“सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याचे उपाय मी शोधत असतो.”
सुनील कुमार ठठेरा म्हणजेच त्वष्टा-तांबट आहेत. “इतर कुणालाही दुरुस्त करता येत नाहीत अशा वस्तू-भांडी लोक आमच्याकडे घेऊन येतात. कधी कधी तर मेकॅनिक त्यांची अवजारं देखील आमच्याकडे घेऊन येतात.”
स्वयंपाकघरात किंवा घरगुती वापराची तांब्याची, पितळी किंवा काश्याची भांडी किंवा वस्तू तयार करणं हा त्यांचा परंपरागत व्यवसाय. “आजकाल कुणाला आपले हात खराब करून घ्यायचे नाहीयेत,” ४० वर्षीय सुनील कुमार सांगतात. गेली २५ वर्षं ते तांबट व्यवसायात आहेत. “दिवसभर मी ॲसिड, कोळशाचं काम करत असतो. निखारे आणि आगीत. मी करतो कारण मला वेड आहे या कामाचं.”
पंजाबमध्ये ठठेरा (यांना ठठियारही म्हणतात) इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडतात. लोखंड सोडून इतर धातूंपासून विविध वस्तू तयार करण्याचा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. दाराचे कडी कोयंडे, कुलुपंही ते बनवतात. वडील ६७ वर्षीय केवल क्रिशन यांच्यासोबत ते काम करतात. भंगारमधून लागेल ते साहित्य विकत घेऊन ते दुरुस्तीच्या कामासाठी ते वापरतात.
गेल्या काही दशकांमध्ये स्टीलच्या भांड्यांचा वापर जास्त वाढला आणि हाताने भांडी बनवणाऱ्यांच्या पोटावर पाय आला. आज स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी जास्तकरून स्टीलची आहेत. तांब्याची आणि पितळेची भांडी महाग असल्याने त्यांची मागणीही झपाट्याने घटली.




















