“बिजू असतो ना तेव्हा आम्ही सगळे पहाटे उठतो आणि फुलं वेचायला जातो. त्यानंतर नदीत फुलं सोडायची आणि एक डुबकी घ्यायची. त्यानंतर गावातल्या प्रत्येक घरी जायचं आणि एकमेकांच्या गाठीभेटी घ्यायच्या,” जया सांगतात. पन्नास वर्षं होऊन गेली. पण या आठवणी आजही अगदी ताज्या आहेत.

“मग प्रत्येक घरी एक मूठभर तांदूळ भेट द्यायचा. त्यांनी दिलेली लांगी [तांदळापासून बनवलेली बियर] चाखायची. प्रत्येक घरी अगदी दोन-चारच घोट घ्यायचे. पण इतक्या घरांना भेटी द्यायच्या असतात की दिवसाखेर आम्ही चांगलेच हवेत असतो,” त्या म्हणतात. “त्याच दिवशी गावातली तरुण मंडळी वडिलधाऱ्यांप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना नदीच्या पाण्याने न्हाऊ घालतात.” वर्षाचं स्वागत करण्यासाठीच्या या सणाविषयी बोलताना जयांचा चेहरा खुलतो.

आज दोन देशांच्या सीमेपल्याड, घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहिलीये ती फक्त लांगी. चकमा आदिवासी असणाऱ्या अनेक निर्वासितांना एका धाग्यात बांधणारी लांगी. “आमच्या संस्कृतीचा भाग आहे ती,” त्या म्हणतात. जया बांग्लादेशच्या रोंगोमतीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. इथले इतर आदिवासी समूह देखील आपल्या अनेक कर्मकांडामध्ये आणि देवाचा प्रसाद म्हणून लांगी वापरतात.

“माझे आई-वडील लांगी बनवायचे ती मी पाहत असे. माझं लग्न झालं आणि मग मी आणि माझा नवरा सुरेन, आम्ही दोघं लांगी बनवायला लागलो,” त्या सांगतात. या दोघांना तीन प्रकाच्या बियर बनवता येतात. लांगी, मोड आणि जोगोरा.

जोगोरासुद्धा तांदळापासूनच बनते. बंगाली पंचांगानुसार चैत्र हा शेवटचा महिना. त्याच्या पहिल्या दिवशी जोगोरा बनवण्याची तयारी सुरू होते. “आम्ही बिरोइन चाल [उत्तम दर्जाचा चिकट भात] वापरतो. अनेक आठवडे बांबूमध्ये तो आंबवून घेतल्यानंतर त्याचा अर्क काढला जातो. पण आजकाल आम्ही जोगोरा फारशी बनवत नाही,” जया सांगतात. ही बियर करायला एक महिना लागतो आणि त्याला लागणाऱ्या तांदळाचे भावही वाढले आहेत. “पूर्वी आम्ही झूम शेतीत हा तांदूळ पिकवायचो. पण आता मात्र या भाताखालची जमीन कमी व्हायला लागलीये.”

PHOTO • Amit Kumar Nath
PHOTO • Adarsh Ray

डावीकडेः बियर तयार करण्यासाठी लागणारी भांडी, पातेली आणि स्टोव्ह – आणि एका बाजूला असलेला मोडचा स्टँड. उजवीकडेः त्रिपुरातली बांबूच्या भिंती असलेली घरं आणि दुकानं

या दोघाचं घर त्रिपुराच्या उनाकोटी जिल्ह्यात आहे. देशातल्या सर्वात लहान राज्यांमध्ये त्रिपुराचा दुसरा क्रमांक लागतो. त्यातला दोन तृतीयांश भाग वनांनी व्यापलेला आहे. शेती हा इथला मुख्य व्यवसाय आणि गौण वनोपज विकून वरचे चार पैसे लोकांकडे येतात.

“आम्हाला घर सोडावं लागलं तेव्हा मी अगदी काही वर्षांची होते. आमच्या अख्ख्या समुदायाला सगळं सोडून यावं लागलं,” जया सांगतात. तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मध्ये असलेल्या चिट्टगाँगमध्ये कर्णफुली नदीवर एक धरण बांधलं जात होतं आणि त्यासाठी त्यांना घरं सोडावी लागली. “अन्न नाही, पैसा नाही. मग आम्ही अरुणाचल प्रदेशात एका शिबिरात आसरा घेतला... त्यानंतर काही वर्षांनी आम्ही त्रिपुराला आलो,” जया सांगतात. कालांतराने इथलेच रहिवासी असलेल्या सुरेन यांच्याशी त्यांचं लग्न झालं.

*****

लांगी बियर एकदम लोकप्रिय आहे. अनेक आदिवासी समुदायांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सणसमारंभांमध्ये तिला महत्त्वाचं स्थान आहे. आदिवसी बाया ती तयार करतात. मात्र या दारूला ‘अवैध’ असा शिक्का मारण्यात आल्यामुळे ती बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या बायांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून त्रास सहन करावा लागतो.

जया सांगतात की एका वेळची दारू गाळण्यासाठी किमान दोन-तीन दिवस लागतात. “हे सोपं काम नाहीये. या कामामुळे रोजच्या घरच्या कामासाठी सुद्धा वेळ मिळत नाही,” त्या सांगतात. दुपारचा सूर्य आग ओकतोय. त्यापासून काही क्षण तरी सावलीत बसून आपल्या हुक्क्यातून शांतपणे झुरके मारत जया आमच्याशी बोलत होत्या.

लांगी अनेक पदार्थांपासून बनवली जाते आणि त्यामुळेच तिची चव, गंध वेगवेगळा असतो आणि प्रत्येक समुदायाच्या लांगीचा स्वादही वेगळा असतो असं २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या जर्नल ऑफ एथिकल फूडच्या अंकात म्हटलेलं आहे. “प्रत्येक समुदायाची लांगी बनवण्याची एक खास पद्धत आहे. आता बघा, आम्ही जी लांगी गाळतो ती रेआंग समुदायाच्या लांगीपेक्षा जास्त कडक असते,” सुरेन सांगतात. रेआंग त्रिपुरामधली दुसऱ्या क्रमांकाची आदिवासी जमात आहे.

लांगी बनवण्याची पहिली पायरी म्हणजे तांदूळ जाडसर भरडून घेतला जातो. “डेगचीमध्ये एका वेळी ८-१० किलो सिद्धो चाल शिजत घालायचा. पण तो जास्त शिजवायचा नाही बरं.”

PHOTO • Adarsh Ray
PHOTO • Adarsh Ray

तांदूळ उकळून घेणे ही लांगी बनवण्याची पहिली पायरी. मातीच्या चुलीवरच्या ल्युमिनियमच्या मोठाल्या भांड्यामध्ये जया तांदूळ शिजू घालतात

PHOTO • Adarsh Ray
PHOTO • Adarsh Ray

शिजत आलेला तांदळाची वाफ जाऊन तो गार करण्यासाठी ताडपत्रीवर पसरून टाकतात. त्यानंतर तो आंबवला जातो. त्यासाठी त्यात आंबवण मिसळतात

पाच किलो तांदळापासून दोन लिटर लांगी आणि जराशी जास्त मोड बनते. ३५० मिलीची बाटली किंवा ग्लास (९० मिली) अशा मापात ती विकतात. लांगी १० रुपये ग्लास तर मोड २० रुपये ग्लास भावाने विकली जाते.

सुरेन म्हणतात, “सगळ्या गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. १० वर्षांपूर्वी एक क्विंटल तांदूळ १,६०० रुपयांना मिळत होता. आज त्याचा भाव ३,००० झालाय.” तांदूळच नाही तर गरजेच्या सगळ्याच गोष्टींच्या किंमती गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढल्या आहेत.

त्यांच्या या खास मदिरेबद्दल जया सांगू लागतात आणि आम्ही शांत बसून ते टिपू लागतो. शिजलेला भात वाफ जावी म्हणून चटई किंवा ताडपत्रीवर पसरून टाकला जातो. एकदा का भात गार झाला की तो आंबण्यासाठी म्हणून त्यात मूली घातली जाते. आणि दोन-तीन दिवस तो आंबू दिला जातो. अर्थात यासाठी किती वेळ लागणार हे मात्र हवामानावर अवलंबून असतं. “कडक उन्हाळ्यामध्ये रात्रभर भात आंबला तरीही पुरेसं आहे. पण हिवाळ्यात मात्र जास्त दिवस लागू शकतात,” जया सांगतात.

भात नीट आंबला की “त्यात पाणी घालायचं आणि एकदा उकळायचं सगळं. त्यानंतर ते द्रव्य गाळून घ्यायचं, ही झाली लांगी,” त्या सांगतात. मोड मात्र अर्क काढून करावी लागते. त्यासाठी तीन थाळ्या एकीवर एक ठेवल्या जातात आणि बाष्पीभवनाची प्रकिया वापरून मोड काढली जाते. यात आंबवण्यासाठी कुठलाही कृत्रिम पदार्थ किंवा यीस्ट वगैरे वापरलं जात नाही.

लांगी आणि मोड या दोन्हींमध्ये अनेक वनस्पती वापरल्या जातात. पाथार डागार ही एक उंचावर फुलणारी वनस्पती आहे. त्यासोबत आगचीची पानं, जिन जिन नावाच्या एका हिरव्यागार झाडाची फुलं आणि सोबत गव्हाची कणीक, लसूण आणि ओली हिरवी मिरी. “या सगळ्यापासून छोट्या मूली बनवल्या जातात. हे सगळं आधीच बनवून साठवून ठेवलं जातं,” जया सांगतात.

PHOTO • Adarsh Ray
PHOTO • Adarsh Ray

भात आंबण्याची प्रक्रिया गतीने व्हावी यासाठी जया मूली वाटून भातात घालतात. उजवीकडेः ४८ तास आंबल्यानंतर मिश्रण असं दिसतं

PHOTO • Adarsh Ray
PHOTO • Adarsh Ray

आंबवण्यासाठी कुठलाही कृत्रिम पदार्थ यात घातला जात नाही. उलट अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडाची फुलं, पानं, गव्हाची कणीक, लसूण आणि ओली हिरवी मिरी यामध्ये वापरली जाते

“इतर दारू कशी भाजते तसं हिचं नाही. तिचा आंबूसपणा एकदम वेगळा असतो. उन्हाळ्यात तर इतकं थंड वाटतं. गंधही एकदम मस्त,” एक गिऱ्हाईक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणतो. आम्ही भेटलो त्यातल्या बऱ्याच जणांनी फोटो काढू दिला नाही, फार जास्त गप्पाही मारल्या नाहीत. कायद्याची भीती असावी कदाचित.

*****

लांगी गाळणाऱ्यांचं म्हणणं आहे की आता या प्रकारची दारू बनवणं जास्तच अवघड व्हायला लागलंय. त्रिपुरा एक्साइज कायदा, १९८७ ने आंबवलेल्या तांदळापासून दारू बनवण्यावर बंदी आणली आहे.

“आम्ही जगणार तरी कसं? इथे ना कुठला उद्योग आहे ना इतर कुठल्या संधी... मग एखाद्याने काय करायचं? तुम्हीच बघा जरा आजूबाजूला आणि लोक कसे जगतायत त्याचा कानोसा घ्या.”

जास्त प्रमाणात या बियरचं उत्पादन शक्यच नाहीये. आपल्याकडे पाचच भांडी आहेत त्यामुळे एका वेळी ८-१० किलोहून जास्त भाताची लांगी करता येत नाही अशी त्यांची अडचण आहे. पाणीसुद्धा पुरेसं मिळत नाही. उन्हाळ्यात परिस्थिती आणखीच बिकट होते. शिवाय, “आम्ही हे सगळं फक्त चुलीवर करतो. आणि भरपूर जळण लागतं. दर महिन्याला ५,००० रुपये फक्त जळणावर खर्च होतात,” त्या सांगतात. गॅसच्या किंमती इतक्या जास्त वाढल्या आहेत की तो पर्यायच शक्य नाहीये.

“आम्ही दहा वर्षांपूर्वी दुकान टाकलं. त्याशिवाय मुलांना शिकवणं देखील शक्य झालं नसतं,” जया सांगतात. “आमची एक खानावळ पण होती. पण बरेच लोक खाऊन जायचे आणि पैसे थकवून ठेवायचे. मग आम्ही ते बंद करून टाकलं.”

PHOTO • Adarsh Ray
PHOTO • Adarsh Ray

लांगी गाळणाऱ्यांचं म्हणणं आहे की आता या प्रकारची दारू बनवणं जास्तच अवघड व्हायला लागलंय. त्रिपुरा एक्साइज कायदा, १९८७ ने आंबवलेल्या तांदळापासून दारू बनवण्यावर बंदी आणली आहे.

“आम्ही जगणार तरी कसं? इथे ना कुठला उद्योग आहे ना इतर कुठल्या संधी... मग एखाद्याने काय करायचं? तुम्हीच बघा जरा आजूबाजूला आणि लोक कसे जगतायत त्याचा कानोसा घ्या.”

जास्त प्रमाणात या बियरचं उत्पादन शक्यच नाहीये. आपल्याकडे पाचच भांडी आहेत त्यामुळे एका वेळी ८-१० किलोहून जास्त भाताची लांगी करता येत नाही अशी त्यांची अडचण आहे. पाणीसुद्धा पुरेसं मिळत नाही. उन्हाळ्यात परिस्थिती आणखीच बिकट होते. शिवाय, “आम्ही हे सगळं फक्त चुलीवर करतो. आणि भरपूर जळण लागतं. दर महिन्याला ५,००० रुपये फक्त जळणावर खर्च होतात,” त्या सांगतात. गॅसच्या किंमती इतक्या जास्त वाढल्या आहेत की तो पर्यायच शक्य नाहीये.

“आम्ही दहा वर्षांपूर्वी दुकान टाकलं. त्याशिवाय मुलांना शिकवणं देखील शक्य झालं नसतं,” जया सांगतात. “आमची एक खानावळ पण होती. पण बरेच लोक खाऊन जायचे आणि पैसे थकवून ठेवायचे. मग आम्ही ते बंद करून टाकलं.”

PHOTO • Amit Kumar Nath
PHOTO • Rajdeep Bhowmik

डावीकडेः अर्क काढण्यासाठी तीन भांडी हवाबंद करून एकावर एक ठेवली जातात. ती आतून जोडलेली असतात. वाफेद्वारे तयार होणारा अर्क एका पाईपमधून गोळा केला जातो. उजवीकडेः बाटलीत भरून ठेवलेली लांगी पिण्यासाठी तयार

हे काम करणाऱ्या आणखी एक जण लता (नाव बदललं आहे) सांगतात की इथले आसपासचे सगळे जण बौद्ध आहेत आणि “आम्ही पूजा आणि नवीन वर्षाच्या सणामध्ये लांगी वापरतो. काही विधींमध्ये देवाला प्रसाद म्हणून तिचा वापर होतो.” गेल्या काही वर्षांपासून लता यांनी लांगी गाळणं थांबवलं आहे कारण काहीच पैसा सुटत नाही.

जया आणि सुरेन यांना देखील घटत चाललेल्या कमाईची चिंता आहे. वय वाढत जातंय तसं काही तरी दुखणी खुपणी निघत असतात. “माझी नजर अधू आहे आणि अधून मधून मला सांधेदुखीचा त्रास होतो. माझ्या पायाला सारखीच सूज येते.”

ओषधोपचारासाठी ते आसाममधल्या दवाखान्यांमध्ये जातात. कारण त्रिपुरात सरकारी आरोग्यसेवा मिळण्यासाठी फार वाट पहावी लागते. खरं तर त्यांच्यासारख्या गरीब जनतेसाठी प्रधान मंत्री जम आरोग्य योजना आहे आणि त्यामध्ये पाच लाखांपर्यंतचे उपचार होऊ शकतात पण त्यांचा काही सरकारी आरोग्यसेवेवर विश्वास नाही. त्यामुळे ते प्रवास करून आसामच्या हॉस्पिटलमध्ये जातात. “येऊन जाऊन प्रवासावर ५,००० रुपये खर्च होतात,” जया सांगतात. तपासण्यांवरही बराच पैसा खर्च होतो.

आम्ही निघण्याची वेळ होते. जया स्वयंपाकघरातली सगळी आवरासावर करतात आणि सुरेन जळण लावून ठेवतात. उद्या सकाळी पुन्हा चूल पेटणार आणि पुन्हा लांगीचा दरवळ हवेत पसरणार.

या वार्तांकनाला मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे सहाय्य मिळाले आहे.

Rajdeep Bhowmik

Rajdeep Bhowmik is a Ph.D student at IISER, Pune. He is a PARI-MMF fellow for 2023.

यांचे इतर लिखाण Rajdeep Bhowmik
Suhash Bhattacharjee

Suhash Bhattacharjee is a PhD scholar at NIT, Silchar in Assam. He is a PARI-MMF fellow for 2023.

यांचे इतर लिखाण Suhash Bhattacharjee
Deep Roy

Deep Roy is a Post Graduate Resident Doctor at Safdarjung Hospital, New Delhi. He is a PARI-MMF fellow for 2023.

यांचे इतर लिखाण Deep Roy
Photographs : Adarsh Ray
Photographs : Amit Kumar Nath
Editor : Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

यांचे इतर लिखाण Priti David