घरी परतल्यावर सगळ्यात आधी श्रीरंगन आपल्या हातावरचा सुकलेला चीक काढतात. ५५ वर्षीय श्रीरंगन किशोरवयापासून रबराच्या झाडाचा चीक काढण्याचं काम करत आहेत. ह्या सुकून तपकिरी होणाऱ्या पांढऱ्या चीकाशी त्यांची ओळख जुनीच. घरी परतल्यावर तो हातावरून काढून टाकणं हे त्यांच्यासाठी मोठं कामच असतं.
त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरु होतो. सहा-सात इंच लांब व आकडा असलेली 'पाल वीटूर काठी' (रबराचा चीक काढण्यासाठी वापरात येणारे साधन) घेऊन ते सुरुलकोडे गावातील आपल्या रबराच्या राईकडे निघतात. शासनाकडून त्यांच्या वडिलांना मिळालेली ही पाच एकर जागा त्यांच्या घरापासून पाच मिनिटांवर आह. या जागेत ते रबर, काळी मिरी आणि लवंग ही पिकं घेतात.
आपल्या पत्नी लीला यांच्यासोबत ते रबराच्या झाडांचं काम करतात. दोघे काणीकरन आदिवासी समाजातील असून त्यांच्या लग्नाला २७ वर्षं झाली आहेत.
श्रीरंगन (स्वतःचे केवळ नावच वापरतात) आदल्या दिवशी झाडांना बांधलेल्या, काळ्या रंगाच्या वाटीत जमलेला कोरडा चीक गोळा करतात. "हा आहे ओट्टूकारा" ते समजावून सांगतात "दिवसाचा ताजा चीक गोळा झाल्यानंतर उरलेला चीक वाटीत ओघळून रात्रभर सुकतो."
सुकेलेला चीक साधारण ६०-८० रुपये किलोने विकला जातो. तेवढेच चार पैसे जादा मिळतात. दोन आठवडे ओट्टुकारा गोळा केल्यानंतर ते बाजारात विकतात.
वाटी रिकामी करून त्यात ताजा चीक जमवण्यासाठी ते झाडाच्या खोडाला नवा एका इंची काप देतात. आणि हीच प्रक्रिया त्यांच्या राईतल्या एकूण २९९ झाडांवर करावी लागते.














