गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशाचा विचार केला तर दुष्काळ ही इथली सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेच मान्य केलं आहे. हे राज्य देशाची भूक भागवणारं, धान्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारं राज्य आहे. इथले बरेच शेतकरी आजही कोरडवाहू शेती करतायत आणि त्यांचा प्रपंच याच पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीवर चालतोय. त्यामुळे सातत्याने येणाऱ्या या उष्णतेच्या लाटा, भूगर्भातली पाण्याची खालावत चाललेली पातळी आणि अगदी तुटपुंजा पाऊस या सगळ्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे.
ज्याने दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत त्यालाच दुष्काळाची दाहकता समजू शकते. शहरात राहणाऱ्यांसाठी दुष्काळ ही केवळ एक बातमी ठरते. पण एकामागून एक अनेक वर्षं ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळ सहन केलाय त्यांच्यासाठी तो यमराजासारखा आहे. सदैव, सर्वत्र असणारा. मृत्यूचा दूत. पावसाची वाट पाहता पाहता डोळ्याच्या काचा होतात, तहानलेली, भेगाळलेली जमीन आगीसारखी भाजत राहते. भुकेली, पाठपोट एक झालेली मुलं, गतप्राण झालेल्या गुरांच्या हाडांचे ढिगारे आणि पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या बाया हे या राज्यात सर्रास आढळणारं चित्र झालं आहे.
मध्य भारतातल्या दुष्काळाचा अनुभव या कवितेतून मी व्यक्त करतोय.


