“दारू प्यायली की किती तरी गोष्टींचा विसर पडतो. भुकेचाही,” शिंगोधुई गावाचे रहिवासी रोबींद्र भुइया म्हणतात.
पन्नाशीचे भुइया शबर आदिवासी आहेत (पश्चिम बंगालमध्ये सवर म्हणून नोंद). मुंडा जमातीचे शबर भारताच्या पूर्वकडच्या प्रदेशात राहतात आणि शाओरा, शोरा, शबर आणि शुरी म्हणूनही ओळखले जातात. लोधा शबर प्रामुख्याने पश्चिम मेदिनीपूर (अखंड) आणि खाडिया शबर जास्त करुन पुरुलिया, बांकुडा आणि पश्चिम मेदिनीपूर (अखंड) या जिल्ह्यांमध्ये राहतात.
महाश्वेता देवींनी द बुक ऑफ द हंटर (मूळ बंगालीमध्ये प्रकाशित, ब्याधखंड, १९९४) या आपल्या पुस्तकामध्ये या समुदायाचं अठरा विश्वं दारिद्र्य आणि वंचन वर्णन केलं आहे. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. २०२० साली आलेल्या पश्चिम बंगालच्या आदिवासींचं जगणं या अहवालातील माहितीनुसार, “सर्वेक्षण केलेल्या ६७ टक्के गावांनी उपासमार होत असल्याचं सांगितलं आहे.”
इंग्रजांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही जमात ‘गुन्हेगार जमात’ असल्याचं जाहीर केलं. १९५२ साली त्यांना या कलंकातून मुक्त करण्यात आलं. पूर्वी शिकार करून जगणारी ही माणसं फळं, कंदमुळं, पानं गोळा करण्यात आणि अर्थातच जंगलात शिकार करण्यात तरबेज आहेत. स्वातंत्र्यानंतर काही लोकांना कसण्यासाठी जमीन देण्यात आली. पण यातली बहुतेक जमीन खडकाळ आणि नापीक होती. त्यामुळे अखेर कामासाठी त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली. गुन्हेगार जमात असल्याचा ठपका जरी काढून टाकला असला तरी तो पुरता पुसला गेलेला नाही. त्यामुळे आजही त्यांच्या येण्या-जाण्यावर बंधनं घालणाऱ्या स्थानिक पोलिस आणि वनखात्याच्या मेहेरबानीवर ते जगत आहेत.
कसल्याच फारशा संधी उपलब्ध नसल्याने शबर आदिवासींमध्ये भुकेचं आणि उपासमारीचं प्रमाण फार जास्त आहे. खास करून पश्चिम मेदिनीपूर आणि झरग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये. भुइयांसारखे अनेक जण दारू पिऊन भूक मारतात किंवा “दिवसातून तीनदा आम्ही पांता भात [आंबवलेला भात] खाऊन जगतोय,” बोंकिम मोल्लिक सांगतात. पंचावन्न वर्षीय मलिक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला महिन्याला पाच किलो रेशनचा तांदूळ मिळतो त्याबद्दल बोलतात. “मीठ किंवा तेल म्हणजे चैन आहे हो,” ते म्हणतात. आपल्या अगदी मोडकळीला आलेल्या घरासमोर बसून ते पांता भात खातायत.























