मुनव्वर खान पोलिस स्टेशनपाशी पोचले तेव्हा आतून त्यांच्या मुलाच्या आर्त किंकाळ्या त्यांना ऐकू येत होत्या. पंधरा मिनिटं झाली आणि त्यांच्या मुलाचा, इझ्राइलचा आवाज थांबला. त्यांना वाटलं पोलिसांनी मारहाण थांबवली असेल.
त्या दिवशी सकाळी इझ्राइल भोपाळला एका धार्मिक मेळाव्याला गेला होता. तिथून तो गुनाला आपल्या घरी परतत होता. भोपाळ इथून २०० किलोमीटरवर आहे. आणि इझ्राइल तिथे बांधकामावर रोजंदारीची कामं करायचा.
तो संध्याकाळी (२१ नोव्हेंबर २०२२) गुनाला पोचला, पण घरी गेलाच नाही. रात्री आठच्या सुमारास घरापासून दोनेक किमी अंतरावर, गोकुल सिंग का चाक नावाची एक वस्ती आहे, तिथे चार पोलिसांनी तो जात होता ती रिक्षा थांबवली आणि त्याला सोबत नेलं.
त्याला पोलिसांनी पकडलं तेव्हा तो आपल्या सासूशी फोनवर बोलत होता असं त्याची मोठी बहीण बानो, वय ३२ सांगते. “त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ते त्यामुळेच आम्हाला कळालं.”
त्याला जवळच्याच कुशमुदा पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. आणि तिथेच पोलिसांनी त्याला निर्दयपणे मारहाण केली. त्याच्या किंकाळ्या इथेच त्याच्या वडलांना ऐकू आल्या होत्या.
पाऊण तास उलटला आणि तेव्हा कुठे ६५ वर्षीय मुनव्वर यांच्या लक्षात आलं की आपल्या लेकाचं ओरडणं पोलिसांची मारहाण थांबली म्हणून बंद झालं नाहीये. तो गतप्राण झाल्याने शांत झालाय. शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट म्हटलंय की त्याचा मृत्यू हृदय आणि श्वसन बंद पडल्याने आणि डोक्याला इजा झाल्यामुळे झाला आहे.
त्यानंतर आलेल्या बातम्यांमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितलं की ३० वर्षीय इझ्राइलला ताब्यात घेण्याचं कारण म्हणजे एका जुगाऱ्याला वाचवणाऱ्या टोळीचा तो सदस्य होता आणि पोलिसांशी त्याने झटापट केली.
पण त्याच्या कुटुंबाने हा आरोप धुडकावून लावला आहे. “त्याला पकडलं कारण तो मुसलमान होता ना,” मुन्नी बाई आपल्या लेकाबद्दल म्हणतात.
तो पोलिसांच्या ताब्यात असताना मरण पावला याबद्दल दुमत नाहीच. तो कसा मेला त्याबद्दल मात्र आहे.






