तर, सुरुवात करुया?
२०१४ साली भारताचं वैविध्य आणि बहुपेडी जगणं नोंदवण्याचं काम पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया अर्थात पारीने सुरू केलं. आणि त्याच्या गाभ्याशी होत्या भाषा. गावपाड्यात राहणाऱ्या ८३ कोटीहून अधिक लोकांच्या तोंडी असणाऱ्या ७०० वेगवेगळ्या भाषा. ८६ लिप्यांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या काही आणि लिपीच नसणाऱ्याही काही. या बोली आणि भाषांशिवाय लोकांच्या जगण्याचा संग्रह कसा तयार होणार? अशी कल्पना तरी करता येईल का? त्यामुळे विविध भाषांमधले अनुवाद पारीवरच्या प्रत्येक मजकुरासाठी मोलाचे आहेत.
“पत्रकारितेच्या क्षेत्राचा विचार करता पारीचा हा संग्रह सामाजिक न्यायाच्या अंगाने अनुवादाकडे पाहतो,” स्मिता खटोर सांगते. “ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार केवळ इंग्रजी बोलणाऱ्या, इंग्रजीतून शिकलेल्यांची मक्तेदारी राहणार नाही हे आम्ही सुनिश्चित करतो. भारतातले बहुसंख्य लोक इंग्रजीपासून कित्येक प्रकाशवर्षं दूर असताना हे फार महत्त्वाचं ठरतं.”
आमचे अनुवादक आणि भाषा संपादक शब्दांचे सांस्कृतिक संदर्भ, योग्य-अयोग्य वापर या सगळ्याबद्दल कायम चर्चा करतात, वाद घालतात आणि आपली मतं मांडतात. एक दिवस अशाच गप्पा रंगल्या होत्या...
स्मिताः पुरुषोत्तम ठाकूर यांची ती गोष्ट आठवते? कुरुमपुरी पंचायतीतले लोक तेलंगणातल्या वीटभट्टीवर कामासाठी गेले होते. पुरु दा त्यांना तिथे भेटले असता त्यातले एक वयस्क काका त्यांना म्हणतात, ‘ओडिया बोलणारं कुणी तरी फार दिवसांनी भेटलं. बरं वाटलं तुम्हाला भेटून!’
महाराष्ट्रातून ज्योती शिनोळी स्थलांतरिl मजुरांच्या मुलांबद्दल लिहिते. रघू नावाचा एक मुलगा नव्या शाळेत जायला राजी नसतो. तिथले शिक्षक आणि मुलं त्याला न समजणाऱ्या भाषेत बोलत असतात. त्याची आई गायत्री सांगते, ‘चेन्नईत तो फक्त तीन आठवडे शाळेत गेला. एक दिवस रडत घरी आला. म्हणाला, त्याला शाळेत जायचंच नाहीये. एक तर त्याला तिथे काय बोलतायत ते समजत नाही आणि सगळे जण रागावून बोलतायत असं वाटतं.’
गावपाड्यातल्या लोकांसाठी भाषेतून मिळणारी ओळख फार मोलाची आहे. खास करून पोटापाण्यासाठी लोकांना दूरदेशी जावं लागतं तेव्हा तर भाषाच त्यांची स्वतःची ओळख असते.









