तर अशी आम्ही महाराष्ट्रातली आदिवासी माणसा. सण आला तर तुला, मला एकुच सण धरायचा. नवा भात आला तर कुटुंबात, सगळ्याले गावात, गावदेवीला तिचा निवद-बोना दाखवायचा. नंतर खायाचा. आम्ही आदिवासी अजूनही देवीला दाखवल्याशिवाय नवा भात खात नाय. डांगर खात नाय. दुधी खात नाय. तुम्ही लोक डांगर लागला... खाल्ला. दुधी लागला... खाल्ला. आम्ही नाय.
तुम्ही म्हणता, अंधश्रद्धा. पण अंधश्रद्धा नाही. श्रद्धाच आहे.
आता विठल, रकुमाई, गणपती सगळे मोठ्या लोकांचे देव. ते आमचे देव नाहीत. आमच्यापाशी अगरबत्ती पण नाही लावायला. मग आम्ही दगडाचा देव केला ना. त्याची पूजा केली.
वाघबारस असली की आम्ही आजही सवरीदेवीचा उत्सव करतो.
धनधान्य पिकला की हे वाद्य डोंगरात, रानात न्यायचा. तिथं सांगायला तंगडा सवरी, गोहरा सवरी, पोपटा सवरी, तुंबा सवरी, घुंगा सवरी अशा सवरी देवीच्या जवळच्या साथी. या निसर्गाच्या देवता. त्या आहेत अजून तरी. आम्ही त्याची पूजा करायला लागलु. त्यांना आवतन देत मी तारपा वाजवतो. ‘बाई, तू ये’ कसं म्हणतो, तसंच या तारपावर मी वेगळा वेगळा चाल वाजवतो. एका एका सवरीसाठी वेगवेगळा चाल.
धनधान्य नवा पिकला की आम्ही गावदेवीच्या देवळात जातो. गावदेवी कशासाठी बसवली? तिला एक मान दिला. ‘आपला पोर, सोर, ढोर, धांगर सुखाचा राहिला पाहिजे, शेती वाडी आबाद राहिली पाहिजे. नोकरी करत असेल तर त्याला वेश दिला पाहिजे. परिपंच चांगला चालला पाहिजे’ असं आम्ही आदिवासी त्या देवीला जाऊन संबरण करतो.