मुलगा म्हणून मोठ्या होत असलेल्या रम्याला पाचवीत असताना आपण मुलगी आहोत हे ठळकपणे जाणवायला लागलं.
“शाळेत असताना अर्धी चड्डी घालायला लागायची आणि मांड्या दिसायच्या,” ती सांगते. “मुलांच्या मधोमध बसायचं, फार लाज वाटायची.” आज तिशी पार केलेली रम्या साडी नेसते, लांब केस ठेवते आणि एक स्त्री म्हणून असलेली आपली ओळख अगदी प्रेमाने जपते.
चेंगलपट्टु जिल्ह्यातल्या तिरुपोरुर गावी रम्या अम्मन म्हणजेच देवीच्या एका देवळाचं सगळं काम पाहते. आम्ही भेटलो तेव्हा तिची आई वेंगम्मा तिच्याशेजारी जमिनीवर बसलेली होती. “मोठा होत होता तेव्हा त्याला [रम्याकडे बोट दाखवत] चुडीदार, दवणी [अर्धी साडी] आणि कम्मल [कानातले] असं सगळं काही ल्यायला आवडायचं. आम्ही सारखं सांगायचो, जरा मुलग्यासारखा वाग. पण त्याची हीच इच्छा होती,” ५६ वर्षीय वेंगम्मा सांगतात.
कन्नीअम्माचं मंदीर भाविकांसाठी बंद झालंय त्यामुळे आम्हाला निवांत बोलता येतंय. रम्या आणि वेंगम्मासारखेच इरुलार समाजाचे भाविक दिवसभर कन्नीअम्माच्या पाया पडायला येत असतात.
रम्या चार भावंडांमधली एक. इरुलार वस्तीत लहानाची मोठी झाली. तमिळ नाडूमध्ये या समुदायाची नोंद पीव्हीटीजी म्हणजेच विशेष बिकट स्थितीतील आदिवासी समूह अशी करण्यात येते. तिचे आई-वडील इतरांप्रमाणेच मिळेल तशी मजुरी करायचे. शेतात, मनरेगावर, बांधकामावर काम करत दिवसाला २५०-३०० रुपये कमवायचे.
“त्या काळात कुणाला ‘तिरुनंगईं’बद्दल म्हणजेच पारलिंगी स्त्रियांबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. त्यामुळे घराबाहेर पडले की पाठीमागे लोक माझ्याबद्दल काही ना काही बोलायचे,” रम्या सांगते. “म्हणायचे, ‘हा पोराचे कपडे घालतो पण पोरीसारखा वागतो. हा नक्की पोरगा आहे का पोरगी?’ मला हे ऐकून त्रास व्हायचा.”























