पश्चिम ओरिसामधल्या नियामगिरी पर्वतरांगांवर, त्यावरच्या घनदाट जंगलात काही आदिवासी जमाती राहातात. तेच त्यांचं घर आणि तीच त्यांची उपजीविका. म्हणूनच, २०१४ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा देशात कोणाचं सरकार येणार, यापेक्षा डोंगरावर खाणी खोदणार का, हा प्रश्न त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता
गेल्या वर्षी, २०१३ च्या जुलै-ऑगस्टमध्ये या भागात ग्रामसभा झाल्या. जंगलात राहाणार्या, अत्यंत कष्टप्रद जीवन जगणार्या गौडा आणि कोंध या जमातींनी या बारा ग्रामसभांमध्ये नियामगिरी पर्वतात बॉक्साइटच्या खाणी खोदण्याच्या योजनेला कसून विरोध केला. सात चौरस किलोमीटरची ही खाण डोंगराच्या पायथ्याशी, लांजीगढ गावात असलेल्या शुद्धीकरण कारखान्याला सात कोटी वीस लाख टन एवढं बॉक्साइट पुरवणार होती. ‘वेदांता ॲल्युमिनियम लिमिटेड’ने २००७ मध्ये शुद्धीकरण कारखाना उभा केला होता. सुरुवातीला दहा लाख टन असणारं ॲल्युमिनियमचं उत्पादन वर्षावर्षाला वाढवत साठ लाख टनापर्यंत नेण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी लागणारं बॉक्साइट आधी नियामगिरीमधून काढलं जाणार होतं आणि नंतर साठ किलोमीटरच्या परीघातले बॉक्साइट असलेले डोंगर खोदले जाणार होते.
इजिरूपा नावाच्या एका गावात अलीकडेच एक ग्रामसभा झाली. नियामगिरीवर खाणकाम करण्याला या गावाने ठाम विरोध केला. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका काही दिवसांनीच होणार आहेत, याचा या गावाला काही पत्ताच नव्हता. इथल्या लाल मातीच्या घरांवर ना कोणत्या उमेदवाराची पोस्टर्स डकवलेली होती, ना इथले टीव्ही रोज रात्री जोरजोरात कोकलत चर्चा करत होते. गावात वीज नाही, पाणी नाही, पक्का रस्ताही नाही.
इजिरूपा गावातली पार्वती गौडा, पिवळसर, गोड मोहाची फळं तोडता तोडता थांबली. आपल्या लोकसभा मतदारसंघातून १५ उमेदवार उभे आहेत हे आपल्याला माहितीच नसल्याचं म्हणाली. खरंतर हा भलामोठा मतदारसंघ आहे, कालाहांडी आणि नुआपाडा या दोन जिल्ह्यांतली डोंगरावरची आणि जंगलातली ४००० गावं पोटात घेणारा.
‘‘आमचे डोंगर आम्ही ‘वेदांता’ला घेऊ देणार नाही, एवढंच सांगायचंय मला,’’ ती म्हणाली. डोंगरावरच्या आपल्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर पार्वतीचं कुटुंब कपास, सूर्यफूल, भात आणि काही भाज्यांची घेतं. इथे डोंगरावर, जंगलात सिंचनाच्या सोयी नाहीतच, त्यामुळे गौडा कुटुंब शेताच्या आसपास बारमाही वाहणार्या झर्यांचं पाणी शेताला देतं. जंगल त्यांच्यासाठी भरपूर अन्न तयार करतं, त्यांना पुरेसं उत्पन्नही देतं. त्यांच्या अनेक धार्मिक श्रद्धा आणि परंपरा निसर्गाला धरूनच आहेत. निसर्गावर अवलंबून असणारा समाज आहे हा.
डोंगरावरच्या फुलदुमर गावात डोंगरिया कोंढ आदिवासी राहातात. त्यांना निवडणुकांबद्दल विचारलं तर सगळ्यांचे चेहरे मख्ख. वेदांताचा विषय काढला मात्र, सगळे एकदम संतापाने बोलू लागले. ‘‘कोणाला मत द्यायचं आम्ही? हाताला, शंखाला की हत्तीला (अनुक्रमे काँग्रेस, बिजू जनता दल आणि बहुजन समाज पक्ष यांची ही चिन्हं)? कोण आहे वेदांताच्या विरोधात?’’ कुई गावातल्या एक तरुणाने उद्वेगाने सवाल केला. त्याच्या खांद्यावर कुर्हाड विसावली होती. प्रार्थनेसाठी वाजणार्या ढोलाचा घनगंभीर आवाज वातावरणात भरून राहिलेला होता. एकही उमेदवार अद्याप इथे मतदारांना भेटायला, प्रचार करायला, मतं मागायला आलेला नव्हता. गावात येणार्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला वेदांताने सीएसआरमधून बांधलेल्या तीन इमारती उभ्या होत्या; पण रिकाम्या, ओस पडलेल्या. गावकर्यांनीच संतापून या इमारतींवर कुर्हाडीने हल्ला केला होता.
डोंगराच्या खाली, लांजीगढ गावात कधीतरी लाउडस्पीकर बसवलेली प्रचाराची एक जीप फिरताना दिसत होती. त्यातून वाजणारी गाणी उमेदवारांची नावं सांगतच नव्हती, त्यांच्या निवडणूक चिन्हाविषयीच बोलत होती. स्वाभाविक होतं ते ही. इथे लोक शिकलेले नाहीत, त्यांना लिहिता वाचता येत नाही. नावं वाचणार कशी? शुद्धीकरण कारखान्याच्या जवळ सीआरपीएफचा तळ आहे. त्यासमोर, लांजीगढ पोलिस स्टेशनमध्ये काही पोलिस टीव्हीवर बातम्या पाहात बसले होते. ते थोडं थांबले आणि ‘एचएस’ अशा अक्षरांनी खुणा केलेले ‘हायली सेन्सिटिव्ह’ किंवा नक्षलवाद्यांचा धोका असलेले भाग हातातल्या तक्त्यात बघायला लागले. कालाहंडी मतदारसंघातल्या २४ दुर्गम मतदारकेंद्रांपैकी २२ केंद्रं लांजीगढ भागातच होती!




