सप्टेंबर २०२३. बहरणाऱ्या फुलांचा हंगाम सुरू झाला होता. पश्चिम घाटातलं हे 'फुलांचं खोरं'. इथे गुलाबी आणि जांभळ्या फुलांच्या शेकडो मूळ जाती, इथल्या विशिष्ट जैवविविधतेत, दरवर्षी बहरत असतात.
मात्र वर्षागणिक फुलांचा हा बहर कोमेजू लागला आहे..
१२०० मीटर उंचीवर असलेलं कास पठार युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळ म्हणून २०१२ सालीच घोषित झालं आहे. तेव्हापासून, महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून कास पठाराची ओळख तयार झाली आहे. खासकरून ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात, जेव्हा फुलांचा हंगाम असतो. पण इथूनच खऱ्या अडचणी सुरू होतात.
“इथं कुनीच येत नव्हतं [पुर्वी]. आमच्यासाठी डोंगरच हा. गुरं चरायला आनायचो,” सुलाबाई बदापुरी सांगतात. “[सध्या] लोकं फुलांवर चालतात काय, फोटो काय काढतात, फुलं उपटतात काय!” सुलाबाई नाराजीच्या सुरातच बोलल्या, त्या ५७-वर्षांच्या आहेत, “ह्यी काय बाग हाय व्हय, दगडावर फुलं येत्यात ही.”
१६०० हेक्टरच्या परिसरात विस्तारलेला खडकाळ भूभाग सातारा जिल्ह्यातल्या सातारा तालुक्यात येतो.














