“ओ शब भोट-टोट छाडो. शोंध्या नामार आगे ओनेक काज गो [ते मत-बित सगळं राहू दे. संध्याकाळ व्हायच्या आत हजार कामं उरकायचीयेत].... इथे येऊन आमच्यात बसणार असलीस तर बस, वास सहन होत असेल तर,” आपल्या जवळ जमिनीकडे हात दाखवत म्हातारी मालती मावशी माल मला सांगते. कांद्याच्या एका मोठाल्या ढिगाभोवती ती आणि तिच्या बरोबरच्या अनेक जणी काम करत होत्या. तिथेच ती मला बोलावत होती. उकाडा आणि धुळीचं त्यांना काहीही वावडं नव्हतं. गेला आठवडाभर मी या गावात येत-जात होते. या बायांसोबत जायचं, त्यांना चालू असलेल्या निवडणुकीबद्दल विचारायचं असं काय काय सुरू होतं.
एप्रिल नुकताच सुरू झालाय. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये या प्रांतात पारा रोजच ४१ अंशाला जातो. माल पहाडियांच्या या झोपडीत संध्याकाळचे पाच वाजले तरी गरमा कमी झालेला नाही. आसपास काही झाडं आहेत पण एकही पान हलत नाहीये. हवेत फक्त ताज्या आणि तिखट कांद्यांचा दर्प भरून राहिलाय.
उपटून टाकलेल्या कांद्यांच्या ढिगाभोवती अर्धगोलात या बाया बसल्या आहेत. विळ्याने पात काढून टाकायची आणि कांदे बाजूला टाकायचे असं त्यांचं काम सुरू आहे. दुपारची उन्हाची काहिली, त्यात कच्च्या कांद्यातून येणाऱ्या वाफा अशा सगळ्यामुळे त्यांचे चेहरे उजळलेत. प्रचंड कष्ट करणाऱ्या श्रमिकाच्या चेहऱ्यावरच हे असं ‘तेज’ दिसून येतं.
“हा काही आमचा ‘देश’ [मूळ गाव] नाही. गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही इथे येतोय,” साठी पार केलेली मालती मावशी आजी सांगते. ती आणि तिच्या बरोबरच्या या बाया माल पहाडिया आदिवासी आहेत. त्यांची नोंद अनूसुचित जमात म्हणून केलेली असली तरी आदिवासींमध्येही हे लोक सर्वात वंचित आणि बिकट परिस्थितीत जगतायत.
“आमच्या गोआस कालिकापूर गावात कामच नाहीये,” ती सांगते. आणि त्यामुळेच मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या राणीनगर ब्लॉक १ मधल्या गोआस गावातली जवळपास ३० हून जास्त कुटुंबं इथे बिशुरपुकुर गावाच्या वेशीवर आपल्या झोपड्या बांधून इथल्या शेतांमध्ये कामाला आली आहेत.
७ मे रोजी त्यांच्या गावात मतदान होणार असल्याने त्यासाठी आपण गावी परत जाणार असल्याचं त्या मला सांगतात. बिशुरपुकुर पाड्यापासून गोआस कालिकापूर सुमारे ६० किलोमीटरवर आहे.




























