अंजलीसाठी तुलसी तिची अम्मा आहे, कायम. आणि ही गोष्ट आम्हाला सांगताना या अम्माचा चेहरा अभिमानाने फुलून येतो. कुरळ्या केसांचा अंबाडा आणि गुलाबी रंगाची चापून चोपून नेसलेली साडी. पारलिंगी तुलसी नऊ वर्षांच्या अंजलीची आई आहे.
विशीच्या उंबरठ्यावर असताना तुलसीने स्वतःला ‘कार्तिगा’ असं संबोधायला सुरुवात केली होती. पण नंतर रेशन कार्यालयात एका कर्मचाऱ्याने चुकून तिच्या नावाची नोंद तुलसी अशी केली. तमिळमध्ये हे नाव स्त्री पुरुष, कुणीही वापरू शकतात. म्हणून तिने खूश होऊन ते तसंच ठेवलं. आजही ती तुलसी आणि कार्तिगा या दोन्ही नावांचा वापर करते.
तमिळनाडूच्या तिरुपोरुर तालुक्यातल्या दरगस या इरुलार वस्तीमध्ये ती आणि अंजली एका छोट्या गवताने शाकारलेल्या झोपडीत राहतात. अंजली अगदी बाळ होती तेव्हा तुलसीची बायको सोडून गेली आणि तेव्हापासून तिची सगळी जबाबदारी तुलसीवरच आहे. २०१६ साली आलेल्या वारदा चक्रीवादळामध्ये या जोडप्याचा नऊ वर्षांचा मुलगा गेला.
आता चाळिशी पार केलेली तुलसी गेल्या अनेक वर्षांपासून तिरुनंगई समुदायाचा भाग आहे. तमिळमध्ये याचा अर्थ पारलिंगी स्त्री असा होतो. आपल्या मांडीवर बसलेल्या अंजलीकडे प्रेमभरल्या नजरेने पाहत ती सांगते, “तिला सोबत घेऊन मी आमच्या बैठकींना जायचे. तिची दुधाची बाटली तिच्या हातात असायची.”


















