रुबेल शेख आणि अनिल खान गाडी चालवतायत... पण त्यांची गाडी आणि ते जमिनीवर नाहीत बरं. जमिनीपासून २० फुटांवर आणि तेही जवळपास ८० अंशाच्या कोनात त्यांची गाडी आणि ते वेगात चाललेत. वरतून लोक त्यांना टाळ्या वाजवत, ओरडत प्रोत्साहन देतायत. रुबेल आणि अनिल देखील आपल्या गाडीच्या खिडकीतून अर्धं अंग बाहेर काढून सगळ्यांना हात हलवून अभिवादन करतायत.
अगरताळ्याच्या जत्रेतला हा आहे मौत का कुआँ. रुबेल आणि अनिल चारचाकी आणि दुचाकीवर या मृत्यूच्या विहिरीत कितीतरी धाडसी कृत्यं करतायत.
दहा मिनिटांचा एक खेळ असं किती तरी तास ते या विहिरीत आपला जीव पणाला लावून गाडी चालवत असतात. हा मौत का कुआँ उभा करण्यासाठी किती तरी दिवस लागतात. लाकडी फळ्या एकमेकीत बसवून जमिनीवरची ही ‘उंच’ विहीर तयार केली जाते. गाडी चालवणारे बहुतेक जण विहिरीच्या उभारणीत स्वतः सामील असतात कारण त्यांच्या धाडसी खेळांसाठी विहिरीचं सगळं तंत्र आणि उभारणी कळीची असते.
मौत का कुआँ या नावातच या खेळाचं सगळं आलं. दुर्गा पूजेच्या आसपास ऑक्टोबर महिन्यात त्रिपुऱ्याच्या अगरताळ्यामध्ये जत्रा भरतात. आकाशपाळणे, गोल फिरणाऱ्या गाड्या, खेळातल्या आगगाड्या या सगळ्यांसोबत मोठं आकर्षण असतं मौत का कुआँ.























