नबो कुमार मैतींच्या कारखान्यात सगळीकडे बदकाची पिसंच पिसं विखुरली आहेत. स्वच्छ, मळकी, छाटलेली, विविध आकाराची आणि पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांची पिसं. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळुक येते आणि पिसं हलकेच हवेत उडतात आणि तरंगत तरंगत पुन्हा एकदा जमिनीवर पडतात.
उलुबेडियामध्ये नबो कुमारांचं तीन मजली घर आहे. आम्ही तळमजल्यावर होतो. खोलीत कात्र्यांचा आणि लोखंडी पात्यांचा आवाज भरून राहिला होता. याच कारखान्यात भारतातली बॅडमिंटनची फुलं म्हणजेच शटलकॉक तयार होतात. “बदकाची पांढरी शुभ्र पिसं, लाकडी किंवा कृत्रिम कॉर्क, नायलॉन आणि सुताचा मिश्र धागा आणि डिंक. असं सगळं साहित्य असलं की झालं शटल तयार,” ते सांगतात. हातात सहा शटल भरलेला, विक्रीसाठी तयार असलेला बॉक्स असतो.
सकाळचे आठ वाजले होते. २०२३ चा ऑगस्ट महिना सरत आला होता. सोमवारची सकाळ आणि हवा बरीच दमट होती. तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती, पण त्यानंतर पाचच आठवड्यात भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धांमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना २१-१८, २१-१६ असं हरवून देशासाठी पहिलं वहिलं सुवर्ण पदक मिळवलं.
इथे उलुबेडियामध्ये या कारखान्याच्या दारात कारागिरांच्या सायकली आणि स्लिपर एका रांगेत लागलेल्या आहेत. इस्त्री केलेला गडद मरून रंगाचा सदरा आणि विजार परिधान केलेले नबो कुमार कामाला सज्ज आहेत.
“मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून आमच्या बानिबान गावामध्ये मी ‘हांशेर पालोक’ [बदकाच्या पिसां] पासून बॅडमिंटनचे ‘बॉल’ तयार करतोय,” ६१ वर्षीय नबो दा सांगतात. त्यांच्या कामाची सुरुवात पिसांना आकार देण्याचं काम करत करत झाली. लोखंडी कात्रीने तीन इंची पिसाला आकार दिला जातो. हे कारागीर शटलकॉकला बॉल म्हणतात.
“[बंगालमधली] पहिली फॅक्टरी जे. बोस अँड कंपनी होती. पिपुर गावात १९२० मध्ये सुरू झाली होती. हळूहळू जे. बोसच्या कामगारांनी जवळच्या गावांमध्ये त्यांचे स्वतःचे छोटे छोटे कारखाने काढले. तशाच एका कारखान्यात मी ही कला शिकलो,” ते सांगतात.
१९८६ साली नबो कुमार यांनी उलुबेडियाच्या बानिबोन गावातल्या हाटतोलामध्ये आपला स्वतःचा कारखाना सुरू केलाय. मग १९९७ मध्ये तिथून सगळा पसारा त्यांनी इथे जादुरबेडियामधल्या सध्याच्या कारखान्यात हलवला. इथे ते शटलकॉकचं उत्पादन, कच्चा माल आणि विक्री या सगळ्यावर देखरेख ठेवून असतात. पिसांच्या छाटणीतही ते हातभार लावतात.
बानिबोन जगदीशपूर, ब्रिंदाबोनपूर, उत्तोर पीरपूर आणि बोनिबोन या गावांमध्ये आणि उलुबेडिया नगरपालिका क्षेत्रातल्या मुख्य उत्पादनांपैकी एक म्हणजे बॅडमिंटनची शटल आहेत असं २०११ च्या जनगणनेतही नमूद करण्यात आलं आहे.
“२००० च्या सुमारास इथे उलुबेडियात असे किमान १०० कारखाने होते. त्यातले आता केवळ ५० उरले आहेत. त्यातल्याही दहांमध्येच आमच्या कारखान्यासारखे १०-१२ कारागीर काम करतायत,” नबोदा सांगतात.
*****
नबोदांच्या कारखान्यात समोरच्या बाजूस सिमेंटचा कोबा केलेलं अंगण आहे. एक हापसा आणि ‘उनान’ म्हणजे विटांची चूल तसंच जमिनीत बसवलेले दोन सिमेंटचे टब. “ही जागा पिसं धुण्यासाठीच केली आहे. कारण शटल तयार करण्याचं पहिलं कामच हे असतं,” ते सांगतात.
इथे काम करत असलेला रणजित मोंडोल १०,००० पिसांची एक बॅच तयार करतोय. ३२ वर्षीय रणजीत सांगतो, “बंगालच्या उत्तरेकडे कूच बिहार, मुर्शिदाबाद आणि मालदा आणि मध्य भागातल्या बिरभूममधून पिसांचा पुरवठा होतो. काही स्थानिक पुरवठादारही आहेत. पण ते जरा जास्त भाव लावतात.” ते गेली १५ वर्षं या कारखान्यात काम करतायत आणि शटलनिर्मितीवर लक्ष ठेवून असतात.
पिसं १,००० च्या गठ्ठ्यात विकली जातात आणि त्यांच्या दर्जाप्रमाणे किंमत ठरते. “सगळ्यात उत्तम पिसांची किंमत १,२०० रुपये बंडल इतकी आहे. म्हणजेच एका पिसाला १ रुपया २० पैसे,” एका टबात कोमट पाण्यात भिजवून ठेवलेली ओंजळभर पिसं काढता काढता रणजीत सांगतो.
रणजीत एका डेगचीमध्ये पाण्यात थोडी सर्फ एक्सेल कपड्याची पावडर टाकतो आणि चुलीवर ठेवतो. लाकडं सारून चूल पेटवतो. “शटलची पिसं कशी पांढरी शुभ्र पाहिजेत. गरम पाण्यात साबण टाकून धुतली की त्यात कसलीच घाण राहत नाही,” तो म्हणतो. “पिसं फार काळ टिकत नाहीत त्यामुळे जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही.”
पिसं स्वच्छ धुऊन घेतल्यावर तो थोडी थोडी पिसं वेताच्या पाटीवर निथळत ठेवतो. साबणाचं पाणी निथळलं की परत एकदा पाण्यातून काढतो. आणि नंतर अंगणातल्या दुसऱ्या टबात भिजत घालतो. “पिसं धुण्याच्या या कामाला पूर्ण दोन तास लागतात,” रणजीत सांगतो. त्यानंतर तो धुतलेली १०,००० पिसं गच्चीत उन्हात वाळत टाकायला घेऊन जातो.
“बहुतेक पिसं कापलेल्या बदकांची असतात, बदक पाळणाऱ्यांकडून मिळतात. पण गावातली अनेक कुटुंबं पाळलेल्या बदकांची आपोआप गळणारी पिसंदेखील गोळा करतात आणि व्यापाऱ्यांना विकतात,” ते सांगतात.
गच्चीत रणजीत एक काळी ताडपत्री पसरतो. उडू नये म्हणून चार कोपऱ्यात विटांचे तुकडे ठेवतो. मग सगळी ओली पिसं त्यावर एकसारखी पसरतो. आणि म्हणतो, “आज ऊन चांगलंच कडक आहे. पिसं एका तासात वाळतील. त्यानंतर बॅडमिंटन बॉलमध्ये ती वापरता येतील.”
पिसं वाळली की अगदी एकेक पीस नीट तपासून पाहिलं जातं. “बदकाच्या पंखानुसार – डाव्या आणि उजव्या – आणि पंखाच्या कोणत्या भागातली आहेत त्यावरून आम्ही पिसांची एक ते सहा अशी प्रतवारी करतो. प्रत्येक पंखातली केवळ पाच-सहा पिसंच आमच्या कामी येतात,” रणजीत सांगतो.
“एका शटलला १६ पिसं लागतात आणि ती सगळी एकाच पंखाची हवीत, त्यांचा दांडा (पिच्छ-दंड) एकसारखा पाहिजे, दोन्ही बाजूच्या पात्याची जाडी आणि बाक सारखा हवा,” नबोदा सांगतात. “नाही तर शटल हवेत भिरभिरेल.”
“सामान्य माणसाला सगळी पिसं सारखीच वाटतात. पण आम्ही नुसतं स्पर्शाने त्यातला फरक सांगू शकतो,” ते पुढे म्हणतात.
इथे तयार होणारी पिसं कोलकात्यातल्या स्थानिक बॅडमिंटन क्लबमध्ये तसंच पश्चिम बंगाल, मिझोरम, नागालॅंड आणि पुडुच्चेरीतल्या ठोक विक्रेत्यांनाही विकली जातात. “मोठ्या स्पर्धांसाठी योनेक्स या जपानी कंपनीच्या शटलनी पूर्ण बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांची शटल्स हंसाच्या पिसांची असतात, आम्ही त्यांच्यापुढे टिकूच शकत नाही,” नबोदा सांगतात. “साध्या स्पर्धांमध्ये आणि सरावासाठी नव्याने शिकत असलेले लोक आमची शटल्स वापरतात.”
भारतात चीन, हाँग काँग, जपान, सिंगापूर, तैवान आणि इंग्लंडमधूनही शटल्स आयात केली जातात. एप्रिल २०१९ ते मार्च २०२१ या काळात देशात आयात झालेल्या शटल्सचं मूल्य १२२ कोटी असल्याचं भारत सरकारच्या वाणिज्यविषयक माहिती व सांख्यिकी संचलनालयाच्या एका अहवालातून समजतं. “हिवाळ्यात मागणी प्रचंड वाढते कारण हा खेळ शक्यतो बंदिस्त वातावरणात खेळला जातो,” नबोदा सांगतात. त्यांच्या कारखान्यात वर्षभर उत्पादन सुरू असलं तरी सप्टेंबरपासून त्यात मोठी वाढ होते.
*****
कारखान्यातल्या दोन खोल्यांमध्ये चटयांवर मांडी घालून हे कारागीर काम करतात. शटल तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मान खाली घालूनच काम करावं लागतं. त्यांची सराईत बोटं आणि एकाग्रचित्त कशानेच थांबत नाहीत. वाऱ्याची झुळूक येऊन तिथली पिसं उडाली तरच त्यांची नजर ढळते.
दररोज सकाळी नबोदांच्या पत्नी कृष्णा मैती घरातली पूजा झाली की जिना उतरून खाली येतात. कारखान्याच्या दोन्ही खोल्यांमध्ये देवाचं काही म्हणत कानाकोपऱ्यात त्या उदबत्ती फिरवतात. सकाळच्या हवेत त्याचा दरवळ भरून राहतो.
कारखान्यातलं काम सुरू होतं ६३ वर्षीय शंकर बेडांपासून. ते गेलं वर्षभर इथे कामाला आहेत. एकेक पीस दोन कात्र्यांच्या यंत्रावर बरोबर तीन इंच लांबीत ते कापतात. “सहा ते दहा इंच लांब असणारी सगळी पिसं एकसारख्या लांबीत कापली जातात,” ते सांगतात.
“पिसाच्या मधला दांडा खूप कडक असतो. तो छाटला जातो. अशा कापलेल्या सोळा पिसांपासून शटल बनतं,” शंकर दा सांगतात. पिसांचे तुकडे एका प्लास्टिकच्या टोपल्यात टाकतात. ते पुढच्या कामासाठी चार कारागिरांकडे पाठवलं जातं.
प्रोल्हाद पाल, वय ३५, मोंटू पार्थो, वय ४२, भबानी अधिकारी, वय ५० आणि लिखोन मांझी, वय साठ तीन इंच लांबीच्या या पिसांच्या तुकड्यांना आकार देण्याचं पुढचं काम करतात. आपल्या मांडीवरच्या लाकडी ट्रेमध्ये ते पिसं ठेवतात.
“पिसाचा खालचा दांडा पूर्णच कापून टाकला जातो. पातं एका बाजूने गोल आकारात कापलं जातं आणि दुसरी बाजू सरळ ठेवली जाते,” हातातल्या कात्रीने ही कलाकारी कशी करायची ते प्रोल्हाद पाल दाखवतात. एका पिसाला आकार द्यायला त्याला सहा सेकंद पुरतात. पिसं कापणारे आणि त्यांना आकार देण्याचं काम करणाऱ्यांना १,००० पिसांमागे १५५ रुपये मजुरी मिळते, म्हणजेच एका शटलमागे पावणेतीन रुपये.
“पिसांना वजन नसलं तरी त्यांचा दांडा कडक आणि चिवट असतो. दर १०-१५ दिवसांनी आम्हाला गावातल्या लोहाराकडून कात्र्यांना धार लावून घ्यायला लागते,” नबोदा सांगतात.
तिथे ४७ वर्षीय संजीब बोदक कॉर्कच्या अर्धवर्तुळाकार तुकड्यांना हाताने चालवण्यात येणाऱ्या एका यंत्राने भोकं पाडतायत. शटल तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरलं जाणारं हे एकमेव यंत्र. हात आणि डोळ्याच्या अचूकतेच्या आधारे ते प्रत्येक कॉर्कला एकसारख्या अंतरावर १६ भोकं पाडतात. या कामासाठी प्रत्येक कॉर्कमागे त्यांना ३ रुपये २० पैसे मिळतात.
“दोन प्रकारचे कॉर्क वापरले जातात. मेरठ आणि जालंधरमधून कृत्रिम बूच येतं आणि चीनमधून नैसर्गिक,” संजीबदा सांगतात. “नैसर्गिक बुचाचा वापर चांगल्या दर्जाच्या पिसांसोबत केला जातो,” ते सांगतात. गुणवत्तेप्रमाणे किंमतीतही फरक पडतोच. “कृत्रिम बुचासाठी एका तुकड्यामागे एक रुपया तर नैसर्गिक बुचासाठी पाच रुपये खर्च येतो,” ते सांगतात.
बुचाच्या अर्धगोल तुकड्यांवर भोकं पाडून झाली की हे तुकडे आणि आकार दिलेले पिसांचे तुकडे पुढे पाठवले जातात. तापोश पोंडित, वय ५२ आणि श्यामशुंदोर घोरोई, वय ६० हे निष्णात कारागीर कॉर्कच्या तुकड्यावर पिसं बसवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम करतात.
पिसाचं बूड नैसर्गिक डिंकात बुडवायचं आणि कॉर्कवरच्या एकेक भोकात बसवत जायचं हे त्यांचं काम. “पिसाचं प्रत्येक काम अगदी शास्त्रीय पद्धतीने होतं. कुठेही काही चूक, दिरंगाई झाली तर शटल कसं उडतं, त्याचं फिरण, दिशा सगळ्यावर परिणाम होऊ शकतो,” नबोदा सांगतात.
“पिसं एका विशिष्ट कोनात बसवावी लागतात आणि प्रत्येक पिसासाठी तो सारखा असायला लागतो. शोन्ना (चिमटा) वापरून हे काम केलं जातं,” तापोश दा हे करूनच दाखवतात. गेली तीस वर्षं ते हे काम करतायत आणि त्यातूनच त्यांच्या कामात इतकी सफाई आली आहे. ते आणि श्यामशुंदोर यांना शटल भरलेल्या दंडगोलाकार बॉक्सनुसार मजुरी मिळते. एका बॉक्समध्ये १० शटल आणि एका बॉक्समागे १५ रुपये.
कॉर्कच्या तुकड्यांमध्ये पिसं बसवली की शटल शटलसारखं दिसू लागतं. त्यानंतर दोऱ्याने पहिली बांधणी करण्यासाठी शटल ४२ वर्षीय तारोख कोयाल यांच्याकडे पाठवली जातात. “हा दोरा गावातच विकत मिळतो. नायलॉन आणि सुताचा मिश्र धागा असल्याने तो जास्त मजबूत असतो,” तारोख दा सांगतात. एका हातात दोन्ही टोकांची गाठ मारलेला दहा इंची दोरा आणि दुसऱ्या हातात पिसं बसवलेलं शटल घेऊन त्यांचं काम सुरू होतं.
१६ पिसांच्या शटलची बांधणी करण्यासाठी त्यांना फक्त ३५ सेकंद वेळ लागतो. “प्रत्येक पीस नीट पक्कं बसावं म्हणून गाठ घातली जाते आणि त्यानंतर दोन पिसांच्या मध्ये दोन वेटोळी घेऊन पक्की वीण घातली जाते,” तारोख दा सांगतात.
त्यांचे हात इतक्या वेगाने फिरतात की स्पष्टपणे काही दिसतच नाही. १६ गाठी आणि ३२ वेटोळे घातल्यानंतरही अगदी शेवटची गाठ घालून दोऱ्याची टोकं कापून टाकल्यावरच वीण स्पष्ट दिसते. या कामाचे १० शटलमागे त्यांना ११ रुपये मिळतात.
पन्नासीचे प्रभाश श्याश्मल प्रत्येक शटलची पिसं आणि शिवण व्यवस्थित आहे ना हे एकदा पाहून घेतात. गरज भासल्यास ठीकठाक करून ते शटलबॉक्स भरतात आणि संजीब यांच्याकडे देतात. ते दोऱ्याला आणि साफ केलेल्या दांड्याला कृत्रिम डिंक आणि कडक होण्यासाठी एक द्रव लावतात. यामुळे शटलची ताकद वाढते.
पूर्ण सुकल्यानंतर शटलवर कंपनीचं नाव लावलं जातं. “आम्ही अडीच इंचाची कंपनीचं नाव असलेली निळ्या रंगाची पातळ पट्टी बुचाच्या टोकावर लावतो आणि पिसांच्या बुडावर एक गोल स्टिकर चिकटवतो,” संजीब सांगतात. त्यानंतर प्रत्येक शटलचं वजन केलं जातं आणि सगळ्या शटलबॉक्सचं वजन साधारण सारखं असेल याकडे लक्ष दिलं जातं.
*****
“आपल्याला सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूने तीन ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली आहेत. बॅडमिंटनची लोकप्रियता आता वाढत चालली आहे,” ऑगस्ट २०२३ मध्ये पारीशी बोलत असताना नबोदा म्हणाले होते. “पण उलुबेडियामध्ये तरुण मंडळी हवेत झेपावणारी ही फुलं तयार करण्याची कला शिकले जरी तरी खेळाडूंसारखी त्यांच्या भविष्याची फारशी काही शाश्वती देता येत नाही.”
पश्चिम बंगाल सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय संचलनालयाने उलुबेडिया नगरपालिका शटलक़क उत्पादन केंद्र असल्याचं नमूद केलं आहे. पण नबोदा सांगतात, “मात्र आमच्या भागाला क्लस्टर म्हणून मान्यता मिळाली असली तरी काहीही बदल झालेला नाही. सगळा फक्त दिखावा आहे. आम्ही सगळं आमचं आम्हीच करतोय.”
२०२० साली जानेवारी महिन्यात पिसांपासून शटल तयार करणाऱ्या उद्योगांना एक जोरदार झटका बसला. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या या खेळाचं व्यवस्थापन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने खेळाच्या सगळ्या स्तरांवरच्या स्पर्धांमध्ये कृत्रिम साहित्यापासून तयार करण्यात येणाऱ्या शटलच्या वापराला मान्यता दिली. टिकाऊपणा आणि “आर्थिक व पर्यावरणीय दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे” तसंच खेळाच्या “दीर्घकालीन शाश्वततेचा विचार” करून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर बॅडमिंटन खेळाचे नियम कलम २.१ मध्ये “शटल नैसर्गिक किंवा कृत्रिम साहित्यापासून तयार करण्यात येईल” असा बदल करण्यात आला.
“प्लास्टिक किंवा नायलॉल पिसांची स्पर्धा तरी करू शकतं का? आता या खेळाचं काय होणार सांगू शकत नाही, पण जर जागतिक पातळीवर असा निर्णय घेतला गेला असेल तर आता आम्ही किती टिकाव धरू शकू काही सांगू शकत नाही,” नबोदा. “कृत्रिम शटल बनवण्याचं कौशल्य किंवा तंत्रज्ञान आमच्याकडे नाहीच.”
“आजच्या घडीला बहुतेक कारागीर मध्यमवयीन किंवा वयस्क आहेत. तीस वर्षांचा अनुभव आहे त्यांच्यापाशी. मात्र पुढची पिढी काही त्यांची उपजीविका म्हणून या कामाकडे वळत नाहीये,” ते म्हणतात. अत्यंत तुटपुंजा मोबदला, पिसांचं काम करण्यासाठी लागणारं कौशल्य मिळवण्यासाठी करावं लागणारं कित्येक तासांचं काम यामुळे तरुण पिढी या कामात येत नाही.
“चांगल्या पिसांचा पुरवठा व्हावा किंवा किंमतीवर नियंत्रण असावं तसंच अद्ययावत तंत्रज्ञान या कामात याव यासाठी सरकारने काही पाऊल उचललं नाही तर या उद्योगाचा अस्त व्हायला वेळ लागणार नाही,” नबोदा सांगतात.
आद्रिश मैती यांनी या वार्तांकनासाठी बहुमोल मदत केली आहे. त्यांचे आभार.
मृणालिनी मुखर्जी फौंडेशनकडून मिळालेल्या फेलोशिप अंतर्गत हे वार्तांकन करण्यात आलं आहे.