सिद्दू गावडेंना जेव्हा शाळेत जायचं होतं तेव्हा आई-वडलांनी त्यांना ५० मेंढरांमागे पाठवलं. कुटुंबातल्या, शेजारपाजारच्या सगळ्यांप्रमाणे त्यांनी देखील आपला पूर्वापार चालत असलेला व्यवसाय सुरू ठेवावा, मेंढरं राखावी अशीच सगळ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे शाळेची पायरी काही ते चढलेच नाहीत.
सिद्दू गावडे (ज्यांचा उल्लेख मी आजोबा असा करणार आहे) धनगर आहेत. शेरडं आणि मेंढरं पाळणारे धनगर महाराष्ट्रात भटक्या जमातींमध्ये गणले जातात. वर्षातले जवळपास सहा महिने जनावरांना चारणीला घेऊन जाणारा हा समाज आहे.
उत्तर कर्नाटकाच्या कारदगा या आपल्या गावापासून शंभरेक किलोमीटरवर आपलं जितराब चारणीला घेऊन गेलेल्या लहानग्या सिद्दूने त्याच्यासोबतच्या एका मेंढपाळाला दोऱ्याने काही तरी विणताना पाहिलं. “मला भारी वाटलं ते.” त्या वयस्क धनगराने इतकी सुंदर ‘जाळी’ विणली होती ती त्यांना आजही लक्षात आहे. पांढऱ्या धाग्याची ही जाळी विणून होईपर्यंत शेंगदाण्याच्या टरफलाच्या रंगाची झाली होती.
अगदी अचानक झालेली ही भेट पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. जाळी विणायला तर ते शिकलेच पण पुढची जवळपास ७४ वर्षं त्यांनी ही कला जपली आणि अजूनही त्यांचे हात थांबलेले नाहीत.
जाळी म्हणजे सुती धाग्यांची हाताने विणलेली मोठ्या बटव्यासारखी एक पिशवीच आहे म्हणा ना. खांद्याला अडकवतात ही जाळी. “चारणीला जाणाऱ्या जवळपास प्रत्येक धनगराच्या खांद्याला तुम्हाला जाळी अडकवलेली दिसेल,” आजोबा सांगतात. “यात बगा, दहा भाकरी आन् एक जोड कपडे राहतात. शिवाय पान-सुपारी, चुना, सगळं राहतंय.”
जाळी विणायची तर सगळं एका मापात करावं लागतं. त्यासाठी हे मेंढपाळ कुठलीही पट्टी किंवा इतर काही उपकरणं वापरत नाहीत त्यावरूनच त्यांचं कसब लक्षात यावं. “एक वीत आन् वर चार बोटं असावी,” आजोबा सांगतात. त्यांनी विणलेली प्रत्येक जाळी किमान १० वर्षं तरी टिकतेच. “आता पावसात भिजाया नको. उंदरांना बी लय आवडती कुरतडायला. तेवढं ध्यान ठेवावं लागतंय.”
आताच्या घडीला कारदग्यात सुती धाग्यापासून जाळी विणणारे ते एकटेच आहेत. “कन्नडमध्ये हिला जाळगी म्हणतात,” ते सांगतात. कारदगा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या बेळगावी जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यात येतं. इथली लोकसंख्या ९,००० च्या आसपास असून लोक मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा बोलतात.
लहानपणी ते सूत घेऊन जाणाऱ्या ट्रकची वाट बघत असायचे. “वाऱ्याने उडून धागे रस्त्यात पडायचे, ते मी गोळा करून आणायचो,” ते सांगतात. त्याच धाग्यांशी चाळा करत गाठी घालायचा त्यांचा प्रयत्न असायचा. “ही कला मला काय कुणी शिकविली नाही. एका म्हाताऱ्या धनगराचं पाहून मी शिकलो.”
पहिल्या वर्षी त्यांनी नेढं घालून गाठी मारायचा भरपूर प्रयत्न केला. “लक्षात घ्या, माझी मेंढरं आणि कुत्री घेऊन हज्जारो किलोमीटर पायपीट केली, तेव्हा कुठे हे कसब गावलं,” ते म्हणतात. “यात खरी कला काय आहे तर एक सारख्या अंतरावर गोल आकारात नेढं करत जायाचं. जाळी पूर्ण होईतोवर त्याचा आकार तसाच रहायला पाहिजे,” आजोबा सांगतात. विणकामाच्या सुया त्यांनी कधीच वापरल्या नाहीत.
बारीक धाग्याच्या गाठी नीट बसत नाहीत त्यामुळे आधी जाड दोरा करून घ्यावा लागतो. रिळातला सुमारे २० फूट धागा ते घेतात आणि लाकडाच्या टकळीला बांधतात. याला भिंगरी पण म्हटलं जातं. टकळी लाकडाची असते, सुमारे २५ सेंटीमीटर लांब, रवीला असतो तसा अर्धगोल खालच्या बाजूला आणि वरती निमुळती टोकदार.
त्यानंतर बाभळाच्या लाकडाची ५० वर्षं जुनी टकळी ते त्यांच्या उजव्या पायावर ठेवतात आणि जोरात घुमवतात. त्यानंतर टकळी सुरु असतानाच ते डाव्या हाताने ती उचलतात आणि पीळ पडलेला दोरा गुंडाळायला सुरुवात करतात. “जाड दोरा करायची हीच जुनी पद्धत आहे,” ते म्हणतात. २० फूट बारीक धाग्याचा जाड दोरा करायला त्यांना दोन तास तरी लागतात.
जाड दोरा महाग असतो त्यामुळे आजोबा याच पद्धतीने बारीक धाग्याचा दोरा स्वतःच करून घेतात. “तीन पदराचा करावा लागतोय,” ते म्हणतात. पण पायावर सारखी टकळी फिरवल्यामुळे त्वचा भाजते, हुळहुळी होते. “मग काय होतंय, दोन दिवस आराम करायचा,” ते हसत हसत म्हणतात.
आजकाल टकळी मिळणं देखील मुश्किल झालंय. आजोबा म्हणतात, “तरुण सुतारांना कुठे बनविता येतीये.” १९७० च्या सुमारास त्यांनी गावातल्या एका सुताराकडून रोख ५० रुपये देऊन ती करून घेतली होती. पन्नास रुपये काही साधीसुधी रक्कम नव्हती. त्या काळात चांगला तांदूळ रुपयाला किलोभर मिळत होता.
जाळी तयार करण्यासाठी ते दोन किलो सुती धागा विकत घेतात आणि धागा किती जाड आहे त्याप्रमाणे ते किती तरी फूट दोरा तयार करतात. अगदी अलिकडे पर्यंत ते नऊ किलोमीटरवरच्या रेंदाळमधून सूत विकत घेत होते. “आजकाल आमच्या गावातच सूत मिळायला लागलंय. किलोमागे ८० ते १०० रुपये पडतात. कसल्या प्रकारचं आहे त्यावर किंमतीत फरक पडतो.” नव्वदचं दशक सरत होतं तेव्हा हेच सूत त्यांना २० रुपये किलो मिळत असल्याचं त्यांना आठवतं. तेव्हा ते दोन किलो सूत घ्यायचे.
जाळी करण्याचं काम गड्यांकडेच असलं तरी त्यांच्या पत्नी मायव्वा धाग्यापासून जाड दोरा करून द्यायच्या. “तिचं काम लई भारी होतं,” आजोबा सांगतात. २०१६ साली किडनी निकामी झाल्यामुळे मायव्वा वारल्या. “तिला चुकीचे उपचार मिळाले. दम्यावर औषध घ्यायला गेलो होतो. त्या औषधांचा परिणाम किडन्यांवर झाला आणि त्या निकामी झाल्या.”
आजोबा सांगतात की मायव्वांसारख्या बाया मेंढरं भादरून लोकर कातण्यात करण्यात पटाईत होत्या. हेच धागे धनगर सनगरांना द्यायचे आणि मग ते त्यापासून घोंगडी विणायचे. घोंगड्या विणण्याचं काम खड्ड्यात बसवलेल्या डबऱ्या मागावर केलं जायचं.
गरजेप्रमाणे आणि हातात किती वेळ आहे त्यानुसार आजोबा दोरा किती जाड करायचा ते ठरवतात. त्यानंतर सुरू होतं बोटांनी नेढी तयार करत आणि गाठी घालत जाळी विणण्याचं काम. एकसारख्या अंतरावर सुरगाठी बांधायच्या आणि त्यातून धागा विणत जायचं. एका जाळीसाठी ते सारख्या अंतरावर सुरगाठी घालत २५ नेढी तयार करतात.
“सगळ्यात अवघड काय असतं माहितीये? गोल आकारात नेढी घालून सुरुवात करणं.” त्यांच्या गावातल्या दोघा-तिघा धनगरांना जाळी विणता येते, पण, “त्यांना खालचा तळ नीट गोल विणताच येत नाही. त्यामुळे त्यांनी हे कामच सोडून दिलंय.”
आजोबांना हा गोलाकार तळ तयार विणायला किमान १४ तास लागतात. “त्यात जर चूक झाली तर सगळं काम परत करावं लागतं.” एक जाळी विणायला २० दिवस लागतात, तेही आजोबांनी रोज तीन तास हे काम केलं तर. एका जाळीला ३०० फूट दोरा लागतो. प्रत्येक गाठ अगदी सारख्या आकाराची असते. जाळी करायला कमीत कमी ६० तास लागतात. आजकाल आजोबांचा बराचसा वेळ शेतात जातो. तरीही ते जाळी विणण्यासाठी थोडा वेळ काढतातच. गेल्या सत्तर वर्षांत त्यांनी १०० जाळ्या विणून दिल्या असतील. ६,००० तासांचे कष्ट गेलेत या कामात.
आजोबांना लोक लाडाने ‘पटकर म्हातारं’ म्हणून ओळखतात. का, तर ते रोज पांढरा पटका बांधतात म्हणून.
गेली नऊ वर्षं ते पंढरीच्या वारीला जातायत. जाऊन येऊन ३५० किलोमीटर अंतर चालत जातात. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन वाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आणि कर्नाटकाच्या उत्तरेकडच्या भागातले अनेक वारकरी चालत पंढरपूरला पोचतात. तुकोबा, ज्ञानोबा, एकनाथ, नामदेव अशा अनेक संतांचे अभंग आणि रचना गात गात वारकरी पंढरपुराला पोचतात.
“मी गाडीत नाही बसत. विठोबा आहे माझ्यासोबत,” ते म्हणतात. वारीबरोबर पंढरीला पोचायला त्यांना १२ दिवस लागतात. वाटेत विसाव्याला थांबतात तेव्हा त्यांचं जाळी विणण्याचं काम सुरूच असतं.
सिद्दू आजोबांचे वडील, बाळू गावडे देखील जाळी विणायचे. आजकाल जाळी विणणारे कारागीरच राहिले नाहीत त्यामुळे धनगरांना कापडी पिशव्या वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. “सगळंच पाहिलं, सामान, खर्च तर आता हे काम परवडण्यासारखं राहिलं नाही,” आजोबा म्हणतात. धाग्यावरच त्यांना २०० रुपये खर्च करावा लागतो आणि एक जाळी २५०-३०० रुपयांना विकली जाते. “काहीही उपयोग नाही,” ते म्हणतात.
आजोबांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. पन्नाशी पार केलेले मल्लप्पा आणि पस्तिशीचे कल्लप्पा दोघांनी मेंढरांमागे जायचं थांबवलंय आणि प्रत्येकी एकेक एकर शेती करतायत. पंचेचाळीस वर्षांचे बाळू शेती करतात आणि आजही त्यांच्याकडची पन्नास मेंढरं घेऊन चारणीला जातात. आजोबांची लेक तिशीची शाणा गृहिणी आहे.
त्यांची जाळी विणण्याची कला त्यांच्या एकाही मुलाकडे नाही. “शिकली बी नाहीत, त्यांना जमत बी नाही आणि त्यांनी डोस्कं पण घातलं नाही,” ते एका दमात सांगून टाकतात. लोकही अगदी बारकाईने त्यांचं काम निरखून पाहतात पण ते शिकायला काही कुणी पुढे आलेलं नाही.
सुरगाठी घालत नेढी घालणं दिसायला सोपं दिसतं पण ते तितकं साधं काम नाहीये. त्रासही होतो. “हाताला मुंग्या येतात,” ते म्हणतात. पाठीला रग लागते आणि डोळ्यावर ताण येतो. काही वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आणि आता ते चष्मा वापरायला लागलेत. त्यांचा कामाचा वेग जरा मंदावला असला तरी ही कला जपण्याची त्यांची जिद्द मात्र होती तशीच आहे.
जानेवारी २०२२ मध्ये ग्रास अँड फोरेज सायन्स या वार्तापत्रात प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात म्हटल्याप्रमाणे भारतात हिरव्या चाऱ्याची मोठी टंचाई आहे. तितकंच नाही तर वैरण म्हणून वापरल्या जाणाऱ्या कडब्याचा, धान्याची गुळी, कोंडा, तणीस, पेंढा अशा सगळ्याच गोष्टींचा मोठा तुटवडा आहे.
सिद्दू आजोबांच्या गावात आता फार मोजके धनगर शेरडं-मेंढरं राखतायत. चाऱ्याचा तुटवडा हे त्यामागचं मोठं कारण असल्याचं ते सांगतात. “गेल्या ५-७ वर्षांत शेळ्या आणि मेंढ्या चारा खाऊन मेल्या आहेत. शेतकरी लईच तणनाशक आणि कीटकनाशक वापराया लागलेत,” ते म्हणतात. २०२२-२३ साली कर्नाटकात शेतकऱ्यांनी १,६६९ मेट्रिक टन रासायनिक कीटकनाशकं वापरल्याचं कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहितीतून उघड होतं. २०१८-१९ मध्ये हाच आकडा १,५२४ मेट्रिक टन इतका होता.
ते पुढे सांगतात की मेंढरं राखणं आता फार खर्चिक झालं आहे. आणि कुणाला न दिसणारा खर्च म्हणजे औषधपाण्याचा. “दर वर्षी जनावरांची औषधं आणि लशींवर २०,००० रुपये खर्च येतोय. कारण आजकाल त्यांची आजारपणं वाढायला लागली आहेत.”
ते सांगतात की दर वर्षी प्रत्येक मेंढीला सहा लशी द्याव्या लागतात. “त्यातून जगलं वाचलं तर पुढे जाऊन काही पैसे आमच्या हाती पडणार.” या भागात इंच न इंच जमीन उसाखाली आलीये. २०२१-२२ साली भारतात ५० कोटी टन ऊस पिकला. भारत जगातला सगळ्यात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला.
सिद्दू आजोबांनी वीस वर्षांपासून शेरडं-मेंढरं राखणं थांबवलं आणि आपली ५० मेंढरं पोरांना वाटून दिली. पाऊस उशीराने यायला लागल्यामुळे शेतीचं सगळं चक्रच बिघडून गेलंय. “यंदा जून गेला, जुलैचा पंधरवडा गेला तरी आमचं रान रिकामं होतं. पाणीच नाही. शेजाऱ्याने साथ दिली म्हणून भुईमूग तरी पेरलाय.”
उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टी असं सगळं निसर्गचक्र झाल्यामुळे शेती करणं मोठं अवघड होऊन गेलंय, ते सांगतात. “पूर्वी लोक आपल्या पोरांना खंडीभर शेरडं आणि मेंढरं देत होते. काळ असा बदललाय की आता फुकटात दिली तरी कुणाला राखू वाटत नाहीत.”
संकेत जैन लिखित ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेसाठी मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.