नारायण कुंडलिक हजारे यांना बजेट हा शब्द माहित आहे कारण ते कधीच जास्त नसतं.
“आपलं तेवढं बजेटच नाही,” अगदी चार शब्दांत नारायण काका १२ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याच्या बातमीतली हवाच काढून टाकतात.
पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटबद्दल विचारल्यावर ते बराच विचार करतात. आणि अगदी ठामपणे सांगतात, “हे असलं काही मी कधीच ऐकलेलं नाही. आजवरच्या ६५ वर्षाच्या आयुष्यात कधीच नाही.”
आणि त्यांनी असलं काही माहीत होण्याचं काही साधनही नाही. “माझ्यापाशी मोबाइल फोन नाही. घरात टीव्हीसुद्धा नाही.” काही दिवसांपूर्वीच त्यांच्या एका मित्राने त्यांना रेडिओ भेट दिलाय पण त्याच्यावरसुद्धा दर वर्षी सादर होत असलेल्या या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. “आमचा अडाणी माणसाचा काय संबंध, तुम्हीच सांगा,” ते म्हणतात. ‘किसान क्रेडिट कार्ड’ किंवा ‘वाढीव कर्जमर्यादा’ वगैरे शब्द काकांच्या दुनियेतले नाहीत.



