श्‍यामलाल कश्‍यपच्‍या मृतदेहावरून त्‍याच्‍या कुटुंबाला अक्षरशः वेठीला धरण्‍यात आलं होतं.

मजुरी करणार्‍या अर्राकोटच्‍या या वीस वर्षाच्‍या तरुणाने मे २०२३ मध्ये आपलं आयुष्य संपवलं. मागे राहिली त्याची गर्भार पत्‍नी, वीस वर्षाची मार्था.

‘‘आत्महत्‍या होती ती. त्‍याचा मृतदेह सगळ्यात जवळच्‍या, म्हणजे गावापासून पंधरा किलोमीटरवर असलेल्‍या इस्पितळात नेला होता. श्‍यामलालचा शवविच्‍छेदन अहवाल हा अपघात किंवा घातपात नसल्‍याचं सांगत होता.’’ श्‍यामलालची वहिनी, तिशीची सुकमिती कश्‍यप सांगते. अर्राकोट गावात असलेल्‍या माळरानावर एका टोकाला आपल्‍या अंधार्‍या झोपडीबाहेर ती बसली होती.

त्‍या दिवशी श्‍यामलालच्‍या घरापाशी अंत्‍यसंस्‍काराची तयारी सुरू होती. तरुण श्‍यामलालच्‍या मृत्‍यूच्‍या धक्‍क्‍यातून कुटुंब अद्याप सावरलेलं नव्‍हतं. सरकारी इस्पितळातून मृतदेह ताब्‍यात घेऊन गावात नेण्‍यासाठी त्‍याचे दोन नातेवाईक इस्पितळाबाहेर थांबले होते.

त्याच क्षणी काही स्‍थानिक लोक आले आणि श्‍यामलालच्‍या कुटुंबियांना त्‍यांनी सांगितलं की तुम्‍ही धर्मांतर केलंत, हिंदू धर्म स्‍वीकारलात, तरच श्‍यामलालचे अंत्‍यसंस्‍कार तुम्‍हाला गावात करता येतील.

छत्तीसगढच्‍या बस्‍तर जिल्ह्यात श्‍यामलालच्‍या कुटुंबाची तीन एकर जमीन आहे. तिथे ते भातशेती करतात, पण तो घरच्यापुरता. या संपूर्ण कुटुंबाची मुख्य रोजीरोटी आहे मजुरी. श्‍यामलाल प्रचंड राबायचा आणि या कामाची त्‍याला महिन्‍याला ३,००० रुपये मजुरी मिळायची.

‘‘या अशा दारिद्र्यात मूल वाढवण्‍याच्‍या जबाबदारीचं ओझं त्‍याला असह्य झालं असेल का?... त्‍याने काही चिठ्ठीही नाही लिहून ठेवली,’’ सुकमिती आपलं मन मोकळं करते.

Sukmiti, sister-in-law of the late Shyamlal Kashyap, holding her newborn in front of the family home.
PHOTO • Parth M.N.

आपल्‍या छोट्या बाळासह घरासमोर बसलेली श्‍यामलाल कश्‍यपची वहिनी सुकमिती

हे कुटुंब माडिया जमातीचं. छत्तीसग[मध्ये ज्‍या दोन टक्‍के लोकांनी पूर्वीच ख्रिश्‍चन धर्म स्‍वीकारलाय, त्‍यांच्‍यापैकी एक. यातले बरेच राज्‍यात दक्षिणेला असलेल्‍या बस्‍तरमध्ये राहतात.

याच वर्षी मे महिन्‍याच्‍या दुसर्‍या आठवड्यात एक दिवस श्‍यामलाल कश्‍यप बेपत्ता झाला. कुटुंबाने आधी गावात आणि नंतर रात्रभर बस्‍तरच्‍या जंगलात त्‍याचा वेड्यासारखा शोध घेतला.

दुसर्‍या दिवशी हा शोध संपला तो एका झाडाला लटकलेला श्‍यामलालचा मृतदेह आढळल्‍यावर. घरापासून फार लांब नव्‍हतं हे झाड. ‘‘आम्‍ही गोंधळलो. हबकून गेलो. सुधरेनाच काही. काय होतंय, काय घडलंय, काहीच कळेनासं झालं. सरळ विचारच करता येईना,’’ सुकमिती सांगते.

अर्राकोट हे २,५०० वस्‍तीचं छोटंसं गाव. ‘‘अशा वेळी गावातल्‍या लोकांनी भावनिक आधार द्यावा अशी अपेक्षा असते ना?’’ सुकमिती सवाल करते.

मात्र त्‍याऐवजी या कुटुंबाला भलत्‍याच अनुभवाला सामोरं जावं लागलं. धाकदपटशा, दहशत, धमक्‍या यांचा सामना करावा लागला. गावातल्‍या काही वजनदार नेत्‍यांनी या कुटुंबाच्‍या असहायतेचा फायदा घ्यायचं ठरवलं. उजव्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांचं संरक्षण असलेल्‍या या नेत्‍यांनी फर्मान काढलं की एकाच अटीवर श्‍यामलालवर गावात अंत्‍यसंस्‍कार होतील: त्‍याच्‍या कुटुंबाने ख्रिश्‍चन धर्मातून हिंदू धर्मात यायचं आणि मग हिंदू धर्मानुसार त्‍याच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करायचे.

ख्रिश्‍चन धर्मगुरूच्‍या मार्गदर्शनाखाली दफनविधी करणं तर अशक्‍यच होतं.

दारावर काढलेल्‍या मोठ्या क्रॉसकडे बोट दाखवत सुकमिती सांगते, ‘‘आमचं कुटुंब जवळपास चाळीस वर्षं ख्रिश्‍चन धर्म पाळतं आहे. आमची जगण्‍याची पद्धत झाली आहे ती आता. आम्ही रोज प्रार्थना करतो आणि त्‍यातून आम्हाला कठीण काळात लढण्‍याची ताकद मिळते. एका रात्रीत तुम्‍ही तुमचा धर्म आणि श्रद्धा अशा कशा बदलणार?’’

गावातल्‍या उजव्‍या विचारसरणीच्‍या समर्थकांनी दुःखात बुडालेल्‍या त्‍या कुटुंबाला घेरलं आणि सांगितलं, गावातले दफनविधी जिथे होतात, त्‍या दफनभूमीत तुम्‍हाला प्रवेशच मिळणार नाही. ‘‘एका विशिष्‍ट धर्माचे आहोत म्हणून आम्हाला लक्ष्य केलं जात होतं. पण तुम्‍हाला हवा तो धर्म तुम्‍ही पाळू शकता. मी वाचलंय ते पेपरमध्ये,’’ सुकमिती म्हणते.

‘‘हे कमीच झालं म्हणून की काय, आमच्‍या घराच्‍या मागच्‍या अंगणातही त्‍यांनी श्‍यामलालला दफन करू दिलं नाही,’’ सुकमिती सांगते. ‘‘याच अंगणात आम्ही त्‍याच्‍या आजीचंही दफन केलं होतं. दोघंही एकमेकांच्‍या शेजारी विसावा घेतील, असं आम्‍हाला वाटलं होतं. पण त्‍यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही धर्मांतर करायला नकार देतोय, त्‍यामुळे आमच्‍याच घरातच्‍या अंगणात दफन करू शकत नाही!’’

The backyard in Sukmiti's home where the family wanted to bury Shyamlal.
PHOTO • Parth M.N.

सुकमितीच्‍या घराचं परसदार. त्‍यांच्‍या कुटुंबाला इथेच श्‍यामलालचं दफन करायचं होतं

श्‍यामलालचं कुटुंब माडिया जमातीचं आहे आणि ख्रिश्‍चन धर्म पाळणारं आहे. श्‍यामलालचं निधन झालं तेव्‍हा गावातल्‍या वजनदार नेत्‍यांनी फर्मावलं, एकाच अटीवर श्‍यामलालवर गावात अंत्‍यसंस्‍कार होतील: त्‍याच्‍या कुटुंबाने धर्मांतर करायचं, हिंदू धर्मात यायचं आणि मग हिंदू धर्मानुसार त्‍याच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करायचे

आदिवासी ख्रिश्‍चनांना हिंदुत्‍ववादी गटांनी असं शत्रुत्‍वाच्‍या भावनेने वागवणं छत्तीसगढमध्ये नवं नाही. पण एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्‍या कुटुंबाला वेठीला धरणं आणि धमक्‍या देणं हे प्रकार होत नव्‍हते. आता ते प्रचंड गतीने वाढत आहेत, असं रत्‍नेश बेंजामिन सांगतात. ते बस्‍तरमधल्‍या ‘छत्तीसगढ ख्रिश्‍चन फोरम’चे अध्यक्ष आहेत.

ज्‍यांचे मृत्‍यू होतात त्‍यांच्‍या कुटुंबांना आता उजवे गट लक्ष्य करत आहेत. एका ग्रामसभेने तर ख्रिश्‍चन गावकर्‍यांना गावच्‍या हद्दीत दफन करू देणार नाही, असा ठरावच केला आहे.

शेवटी, श्‍यामलालचा मृतदेह गावात आणण्‍याऐवजी गावापासून ४० किलोमीटरवर असलेल्‍या जिल्ह्याच्‍या ठिकाणी, जगदलपूरला नेला गेला आणि तिथे त्‍याच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. ‘‘आमचं घरातलं माणूस गेलं होतं. जे घडलंय ते समजून घेण्‍यासाठी, पटवून आणि पचवून घेण्‍यासाठी आम्हाला आमचा वेळ हवा होता. अंत्‍यविधी त्‍या वेळेतच व्‍हायला हवे होते. ते यामुळे झालं नाही,’’ सुकमिती म्हणते.

सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी न्‍यावं, तसं झालं श्‍यामलालच्‍या अंत्‍यविधींचं. खूपच घाई झाली, करावी लागली. ‘‘त्‍याला सन्‍मानाने निरोप दिला असं वाटलंच नाही आम्‍हाला,’’ त्‍याचे कुटुंबीय म्हणतात.

हिंदू धर्मांतर करण्‍यास श्‍यामलालच्‍या कुटुंबाने नकार दिल्‍यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. श्‍यामलालच्‍या मृत्‍यूनंतर बरेच दिवस गावाच्‍या वेशीपर्यंत हा तणाव भरून राहिला होता. कायदा-सुव्‍यवस्‍थेसाठी गावात पोलिस बंदोबस्‍त होता. दुर्दैवाने, गावात शांतता निर्माण करण्‍यासाठी पोलिसांनी सुचवलेला उपाय बहुसंख्यांकांच्‍या मागण्‍यांना शरण जाण्‍यासारखा होता.

‘‘कोविडनंतर हे प्रकार वाढले आहेत,’’ बेंजामिन म्हणतात. ‘‘त्‍याआधी उजव्‍या विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या पद्धतींनी ख्रिश्‍चनांचं धर्मांतर करून त्‍यांना हिंदू करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. पण मृत्‍यूच्‍या वेळी मात्र असं व्‍हायचं नाही. दुर्दैवाने, आता मृत्‍यूही त्‍यांच्‍या तावडीतून सुटलेला नाही.’’

*****

बस्‍तर हा खनिजसंपत्तीने समृद्ध प्रदेश आहे. मात्र इथले लोक भारतातल्‍या सर्वात गरीब लोकांपैकी आहेत. राज्‍यातल्‍या आदिवासी ग्रामीण लोकसंख्येपैकी ४० टक्‍के लोक दारिद्र्यरेषेच्‍या खाली आहेत.

१९८०च्‍या दशकापासून या भागात सशस्त्र आणि हिंसक उठाव होत आहेत. जंगल वाचवून आदिवासींच्‍या हक्‍कांसाठी लढत असल्‍याचा दावा करणारे माओवादी बंडखोर, सशस्‍त्र ग्वेरिला सरकारला आणि श्रीमंत उद्योगपतींना डाचतात. गेल्‍या पंचवीस वर्षांत या सशस्‍त्र हिंसाचाराने हजारो बळी घेतले आहेत. भाजपने १५ वर्षं सत्ता उपभोगल्‍यावर २०१८ मध्ये राज्‍यात सत्ताबदल झाला. काँग्रेसने बस्‍तरमधल्‍या बारापैकी अकरा जागा जिंकल्‍या. बस्‍तरसह सात जिल्ह्यांचा त्‍यात समावेश होता.

Arracote is a small village with a population of just over 2,500. 'In moments like these you expect people in your village to provide emotional support,' says Sukmiti, seen here with her newborn in front of the house.
PHOTO • Parth M.N.

आपल्‍या छोट्या बाळासह घराबाहेर बसलेली सुकमिती. ‘ अशा वेळी गावातल्‍या लोकांनी भावनिक आधार द्यावा अशी अपेक्षा असते ना?’ अर्राकोट या २५०० लोकवस्‍तीच्‍या छोट्याशा गावात राहाणारी सुकमिती सवाल करते.

छत्तीसगढमधल्‍या विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्‍या आहेत आणि राज्‍य परत मिळवण्‍यासाठी उजव्‍या विचारसरणीचे गट लोकांचं ध्रुवीकरण करण्‍याचा हर प्रकारे प्रयत्‍न करत आहेत.

बस्‍तरमधले विश्‍व हिंदू परिषदेचे नेते रवी ब्रह्मचारी सांगतात की, गेल्‍या दीड वर्षात हिंदूंनी हस्‍तक्षेप करून आदिवासी ख्रिश्‍चनांचे अंत्‍यसंस्‍कार रोखल्‍याच्‍या ७० घटनांची नोंद विहिंप आणि बजरंग दलाकडे आहे. ‘‘ख्रिश्‍चन मिशनरी गरीब लोकांना फसवतात. त्‍यांच्‍या अशिक्षितपणाचा फायदा घेतात,’’ ते म्हणतात. ‘‘आम्‍ही त्‍यांची ‘घरवापसी’, म्हणजे त्‍यांनी हिंदू धर्मात परत यावं यासाठी प्रयत्‍न करतो. हिंदूंना जागं करणं हे आमचं काम आहे. ज्‍यांनी आमच्‍याकडून ‘ज्ञान’ घेतलंय, ते आदिवासी ख्रिश्‍चनांना गावात अंत्‍यसंस्‍कार करू देत नाहीत.’’

अर्राकोटपासून फार दूर नसलेल्‍या नागलसार गावात बजरंग दलाचे कार्यकर्ते आदिवासी ख्रिश्‍चनांचा छळ करण्‍यात आणखी एक पाऊल पुढे गेलेत.

ऑगस्‍ट २०२२ मध्ये ३२ वर्षांच्‍या पांडुराम नागच्‍या आजीचं, आयती यांचं निधन झालं. ६५ वर्षांच्‍या आयती आजारी होत्‍या, पण फार त्रास न होता शांतपणे गेल्‍या. पण त्‍यांचे अंत्‍यसंस्‍कार मात्र तितक्या सहज झाले नाहीत.

‘‘आम्ही तिला दफनभूमीत नेलं तेव्‍हा बजरंग दलाचे कार्यकर्ते काही गावकर्‍यांसह आले आणि त्‍यांनी आम्‍हाला धक्‍काबुक्‍की करायला सुरुवात केली,’’ नाग सांगतात. ते धुरवा जमातीचे आहेत. ‘‘आमचा तोल गेला, माझ्‍या आजीचा मृतदेह खाली पडण्‍याच्‍या बेतात होता. या सगळ्याचं कारण एकच होतं, आम्ही हिंदू व्‍हायला नकार दिला होता.’’

कुटुंब आपल्‍या निर्णयावर ठाम राहिलं. बहुसंख्यांकांच्‍या दबावाला बळी पडायचं नाही, असं त्‍यांनी ठरवलं. ‘‘आमची तीन एकर शेतजमीन आहे. त्‍यावर आम्‍ही जे काही करतो, ती आमची खाजगी बाब आहे. आजीचं दफन तिथे करायचं, असा निर्णय आम्ही घेतला. काही झालं तरी ‘त्‍यांचं’ ऐकायचं नाही, असं ठरवलं,’’ पांडुराम नाग सांगतात.

बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्यांनी मग माघार घेतली आणि कोणताही अडथळा न येता दफनविधी पार पडला. मात्र त्‍यानंतरही, जोवर सन्‍मानपूर्वक आयतींचं दफन होत नाही, तोवर सगळे तणावात होते. ‘‘अंत्‍यविधी करत असताना वातावरणात शांतता असावी, अशी अपेक्षा करणं गैर आहे का?’’ पांडुराम विचारतात. ‘‘ही लढाई आम्ही जिंकली, पण या अशा वातावरणात आमची मुलं वाढू नयेत, असं आम्हाला वाटतं. गावचे मुखियासुद्धा आमच्या बाजूने उभे राहिले नाहीत.’’

*****

When Kosha’s wife, Ware, passed away in the village of Alwa in Bastar district, a group of men suddenly barged into their home and started beating the family up. 'Nobody in the village intervened,' says his son, Datturam (seated on the left). 'We have lived here all our life. Not a single person in the village had the courage to stand up for us.' The Christian family belongs to the Madiya tribe and had refused to convert to Hinduism
PHOTO • Parth M.N.

बस्‍तर जिल्ह्यातल्‍या अल्‍वा गावात राहाणार्‍या कोशा यांच्‍या पत्‍नी वारे यांचं निधन झालं तेव्‍हा काही जण अचानक त्‍यांच्‍या घरात घुसले आणि त्‍यांनी कुटुंबियांपैकी काही जणांना मारायला सुरुवात केली. ‘‘गावातल्‍या कोणीही त्‍यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला नाही, कोणी मधे पडलंच नाही,’’ त्‍यांचा मुलगा, दत्तुराम (डावीकडे बसलेला) सांगतो. ‘‘आयुष्यभर आम्‍ही इथेच राहातो आहोत, पण गावातल्‍या एकाही माणसाने आमच्‍या बाजूने उभं राहाण्‍याची हिंमत दाखवली नाही.’’ हे ख्रिश्‍चन कुटुंब माडिया जमातीचं आहे. त्‍यांनी पुन्‍हा हिंदू होण्‍यास नकार दिला होता

वातावरणात इतकी भीती भरून राहिली होती की, उजव्‍या विचारसरणीशी सहमत नसणारे लोकही दत्तुरामच्‍या कुटुंबाची किंवा कसलीच बाजू न घेता तटस्थ बसले होते!

बरेच दिवस वारे अंथरूणाला खिळून होत्‍या. या वर्षी मे महिन्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला. २३ वर्षांचा दत्तुराम पोयाम आणि ६० वर्षांचे कोशा त्‍यांच्‍या मृतदेहापाशी बसले होते. जगदलपूरपासून तीस किलोमीटरवर असलेल्‍या बस्‍तर जिल्‍ह्यातल्‍या अल्‍वा गावातली ही घटना.

अचानक काही जण त्‍यांच्‍या घरात घुसले आणि त्‍यांनी त्‍यांना मारायला सुरुवात केली. ‘‘गावातलं कोणीच मधे पडलं नाही,’’ दत्तुराम सांगतो. ‘‘आयुष्यभर आम्‍ही इथेच राहातो आहोत, पण गावातल्‍या एकाही माणसाने आमच्‍या बाजूने उभं राहाण्‍याची हिंमत दाखवली नाही.’’

हे ख्रिश्‍चन कुटुंब माडिया जमातीचं आहे. त्‍यांनी धर्मांतर करणं, पुन्‍हा हिंदू धर्मात प्रवेश करणं नाकारलं होतं. बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्यांसह त्‍यांच्‍या घरात घुसलेल्या जमावाने वारेंचा मृतदेह असलेली शवपेटी अद्याप घरातच आहे, याचंही भान ठेवलं नाही. काळंनिळं होईपर्यंत त्‍यांनी दत्तुराम आणि कोशा या दोघांना मारलं. कोशा तर बेशुद्धच पडले, त्‍यांना त्‍यानंतर आठवडाभर रुग्‍णालयात ठेवावं लागलं.

‘‘आयुष्यात कधीही मला इतकं हतबल वाटलं नव्‍हतं,’’ कोशा म्हणतात. ‘‘माझ्‍या पत्‍नीचा मृत्‍यू झाला होता आणि अशा कठीण प्रसंगी मी माझ्‍या मुलासोबत नव्‍हतो.’’

बेंजामिन म्हणतात, ‘‘बिगरभाजप सरकार अल्‍पसंख्याकांचं संरक्षण करतं, हा समज खोटा आहे. राज्‍यात २०१८ मध्ये काँग्रेसचं सरकार आलं असलं तरी आजही बस्‍तरमध्ये ख्रिश्‍चनांवर हल्‍ले होतच आहेत.’’

Kosha (left) was beaten and fell unconscious; he had to be admitted to a hospital for a week. 'I have never felt so helpless in my life,' he says. 'My wife had died and I couldn’t be with my son (Datturam on the right) to mourn her loss'.
PHOTO • Parth M.N.
Kosha (left) was beaten and fell unconscious; he had to be admitted to a hospital for a week. 'I have never felt so helpless in my life,' he says. 'My wife had died and I couldn’t be with my son (Datturam on the right) to mourn her loss'.
PHOTO • Parth M.N.

कोशा (डावीकडे) यांना इतकी मारहाण केली होती, की ते बेशुद्ध पडले. आठवडाभर त्‍यांना रुग्‍णालयात ठेवावं  लागलं. ‘आयुष्यात कधीही मला इतकं हतबल वाटलं नव्‍हतं,’ ते म्हणतात. ‘माझ्‍या पत्‍नीचा मृत्‍यू झाला होता आणि अशा कठीण प्रसंगी मी माझ्‍या मुलासोबत (उजवीकडे बसलेला दत्तुराम) नव्‍हतो’

दत्तुरामलाही आईचा अंत्‍यविधी करण्‍यासाठी जगदलपूरला जावं लागलं. ‘‘आम्ही एक पिक-अप ट्रक भाड्याने घेतला. त्‍याचं भाडं होतं ३५०० रुपये,’’ तो सांगतो. ‘‘आमचं कुटुंब मजुरी करतं, इतके पैसे कमावण्‍यासाठी आम्हाला महिन्‍याभराहून अधिक काळ राबावं लागतं.’’

‘‘माझ्‍या आईच्‍या मृत्‍यूनंतरची ही घटना आम्हाला अस्‍वस्‍थ करणारी होती, आश्‍चर्यजनक मात्र नव्‍हती. हे सगळं अचानक घडलं नाही. ख्रिश्‍चन राहायचं असेल तर गाव सोडा, अशा धमक्‍या आम्‍हाला अनेक वेळा आल्‍या होत्‍या,’’ दत्तुराम सांगतो.

आदिवासी ख्रिश्‍चनांना गावातून, रोजच्‍या व्‍यवहारातून बाहेर काढण्‍याचे प्रयत्‍न वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहेत. ‘‘सर्वांसाठी असणार्‍या गावातल्‍या विहिरीवर आता आम्‍हाला पाणी भरू दिलं जात नाही. लपतछपत भरावं लागतं,’’ कोशा सांगतात.

अशाच प्रकारे आदिवासी ख्रिश्‍चनांचा छळ होत असल्‍याच्‍या बातम्‍या बस्‍तरच्‍या इतर भागांतूनही येत आहेत. २०२२ च्‍या डिसेंबरमध्ये नारायणपूरमधल्‍या २०० आदिवासी ख्रिश्‍चनांना गावातून बाहेर काढण्‍यात आलं. शेकडो जणांनी मग जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या कार्यालयासमोर धरणं धरलं. उजव्‍या पक्षांनी चिथावणी दिल्‍यामुळे गावातले लोक कायदा हातात घेत आमचा छळ करत आहेत, याचा निषेध त्‍यांनी केला.

डिसेंबर २०२२ या एका महिन्‍यात ख्रिश्‍चन अल्‍पसंख्यांकांवर डझनभर हल्‍ले झाले, त्‍यांचे तपशील असणारं एक पत्रही या आंदोलकांनी जिल्‍हाधिकार्‍यांना दिलं.

पुन्‍हा अर्राकोटकडे येऊ. सुकमितीने सांगितलं की, त्‍यांच्‍या कुटुंबाला शेजारच्‍या गावात असणार्‍या लग्‍नसमारंभालाही जाऊ दिलं नाही, कारण ते लग्‍न ख्रिश्‍चन कुटुंबातलं होतं. लग्‍नघरी केलेलं सगळं जेवण त्‍या कुटुंबाला अक्षरशः फेकून द्यावं लागलं, कारण त्‍या लग्‍नाला कोणीच पोहोचू शकलं नाही.

आपल्या राज्‍यघटनेने (कलम २५) ‘सदसद्‌विवेकबुद्धीचे स्‍वातंत्र्य आणि धर्माचे मुक्‍त प्रकटीकरण, आचरण व प्रसार’ मान्य केलं असलं तरीही आदिवासी ख्रिश्‍चनांना मात्र दहशत, धमक्‍या, हल्‍ले यांच्‍याशी सामना करावा लागत आहे.

‘‘आता ख्रिश्‍चन कुटुंबातलं कोणीही गेलं, तरी आमच्‍या मनात पहिली येते ती भीती आणि अंत्‍यविधीची व्‍यवस्‍था नीट होईल की नाही याची काळजी. दुःख मागाहून येतं. कसा मृत्‍यू आहे हा?’’ सुकमिती म्हणते.

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

यांचे इतर लिखाण Parth M.N.
Editor : Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

यांचे इतर लिखाण Priti David
Translator : Vaishali Rode

वैशाली रोडे मुक्त पत्रकार आणि लेखक असून तिने मराठी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता केली आहे. तिने शब्दांकन केलेल्या ‘मी हिजडा मी लक्ष्मी’ या आत्मकथेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

यांचे इतर लिखाण Vaishali Rode