अंजना देवींचं असं म्हणणं आहे की बजेट वगैरे सगळं गड्यांचं काम आहे.
“मरद लोग ही जानता है ए सब, लेकिन वो तो नही है घर पर,” त्या म्हणतात. खरं तर घराचं सगळं बजेट त्याच पाहतात, बरं. अंजना देवी चमार या अनुसूचित जातीच्या आहेत.
“बज्जट...” याबद्दल आपण काही ऐकलंय का हे आठवण्याचा त्या प्रयत्न करतात. “ऊ सब ता हम नही सुने है.” बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या सोंधो रत्ती गावात राहणाऱ्या अंजना देवी पुढे म्हणतात, “इ सब पैसा वाला लोग के लिये है.”
अंजना देवींचे पती, शंभू राम, वय ८० कुठे तरी मंडळाबरोबर भजनाला गेले आहेत. ते घरच्या घरी रेडिओ दुरुस्तीचं काम करतात. पण आज काल या कामाला गिऱ्हाईक तरी कुठे आहे? “आठवड्याला कसं तरी करून ३००-४०० येतात,” त्या सांगतात. म्हणजे वर्षाला जास्तीत जास्त म्हटलं तर रु. १६,५००. करदात्यांना १२ लाखापर्यंत करातून सूट देण्यात आली त्या रकमेच्या १.३७ टक्के. ही करसवलतीची मर्यादा त्यांना सांगितल्यावर त्या हसतात. “कधी कधी तर अख्ख्या आठवड्यात १०० रुपये सुद्धा हातात येत नाहीत. मोबाइल फोनचा जमाना आहे. आजकाल कुणीच रेडिओ ऐकत नाही,” त्या तक्रारीच्या सुरात म्हणतात.





