अशोक तांगडे एक दिवस दुपारी आपला फोन पहात होते तेव्हा व्हॉट्सॲपवर त्यांना एक मेसेज आला. त्यात लग्नाची एक डिजिटल पत्रिका होती. त्यामध्ये वधू वर एकमेकांना अवघडून न्याहाळत होते. पत्रिकेत लग्नस्थळ, तारीख आणि वेळही दिली होती.
पण, तांगडेंसाठी हे निमंत्रण लग्नाला यावं म्हणून पाठवलेलं नव्हतं.
ही पत्रिका तांगडेंना त्यांच्या जिल्ह्यातल्या एका खबऱ्यानं पाठवली होती. या पत्रिकेसोबत त्याने वधूच्या जन्माचा दाखलाही पाठवला होता. ती १७ वर्षांची होती. म्हणजे न्यायालयाच्या नजरेत अल्पवयीन.
पत्रिका वाचल्यावर तांगडेंच्या असं लक्षात आलं की हे लग्न अवघ्या तासाभरात होणार आहे. त्यांनी तातडीनं आपले सहकारी तत्वशील कांबळे यांना फोन केला आणि लगबगीनं ते कारमध्ये बसले.
“ते अंतर साधारण अर्ध्या तासाचं असेल बीड शहरापासून,’’ तांगडे सांगतात. जून २०२३ ची ही घटना त्यांना आठवते. “वेळ वाचावा म्हणून रस्त्यातूनच आम्ही व्हॉट्सॲपवरून त्यांचे फोटो स्थानिक पोलिस ठाण्यात आणि ग्रामसेवकांना पाठवले.”
तांगडे आणि कांबळे हे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात बाल हक्कासाठी काम करतात.
त्यांच्या कामात मदत करणाऱ्या अनेक लोकांचा मोठा फौजफाटा आहे. यात अगदी नवरीवर प्रेम करणाऱ्या गावातल्या एखाद्या मुलासह शाळेतील शिक्षक किंवा सामाजिक कार्यकर्ता किंवा बाल विवाह गुन्हा वाटतो अशी कोणतीही व्यक्ती त्याची सूचना देऊ शकते. एवढ्या वर्षांमध्ये जिल्ह्यात बाल विवाहावर नजर असणाऱ्या २००० हून अधिक खबरींची साखळी तयार झाली आहे.












