पश्मिनाच्या एका नियमित आकाराच्या शालीसाठी पुरेशी सूतकताई करायची तर फहमीदा बानो यांना एक महिना लागतो. चांगथांगी शेळीची अत्यंत तलम लोकर वेगळी करणं आणि त्याचं सूत कातणं हे अतिशय जिकिरीचं आणि नाजूक काम असतं. पन्नाशीला आलेल्या एका कारागिराच्या मते, महिनाभराच्या या कष्टप्रद कामातून फहमीदा बानो यांना अंदाजे हजारभर रुपये मिळू शकतात. कमाईचं गणित समजावून सांगत फहमीदा म्हणतात- "जर मी सतत काम केलं तर दिवसाला ६० रुपये कमवू शकेन."

‘मौल्यवान’ म्हटली जाणारी ही शाल ज्या किमतीला विकली जाईल त्याचा हा क्षुल्लक म्हणावा असा हिस्सा. गुंतागुंतीच्या रेखीव नक्षीकामाची लयकारी आणि विणकामातल्या कलाकुसरीची अदाकारी यावर पश्मिना शालीची किंमत अवलंबून असते- ८ हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत, कितीही.

महिलांनी घरकामांच्या मधल्या वेळात हाताने पश्मिनाची सूतकताई करणं ही इथली परंपरा. अशी हस्तकला करणाऱ्या फहमीदासारख्यांच्या पदरात तुटपुंजी मजुरी पडते. त्यामुळे हे काम करू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे.

फिरदौसा यासुद्धा श्रीनगरच्याच रहिवासी. आता त्या आपल्या कुटुंबाचं आणि घराचं हवं-नको पाहण्यात व्यस्त असतात; पण लग्न व्हायच्या आधी त्या सूतकताई करायच्या. लहान असतानाच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, "घरातली मोठी माणसं आम्हाला सूतकताई करा असं आग्रहाने सांगायची. म्हणायची, त्यातून डोक्याला काम मिळेल आणि तुमचं मन गुंतून राहील. नुसत्या कुचाळक्या करत वेळ घालवण्यापेक्षा सूतकताई करा असं त्यांचं सांगणं असायचं." फिरदौसा यांच्या दोन किशोरवयीन मुली सूतकताई करत नाहीत. त्यांना शिक्षण, घरकाम यातून वेळ मिळत नाही. शिवाय या कामातून पैसेही फारसे मिळत नाहीत.

फिरदौसा सांगतात त्यानुसार सूत कातणं हा काश्मिरी संस्कृतीचा एक भाग आहे. खास काश्मिरी नाजूकपणाचं प्रतीक असणारं नद्रू (कमळाचं देठ) आणि सूतकताई यांच्यातील परस्पर संबंध उलगडताना त्या म्हणतात : "पूर्वी स्त्रिया एकमेकींशी स्पर्धा करायच्या - कशाबद्दल; तर कमळाच्या देठातल्या तंतूइतकी नाजूक सूतकताई कोण करतंय याबद्दल..."

Fahmeeda Bano usually takes a month to spin enough thread for a regular-sized pashmina shawl
PHOTO • Muzamil Bhat

पश्मिना च्या एका नियमित आकाराच्या शा ली साठी पुरे शी सूतकताई करायला फहमीदा बानो यांना साधारणपणे एक महिना लागतो

Fahmeeda's mother-in-law, Khatija combines two threads together to make it more durable
PHOTO • Muzamil Bhat

खाति जा या फहमीदा यां ची सासू. त्या दोन धागे एकत्र करून शाल अधिक टिकाऊ बनव तात

सूत कातण्यापेक्षा पश्मिना विणण्यातून चांगले पैसे मिळतात आणि ते काम पुरुष करतात. जास्त पैसे देणाऱ्या इतर कामांच्या अधेमधे पुरुष हे काम करतात. २०२२ च्या जम्मू-काश्मीर राज्याच्या वेतनाबाबतच्या अधिसूचनेनुसार आज केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये अकुशल कामगाराला ३११ रुपये, अर्धकुशल कामगाराला ४०० रुपये आणि कुशल कामगार ४८० रुपये दिवसाकाठी रोजंदारी मिळणं अपेक्षित आहे.

नियमित आकाराच्या शालीत १४० ग्रॅम पश्मिना लोकर असते. समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवरच्या प्रदेशात चांगथांगी शेळीचा (कॅप्रा हिरेकस) वावर असतो. तिच्यापासून मिळणाऱ्या १० ग्रॅम कच्च्या पश्मिना लोकरीची कताई पूर्ण करण्यासाठी फहमीदा यांना साधारणपणे दोन दिवस लागतात.

फहमीदा या आपल्या सासू खातिजा यांच्याकडून पश्मिना लोकरीची हस्तकला शिकल्या. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये कोह-इ-मारन इथल्या एकमजली घरात या महिला आपल्या कुटुंबासह राहतात.

खातिजा आपल्या घरात १०*१० फुटांच्या एका खोलीत आपल्या सूतकताई यंत्रावर काम करतात. एका खोलीत स्वयंपाकघर आहे तर दुसऱ्या खोलीत कुटुंबातल्या पुरुष सदस्यांचं पश्मिना विणकाम चालतं. बाकी खोल्या झोपण्यासाठी म्हणून वापरल्या जातात.

सूतकताई करणाऱ्या एका ७० वर्षीय अनुभवी बाईंनी काही दिवसांपूर्वी १० ग्रॅम पश्मिना लोकर खरेदी केली होती. परंतु दृष्टीदोष असल्यामुळे कताई करून त्यापासून चांगला नाजूक धागा मिळवणं काही त्यांना जमलेलं नाही. १० वर्षांपूर्वी त्यांच्या डोळ्यातला मोतीबिंदू काढून टाकण्यात आला. नाजूक सूतकताईसाठी नजर आणि लक्ष केंद्रित करणं त्यांना अवघड जातं.

सूतकताई करणाऱ्या फहमीदा आणि खातिजा यांच्यासारखे कारागीर सगळ्यात आधी पश्मिना लोकर पिंजून स्वच्छ करतात. हाताने पिंजण्याचं काम करताना सगळी लोकर लाकडी धनुकलीतून काढतात. त्यामुळे त्यातला गुंता काढला जातो, गाठी सोडवल्या जातात. लोकरीचे सगळे धागे एका दिशेने सलग लावले जातात. वाळलेल्या गवताच्या पिळदार देठापासून बनवलेल्या चकतीवर मग ते लोकरीचं कातलेलं सूत गुंडाळतात.

Left: Wool is pulled through a wooden comb to ensure the fibres are untangled and aligned.
PHOTO • Muzamil Bhat
Right: It is then spun on a spindle made of dried grass stems
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडे: गुंता निघाला आहे आणि गाठी सुटल्या आहेत याची खात्री करण्यासाठी लोकरीचे धागे धनुकलीतून काढतात. उजवीकडे: वाळलेल्या गवताच्या पिळदार देठा पासून बनवलेल्या चकतीवर मग ते लोकरीचं कातलेलं सूत गुंडाळ तात

लोकरीपासून धागा काढणं हे नाजूक आणि वेळखाऊ काम आहे. "धागा मजबूत व्हावा यासाठी दोनाचा एक धागा तयार केला जातो. सूत गुंडाळण्याच्या चकतीवर दोन्ही धागे एकत्र फिरवले जातात आणि शेवटी गाठी बांधल्या जातात," खलिदा बेगम सांगतात. गेली पंचवीस वर्ष पश्मिनासाठी हस्तकला करणाऱ्या श्रीनगरच्या सफा कदल भागातल्या त्या सर्वोत्कृष्ठ कारागीर आहेत.

“मी एका ‘पुरी’त (१० ग्रॅम पश्मिना) १४०-१६० गाठी बनवू शकते,’’ त्या सांगतात. त्यासाठी वेळ आणि कौशल्य बरंच लागतं. असं असूनही खालिदा बेगम यांना एका गाठीसाठी फक्त एक रुपया मिळतो.

पश्मिना धाग्याची किंमत त्या धाग्याच्या आकारावर अवलंबून असते - धागा जितका तलम तितका तो अधिक मौल्यवान. तलम धाग्यापासून जास्त गाठी बनवता येतात, जाड धाग्यापासून कमी.

“प्रत्येक गाठीत पश्मिनाचे ९ ते ११ धागे असतात. हे धागे आकाराने ८ ते ११ इंच किंवा ८ बोटांइतक्या लांबीचे असतात. गाठ बांधण्यासाठी महिला कारागीर साधारणपणे अशाप्रकारे धाग्याचं मोजमाप करतात,’’ इन्तिजार अहमद बाबा सांगतात. लहानपणापासून पश्मिना व्यवसायात असलेले बाबा आता ५५ वर्षांचे आहेत. व्यापारी कोण आहे यानुसार हस्तकला करणाऱ्या कारागिराला प्रत्येक गाठीमागे एक ते दीड रुपया मिळतो.

"एक महिला फक्त १० ग्रॅम पश्मिना लोकरीपासून धागे काढण्याचं काम पूर्ण करू शकते, कारण आम्हाला घरातील इतर कामंही करायची असतात. एका दिवसात ‘पुरी’ पूर्ण करणं जवळजवळ अशक्य असतं,’’ रुक्साना बानो सांगतात. त्यांना एका गाठीसाठी दीड रुपया मिळतो.

Left: 'I don’t think people will be doing hand-spinning of pashmina in the future,' says Ruksana
PHOTO • Muzamil Bhat
Right:  Knots in a pashmina hand-spun thread
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडे: भविष्यात लोक पश्मिना साठी हस्तकला वापरतील असं मला वाटत नाही ,’ रु क् साना सांग तात. उजवीकडे: हस्तकलेतून तयार झालेल्या पश्मिना धाग्या च्या गाठी

या कामातून दिवसाला जास्तीत जास्त २० रुपयांची कमाई होऊ शकते असं ४० वर्षीय रुक्साना सांगतात. पती, मुलगी आणि विधवा नणंदेसोबत त्या नवा कादलच्या अरामपोरा भागात राहतात. "तीन दिवसात १० ग्रॅम पश्मिना कातून मी जास्तीत जास्त १२० रुपये कमावले आहेत. चहा आणि जेवणासाठी गेलेला वेळ सोडून बाकी दिवसाचा सगळा वेळ मी त्या तीन दिवसात फक्त आणि फक्त पश्मिनाची सूतकताईच करत होते,’’ त्या सांगतात. १० ग्रॅमचं काम पूर्ण करायचं तर त्यांना ५-६ दिवस लागतात.

खातिजा सांगतात त्यानुसार पश्मिना विणकामातून आता पुरेसे पैसे मिळत नाहीत: "दिवसदिवस मी हे काम करत राहते पण कमाई तर काहीच होत नाही,’’ त्या सांगतात, “दिवसाला ३० ते ५० रुपये कमावणं हे पन्नास वर्षांपूर्वी ठीक होतं..."

*****

शाल खरेदी करणारी मंडळी त्याची किंमत द्यायला तयार नसतात, त्यामुळे हस्तकला करणाऱ्या पश्मिना कारागिरांना कमी मजुरी मिळते. पश्मिना व्यापारी नूर-उल-हुदा सांगतात, “एखाद्या ग्राहकाला हाताने विणलेली पश्मिना शाल ८-९ हजार रुपयांना पडत असेल आणि मशीनवर तयार झालेल्या तशाच शालीची किंमत जर पाच हजार रुपये असेल तर ग्राहक का मोजेल जास्त पैसे?’’

“हाताने सूतकताई करून काढलेल्या धाग्यांपासून बनवलेली पश्मिना शाल घेणारे ग्राहक फारच कमी असतात. मी तर म्हणेन की शंभरातले फक्त दोन ग्राहक अस्सल हस्तकारागिरीतून तयार झालेली पश्मिना शाल मागतात,’’ श्रीनगरच्या बदामवारी भागात असलेल्या ‘चिनार हस्तकला’ या पश्मिना शोरूमचे मालक ५० वर्षीय नूर-उल-हुदा सांगतात.

२००५ पासून काश्मीरी पश्मिनाला जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग आहे. कारागिरांच्या नोंदणीकृत संस्थेने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ताविषयक महितीपुस्तिकेत आणि शासकीय संकेतस्थळावर उद्धृत केल्यानुसार, हाताने सूतकताई करून  काढलेले आणि मशीनद्वारे काढलेले धागे वापरून केलेलं पश्मिना विणकाम जीआय टॅगसाठी पात्र आहे.

Combined threads must be twisted again on a spinning wheel so that they don't get separated
PHOTO • Muzamil Bhat

एकत्रित पिळलेले धागे पुन्हा सूतकताईच्या फिरत्या चाका रून जायलाच हवेत; म्हणजे पीळ सुटून ते धागे वेगळे हो नाहीत

Khatija getting the spinning wheel ready to combine the threads
PHOTO • Muzamil Bhat

धागे एकत्र करून त्यांना पीळ देण्यासाठी सूतकताई च्या चाकाला गती देण्याच्या तयारीत असलेल्या खाति जा

श्रीनगर शहरामधला पश्मिनाचा शंभर वर्षं जुना व्यवसाय चालवणाऱ्या अब्दुल मनन बाबांकडे जीआय स्टॅम्प असलेल्या वस्तू मोठ्या संख्येने आहेत- तब्बल अडीचशेच्या आसपास. शालीवरचा रबर स्टॅम्प ती शाल अस्सल आणि हस्तनिर्मित असल्याची हमी देतो. पण विणकर मात्र मशीननिर्मित धाग्याला प्राधान्य देतात, याकडे ते लक्ष वेधतात. हाताने काढलेला पश्मिना धागा अत्यंत नाजूक असल्यामुळे अशा धाग्यापासून शाल विणण्यास विणकर तयार नसतात. मशिनमधून निघालेला धागा एकसारखा असतो आणि त्यामुळे विणणं सोपं जातं."

किरकोळ विक्रेते अनेकदा हस्तकलेच्या नावाखाली मशिनकाम खपवतात. “आम्हाला एक हजार पश्मिना शालींची ऑर्डर मिळाली आणि १० ग्रॅम पश्मिनाची हाती सूतकताई करायला जर कमीत कमी ३ ते ५ दिवस लागत असतील तर मग ती ऑर्डर पूर्ण करणं आम्हाला कसं शक्य आहे?’’ मनन बाबा विचारतात.

मनन यांचे वडील ६० वर्षीय अब्दुल हमीद बाबा सांगतात की, हस्तकौशल्यातून बनणाऱ्या पश्मिनाचं आकर्षण कमी होत चाललं आहे. पश्मिनाची हस्तकला म्हणजे ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये ही कला आणणारे सुफी संत हजरत मीर सय्यद अली हमदानी यांनी दिलेली भेट आहे, असं अब्दुल हमीद बाबा मानतात.

आजोबांच्या काळात कच्ची पश्मिना लोकर विकत घेण्यासाठी लोक कसे घोड्यावरून शेजारच्या लडाखला जायचे, याची आठवण हमीद काढतात. "तेव्हा सगळं अस्सल होतं, आमच्यासाठी ४०० ते ५०० महिला पश्मिना लोकर कातत होत्या. आता आमच्यासाठी काम करणाऱ्या जेमतेम ४० महिला आहेत आणि त्याही काहीतरी कमवलं पाहिजे म्हणून फक्त पोटासाठी हे काम करतायत...’’

Muzamil Bhat

Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.

यांचे इतर लिखाण Muzamil Bhat
Editor : Punam Thakur

Punam Thakur is a Delhi-based freelance journalist with experience in reporting and editing.

यांचे इतर लिखाण Punam Thakur
Translator : Amruta Walimbe

अमृता वाळिंबे मुक्त पत्रकार असून विविध सामाजिक संस्था व माध्यम समूहांबरोबर गेल्या दोन दशकांपासून लेखन-संपादन करत आहे. प्रशिक्षित मानसतज्ज्ञ या नात्याने ती मानसिक आरोग्यक्षेत्रातही कार्यरत आहे.

यांचे इतर लिखाण Amruta Walimbe