पाहिल्या पाहिल्या पटकन स्वस्तात मस्त उपाय म्हणावं असंच वाटावं. पण ६५ वर्षीय नारायण देसाईंसाठी मात्र हे त्यांच्या कलेचं ‘मरण’ आहे. कशाविषयी हे सगळं सुरू आहे असा प्रश्न पडला असेल तर त्यांच्या सनईत कराव्या लागणाऱ्या बदलांची ही गोष्ट. बाजारपेठेपुढे मान तुकवून त्यांना आता हे सगळं मान्य करावं लागतंय. पण त्यांच्या कलेच्या अस्तित्वावरच त्यातून प्रश्न उभा राहिलाय हे नक्की.
लग्न, सण समारंभ किंवा गावात काहीही कार्यक्रम असला तर तिथे सनई असतेच.
अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत नारायणभाऊ ज्या सनया तयार करायचे त्याला पितळेचीच वाटी असायची. हाताने कोरलेल्या लाकडी सनईतून उमटणाऱ्या स्वरांचं सौंदर्य वाढतं ते या पितळी वाटीमुळेच. १९७०च्या दशकात जेव्हा सनई तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय अगदी जोमात होता तेव्हा नारायणभाऊंकडे किमान डझनभर पितळी वाट्या तयार असायच्या. बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडीमधून त्या आणून ठेवलेल्या असायच्या.
पण गेल्या काही वर्षांमध्ये जवळ जवळ पन्नास वर्षं जी कला जपली, जोपासली तीमध्ये त्यांना बदल करावे लागले आहेत. त्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेतः पितळी वाट्यांच्या वाढलेल्या किंमती आणि चांगली सनई करण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन तशी किंमत देण्यास गिऱ्हाईक करत असलेली खळखळ.
“लोक मला म्हणाया लागले, ३००-४०० रुपयात सनई विका म्हणून,” ते सांगतात. आता ही मागणी पुरी करणं अवघडच कारण नुसती पितळी वाटीच ५०० रुपयांना मिळायला लागल्याचं ते सांगतात. किंमतीमुळे किती तरी जणांनी खरेदी करणं टाळल्यानंतर त्यांनी एक युक्ती शोधून काढली. “गावातल्या जत्रेतून मी प्लास्टिकच्या पिपाण्या घेऊन आलो. त्यांचं पुढचं तोंड कापलं (त्याचा आकार सनईच्या वाटीसारखा असतो) आणि ते या पितळी वाटीच्या जागी बसवलं.”
“आता आवाजावर परिणाम होतोच की, पण आता लोकांची त्यालाच मागणी आहे,” ते खेदाने म्हणतात. एखादं चोखंदळ गिऱ्हाईक असेल तर ते आजही त्यांना हवी तशी वाटी बसवून देतात. प्लास्टिकची तोंड बसवायला त्यांना फक्त १० रुपये खर्च येतो. पण आपल्या कलेशी अशी तडजोड करावी लागते याचं त्यांना वाटणारं वैषम्य मात्र मोजण्यापलिकडचं असतं.

























