कोल्हापुर जिल्हयातील राजाराम साखर कारखान्याच्या परीसरातील फेब्रुवारी महीन्यातील शांत दुपार. टळटळीत ऊन होतं. परिसरातल्या शेकडो खोप्यांमध्ये शांतता होती. येथुन तासभर अंतरावरच्या वडणगे गावातील उसाच्या फडात मजूर ऊसतोड करत होते.
काही खोप्यांमधून भांड्यांच्या आवाज येत होता. म्हणजे तिथे कुणातरी मजूर असणार असा अंदाज घेत घेत आम्ही एका खोपीजवळ पोहोचलो १२ वर्षांची स्वाती महानोर घरच्यांसाठी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. निस्तेज आणि दमलेली स्वाती झोपडीत भांड्यांच्या ढिगा-यात बसली होती.
जांभई देत स्वाती सांगत होती की “मी पहाटे ३ लाच कामाला लागलीये.”
ती एवढीशी पोर आपल्या आई-बापाबरोबर बैलगाडीने धाकटा भाऊ आणि आज्यासोबत कोल्हापूरच्या बावडा तालुक्यात ऊसतोडीला जाते. एका कुटुंबाला दिवसाला किमान २५ मोळ्या ऊस तोडावा लागतो. त्यामुळे सगळ्यांनाच घाम गाळावा लागतो. ते न्याहारीला रात्रीच्या भाकरी आणि वांग्याची भाजी घेऊन आले होते.
दुपारी १ वाजता एकटी स्वाती ६ किलोमीटरची पायपीट करत कारखान्याहून परत आली होती. “बाबा (आजोबा) मला इथे सोडून परत गेले.” बाकीच्यांसाठी रात्रीचं जेवण बनवायला ती लवकर आली होती. जवळपास १५ तासांच्या मेहनतीनंतर सगळे दमून भागून भुकेलेले संध्याकाळी परत येतील. “सकाळी जाताना फक्त कपभर चहा घेऊन निघालो होतो,” ती सांगते.
नोव्हेंबरमध्ये बीड जिल्हयातील सुकंदवाडी गाव सोडल्यापासून पाच-सहा महिने ही रोजची शेतातली पायपीट, घरकाम आणि ऊसतोड हेच स्वातीचं आयुष्य झालंय. ते सध्या कारखान्याच्या परिसरातच मुक्कामी आहेत.
ऑक्सफॅम (Oxfam) च्या 'ह्यूमन कॉस्ट ऑफ शुगर' (साखरेची मानवी किंमत) या अहवालात असं म्हटलंय की, हे ऊसतोड कामगार कारखान्याच्या परिसरातच मोठ्या वस्त्यांतील खोप्यांमध्ये वास्तव्यास असतात. जिथे पाणी, वीज आणि शौचालय यांची कसलीच धड सोय नसते.










