तिशीतला गणेश पंडित हा नवी दिल्लीतल्या लोहा पूल या जुन्या यमुना पूलाजवळच्या भागातला सर्वात तरुण व्यक्ती असेल कदाचित. त्याच्या समाजातले इतर तरुण जवळच्या चांदनी चौक भागातल्या पोहण्याचे प्रशिक्षक म्हणून किंवा दुकानांमध्ये नोकरी करण्याला प्राधान्य देतात असं त्याने सांगितलं.
दिल्लीतून वाहणारी यमुना नदी ही गंगेची सर्वात जास्त लांबीची उपनदी आहे आणि आकारमानाच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी (घाघरा प्रथम क्रमांकावर आहे) उपनदी आहे.
पंडित यमुनेवर छायाचित्र काढून देण्याची व्यवस्था करतो तसंच ज्यांना यमुनेच्या पात्रात जाऊन काही धार्मिक विधी करायचे आहेत त्यांना नावेतून यमुनेच्या पात्रात घेऊन जातो आणि परत सोडतो. तो म्हणतो, “जिथं विज्ञान अपयशी ठरतं तिथं विश्वास कामी येतो.” त्याचे वडील तिथले पुजारी आहेत. तो आणि त्याचे दोन्ही भाऊ लहान असतानाच यमुनेत पोहायला शिकले. गणेशचे भाऊ फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जीवरक्षक म्हणून काम करतात.






