्वशीसाठी ते बघत असलेल्या स्वप्नांवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे असं तिच्या आईने, माधुरी ताईने मनाशी ठरवलं.










