मीना मेहेर यांच्याकडे बिलकुल म्हणून वेळ नाही. त्या पहाटे ४ वाजता आपल्या गावच्या, सातपाटीच्या ठोक मासळी बाजारात पोचतात. बोटीच्या मालकांसाठी माशाचा लिलाव सुरू असतो. तिथून ९ वाजेपर्यंत घरी आलं की त्या अंगणात थर्मोकोलच्या खोक्यांमध्ये मासे साफ करून खारवून ठेवतात. एक-दोन आठवड्यानंतर ते बाजारात विकले जातील. संध्याकाळी त्या बस किंवा शेअर रिक्षा करून १२ किलोमीटरवर पालघरच्या बाजारात सुकट विकायला जातात. आणि काही माल उरलात तर त्या सातपाटीतच संध्याकाळच्या बाजारात विकून येतात.
पण लिलावाच्या बोटींची संख्या आता कमी कमी व्हायला लागलीये. आणि त्यामुळे सुकवायला मासळी कमी पडायला लागलीये. “मासळीच नाही, विकायचं तरी काय?” कोळी समुदायाच्या ५८ वर्षीय मीना विचारतात. हा समुदाय महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणूनच आता त्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करू लागल्या आहेत. पावसाळा संपला की त्या बोटीच्या मालकांकडून किंवा सातपाटीतल्या ठोक व्यापऱ्यांकडून ताजी मासळी विकत घेतात आणि थोडी फार कमाई होईल या आशेत ती विकतात. (त्यातून त्यांची किती कमाई होते त्याचे तपशील मात्र त्यांनी आम्हाला सांगितले नाहीत.)
घरच्या कमाईत थोडी फार भर घालावी यासाठी त्यांचे पती उल्हास मेहेर, वय ६३ हे देखील आता अधिकचं काम करू लागले आहेत. ते ओएनजीसीच्या सर्वेक्षण बोटींवर सर्वेक्षक आणि नमुना संकलक म्हणून जातात. पूर्वी ते मुंबईच्या मोठ्या मासेमारी बोटींवर वर्षांतले दोन महिने काम करायचे, आता ते ४-६ महिने काम करतात.
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातलं सातपाटी ‘गोल्डन बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनारी पट्ट्यात येतं. हा पट्टा माशांच्या प्रजननासाठी आणि इथल्या खास बोंबीलसाठी प्रसिद्ध आहे. पण आजकाल बोंबील जास्त मिळत नाही. डहाणू-सातपाटीच्या पट्ट्यात १९७९ साली ४०,०६५ टन बोंबील मिळाला होता. तो विक्रम मोडणं तर दूरच मासळी इतकी घटली आहे की २०१८ साली केवळ १६,५६७ टन इतका बोंबील या पट्ट्यात मिळाला आहे.










