आपल्या पानमळ्यात प्रकाश बुंदीवाल उभे आहेत. विड्यासाठी वापरली जाणारी ही हृदयाच्या आकाराची पानं. दाटीवाटीने पसरणाऱ्या अत्यंत नाजूक वेलींवर ही पानं येतात. कडक ऊन आणि वाऱ्याच्या गरम झळांपासून संरक्षण करण्यासाठी या वेलींना सिंथेटिक जाळीचं आच्छादन केलंय.
भारतभरात सगळीकडे जेवण झाल्यावर विडा खाल्ला जातो. त्या विड्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ही पानं. हिरव्या पानाला चुना आणि कात लावतात. त्यात बडीशेप, सुपारी, गुलकंद घालतात. सगळं एकत्र भरून विशिष्ट पद्धतीने घडी घालून विडा बांधला जातो. यातून पानाला मुखशुद्धीचा स्वाद आणि रसाळपणा येतो.
११ हजार ९५६ लोकसंख्या असलेलं हे गाव चांगल्या प्रतीच्या पानासाठी प्रसिद्ध आहे. आणि कुकडेश्वरमधल्या इतर अनेकांप्रमाणे प्रकाश यांच्या कुटुंबाचेही स्मरणात असल्यापासून पानमळे आहेत. ते तांबोळी समाजातले आहेत. मध्य प्रदेशात हा समाज ओबीसी अर्थात इतर मागास प्रवर्गात येतो. एव्हाना साठी ओलांडलेल्या प्रकाश यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पानमळ्यात काम करायला सुरुवात केली.
पण बुंदीवाल यांच्या ८ गुंठ्यांच्या शेतीचं सध्या काही खरं नाही. २०२३ सालच्या मे महिन्यात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने या छोट्या शेतकऱ्याचं जग इकडचं तिकडे करून टाकलं. “आम्हाला कोणताही विमा दिला जात नाही आणि वादळात सर्व काही गमावलं तरी सरकार कोणतीही मदत देत नाही,’’ ते सांगतात.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या अंतर्गत (एनएआयएस) अनेक कृषी उत्पादनांना केंद्र शासन हवामानाशी निगडीत असलेला विमा देतं. परंतु त्यात या पानाचा अंतर्भाव नाही.










