बलदेव कौर, ७०, एकेकाळी आपल्या कुटुंबाने शेतजमिनीवर बांधलेल्या घराच्या अवशेषांमधून मार्ग काढत होत्या. अजूनही शाबूत असलेल्या खोल्यांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्यात.
पाऊस आणि गारपिटीने छताला तडे गेल्यावर आम्ही सर्वांनी रात्र जागून काढली. काय होतंय आम्हाला समजतच नव्हतं,” बलदेव कौर म्हणाल्या. अंगात सुती सलवार कमीज आणि एका दुपट्ट्याने आपले राखाडी केस झाकले होते. “मग सकाळी जेव्हा छतावरून पाणी गळायला लागलं तेव्हा आम्ही सगळे बाहेर पळत सुटलो.”
जसजसा सूर्य बाहेर आला तसतसं घर कोसळू लागलं, बलदेव यांची धाकटी सून, अमनदीप कौर, 26, सांगते. “सरे पासे घर ही पाट गया. [आमच्या भोवती सगळं घर उध्वस्त झालं],” बलदेव यांचा मोठा मुलगा, ३५ वर्षीय बलजिंदर सिंह म्हणतो.
बलदेव कौर आणि त्यांच्या सात जणांच्या कुटुंबाने, ज्यात तीन मुलं आहेत, यापूर्वी कधीही असा विनाश पाहिला नव्हता. मार्च २०२३ च्या उत्तरार्धात झालेल्या अवकाळी पावसाने श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील गिद्दरबाहा ब्लॉकमधील भलायना गावात गारपिटीसह पिकं आणि घरं उद्ध्वस्त केली. दक्षिण-पश्चिम पंजाबचा हा प्रदेश दक्षिणेला राजस्थान आणि पूर्वेला हरियाणाला लागून आहे.
तीन दिवस पाऊस आणि गारपीट सुरू असल्याने बलजिंदर त्रासून गेले होते. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या ५ एकर जमिनीव्यतिरिक्त आणखी १० एकर शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी एका अढतिया (आडत्या) कडून ६.५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यांच्या गव्हाच्या पिकाशिवाय ना कुटुंबाचा उदरनिर्वाह होता, ना कर्ज फिटणार होतं.
जे पीक नुकतंच यायला सुरुवात झाली होती, ते आधी गारपिटीने नष्ट झालं. नंतर पाऊस पडला आणि पूर्ण शेतात बरेच दिवस पाणी साचलं होतं. पाण्याचा निचरा होईना आणि त्यात पीक सडत राहिलं,” बलजिंदर म्हणाला. “ते सडलेलं पीक आताही १५ एकर जमिनीत पडून आहे,” बलजिंदर एप्रिलच्या मध्यात म्हणाले.


















