टक्-टक्-टक्!
हा लयबद्ध आवाज कोडावटीपुडी येथील ताडपत्री झाकलेल्या एका झोपडीतून येत आहे. मुलमपका भद्रराजू चेक्का सुट्टी, म्हणजेच एक लहान पॅडल सारख्या लाकडी हातोडीचा वापर करून एका माठाला गोल आकार देत आहेत.
“जाड चेक्का सुट्टी भांड्याचं बूड बंद करण्यासाठी. ही नेहमीच्या वापरातली हातोडी माठाचं बूड अधिक गुळगुळीत करण्यासाठी वापरली जाते. सर्वांत बारीक चेक्का सुट्टी सगळा माठ वरून गुळगुळीत करण्यासाठी असते,” ७० वर्षीय भद्रराजू स्पष्ट करून सांगतात. गरजेप्रमाणे ते हवी ती चेक्का सुट्टी वापरतात.
ते सांगतात की नेहमीच्या वापरातली आणि बारीक चेक्का सुट्टी ताडाच्या झाडाच्या (बोरासस फ्लेबेलिफर) फांद्यांपासून आणि सर्वात जाड चेक्का सुट्टी अर्जुनाच्या लाकडापासून (टर्मिनालिया अर्जुना) बनवली जाते. ते सर्वात बारीक चेक्का सुट्टीने माठावर थापटायला लागल्यावर लय आणि आवाज मंदावतो.
२० इंच व्यासाच्या माठाला आकार देण्यासाठी त्यांना सुमारे १५ मिनिटे लागतात. एखादी बाजू चुकून तुटली किंवा फुटली, तर ते चिकणमाती घालून आणि थापटून ती बाजू जुळवून सारखी करून घेतात.









