२८ फेब्रुवारी २०२३. संध्याकाळचे सहा वाजलेत. एखादं चित्र काढावं इतक्या सुंदरशा खोलदाडा गावात, क्षितिजावर सूर्य मावळतीला गेलाय. ३५ वर्षीय रामचंद्र दोडके रात्रीची तयारी सुरू करतो. दूरवेर प्रकाशाचा झोत टाकणारी आपली कमांडर बॅटरी नीट आहे ना पाहत तो अंथरुण पांघरुण गोळा करतो.
घरी त्याची बायको जयश्री रात्रीचा स्वयंपाक करतीये. डाळ आणि शाक भाजी. शेजारी त्याचे काका ७० वर्षीय दादाजी देखील रात्रीच्या तयारीला लागलेत. त्यांच्या पत्नी शकुबाईंनी भात घातलाय आणि चपात्या होतायत. त्यांच्या शेतातल्या या भाताचा सुगंध हवेत भरून राहिलाय.
“चला, झाली तयारी,” रामचंद्र म्हणतो. “स्वयंपाक झाला की निघायचं.” जयश्री आणि शकुबाई दोघांना जेवण बांधून देणार असल्याचंही ते सांगतात.
दोडके कुटुंबाच्या या दोन पिढ्या. माना आदिवासी असलेल्या या कुटुंबाचा आज मी पाहुणा होतो. दादाजी बाबासाहेब आंबेडकरांचे पक्के अनुयायी आणि कीर्तनकार. आणि हो, शेतकरी. रामचंद्र कुटुंबाच्या पाच एकर शेतीचं सारं पाहतो. कारण त्याचे वडील भिकाजी, दादाजींचे थोरले बंधू आताशा आजारी असतात आणि शेती त्यांच्याच्याने होत नाही. भिकाजी कधी काळी पोलिस पाटील होते. गावकरी आणि पोलिसांमधला दुवा.
नागपूरच्या भिवापूर तालुक्यातल्या खोलदाडा गावापासून काही मैलाच्या अंतरावर दोडकेंचं शेत. आम्ही तिथेच निघालो होतो, जागलीवर. जागल म्हणजे उभी पिकं जंगली प्राण्यांपासून वाचवण्यासाठी रात्रभर जागून केलेली राखण.


























