प्रिय पारी वाचक,

पारीमध्ये सरतं वर्षं फार धावपळीत गेलं.

२०२३ संपता संपता पारीमध्ये आम्ही सरत्या वर्षाचा मागोवा घेण्याचं ठरवलं. पुढचे नऊ दिवस, दररोज पारीवरील सर्वोत्तम काय होतं हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कहाण्या, कविता, गीत-संगीत, चित्रं, फिल्म्स, फोटो, अनुवाद, ग्रंथालय, चेहरे, समाजमाध्यमं आणि विद्यार्थ्यांसोबत आम्ही करत असलेलं काम या सर्वांचा थोडक्यात गोषवारा आम्ही घेऊन येत आहोत.

देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांचं जगणं त्यांच्या कहाण्यांमधून आम्ही मांडत होतोच. या वर्षी नकाशावर नव्या ठिकाणांपर्यंत आम्ही पोचलो, खास करून ईशान्य भारतात. शेतीसंबंधी पारी जे काही लिहीत होतं त्यामध्ये अपर्णा कार्तिकेयन यांची एक अनोखी लेखमाला प्रकाशित झाली आणि प्रथमच मोगरा, तीळ, सुकट आणि इतरही पदार्थांच्या दुनियेत आम्ही प्रवेश केला. अभयारण्यांच्या जवळ किंवा आत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता ‘नव्याच प्रकारचा दुष्काळ’ कसा काय आलाय ते जयदीप हर्डीकर यांच्या लेखमालेतून आम्ही समजून घेतलं. मानव-वन्यजीव संघर्षाचे परिणाम शेतीवर आणि शेतकऱ्यांवर कसे होतायत याचा सातत्याने पाठपुरावा जयदीप करत आहे.

समाजात परिघावर असलेल्यांची आयुष्य आपल्या कॅमेऱ्यात विलक्षणरित्या टिपत पळनी कुमार याने तमिळ नाडूतल्या मूर्तीकार, पारलिंगी कलाकार आणि मच्छीमारांची वेगळीच दुनिया आमच्यासमोर खुली केली. रितायन मुखर्जी आणि मुझमिल भट यांनी काश्मीर आणि लडाखमधल्या पशुपालकांसोबत प्रवास करत पर्वतरांगांमधलं त्यांचं खडतर आयुष्य आणि बदलत्या वातावरणाचे गंभीर परिणाम टिपले. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या विविध प्रकारच्या समस्यांवर ज्योती शिनोळीने प्रकाश टाकला. स्थलांतरितांच्या मुलांचं शिक्षण, गरीब धावपटूंचे कष्ट आणि पाळीशी संबंधित अन्याय्य प्रथांचा तिने मागोवा घेतला. बिहारमधून पारी फेलो उमेश कुमार राय यांनी दारुबंदीनंतर मुसहर समाजाची धरपकड आणि त्यांच्यावर होत असलेले अत्याचार आपल्या कहाण्यांमधून पुढे आणले.

पशु-पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यात स्थानिकांची मोलाची भूमिका आम्ही काही लेखांमधून समजून घेतली. विशाखा जॉर्जने पूर्व हिमालयातला बुगुन लिओचिकला हा पक्षी कसा धोक्यात आला आहे आणि स्थानिक कार्यकर्ते त्याला वाचवण्यासाठी किती आणि काय काय प्रयत्न करत आहेत याचा मागोवा घेतला. प्रीती डेव्हिड हिने राजस्थानात अस्तंगत होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याची कहाणी समोर आणली तसंच अक्षय उर्जा प्रकल्पांमुळे देवरायांच्या जागा हडप करण्यात आल्याच्या गंभीर प्रकारावरही उजेड टाकला.

आजूबाजूला घडत असलेल्या काही घटनाही आम्ही नोंदवल्या – महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मोर्चासोबत आम्ही चाललो, आदिवासींनी आपल्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरही आम्ही होतो. २०२३ साली नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधलं जमिनीवरचं वास्तव पार्थ एम एन याने पुढे आणलं. बुलडोझर करत असलेला अन्याय, आदिवासींवरचे अत्याचार आणि पोलिसांच्या कोठडीत झालेले मृत्यू याबद्दल पार्थ सडेतोडपणे लिहीत होता.

गावपाड्यात काम करत असताना अनेकदा भलतंच काही हाती लागतं. स्मिता खटोर मुर्शिदाबादमध्ये विडी कामगारांसोबत वार्तांकन करत असताना तिथल्या बायांची गाणी, लहानग्यांचे खेळ तिने टिपले. काही कहाण्या अगदी खास. स्वतः शिक्षक असणाऱ्या मेधा काळे हिने विशेष शिक्षकांच्या कामाचं महत्त्व सांगणारा छोटा वृत्तांत पारीसाठी केला. ग्रामीण भारतातले अनेक सण-अत्सव आमच्या वार्ताहरांनी टिपले – मा बॉनबीबी, शैला नृत्य, चादर बादोनी, पीली वेषा आणि ‘कुणाचा पीर? कुणाचा देव?’ ही एक आगळी कहाणी.

पारी टीम देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे आणि त्याचाच फायदा घेत आम्ही भारतभरातून काही वार्तांकन केलं. ॲपआधारित सेवादात्यांची फरपट, स्थलांतरित कामगारांना करावी लागत असलेली भाषेची उसनवारी आम्ही जाणून घेतली. गावपाड्यातल्या बाया ‘फावला वेळ’ कसा घालवतात याचा मागोवा घेणं आमच्यासाठीही फार आनंददायी होतं.

PHOTO • Nithesh Mattu
PHOTO • Ritayan Mukherjee

आम्ही पीली वेषा या कर्नाटकाच्या किनारी भागातल्या उत्सवाची चित्रं टिपली तसंच लडाखच्या झन्स्कार प्रांतातल्या याकपालकांबरोबर सफर केली

नमिता वाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं जात्यावरची ओवी प्रकल्पाचं काम आमच्यासाठी फार मोलाचं आहे. या वर्षी या प्रकल्पाचा इतिहास मांडणारी एक फिल्म आम्ही प्रकाशित केली. २०२३ साली आमच्याकडे गाण्यांचा आणखी एक ठेवा आला. कच्छच्या रणातल्या या गाण्यांची गुंफण पारीची कवयीत्री प्रतिष्ठा पांड्या करत आहे.

आदिवासी मुला-मुलींनी काढलेल्या चित्रांचा संग्रह हा पारीवर प्रकाशित झालेला असाच एक अनोखा संग्रह. ओडिशाच्या गावपाड्यांमधल्या लहानग्यांनी काढलेल्या चित्रांचा संग्रह तयार करण्यात कनिका गुप्ताने फार मेहनत घेतली. लाबोनी जांगी चित्रकार म्हणून सगळ्यांना परिचित आहेच. पश्चिम बंगालमधल्या देउचा पचामी कोळसा खाणीविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांची कहाणी लाबोनी आपल्या चित्रांमधून आमच्यासाठी घेऊन आली.

विरत चाललेल्या कला आणि हस्तकलांच्या कहाण्या पारी-एमएमएफ फेलो नोंदवत आहेतः महाराष्ट्रात संकेत जैन याने गावांमध्ये झोपडी उभारण्याची आणि धनगरांच्या जाळीची कला कॅमेऱ्यात आणि शब्दांत टिपली. श्रुती शर्माने खेळापलिकडे जाऊन खेळाचं साहित्य तयार करणाऱ्या कारागिरांच्या कलेचा आणि जगण्याचा मागोवा घेतला. या व्यवसायाचा इतिहास आणि सामाजिक व सांस्कृतिक पैलू तिच्या लेखांचा गाभा आहेत. प्रकाश भुयान माजुलीतल्या रास परंपरेवर लिहीत आहे तर संगीत सरकार केरळच्या उत्तरेकडे असलेल्या थोलपावकोथु या चामड्याच्या पुतळ्यांबद्दल फिल्म व लेखन करत आहे. फैसल अहमद याने कर्नाटकातल्या तुलुनाडूमधल्या भुतांशी आमचा परिचय करून दिला.

आंध्र प्रदेशातून पारी फेलो अमृता कोसुरु हिने कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांबद्दल, त्यातही स्त्रियांबद्दल लेखन केलं.

या सोबतच पारीसाठी कायम लिहीत असलेल्या पुरुषोत्तम ठाकूर यांनी छत्तीसगड आणि झारखंडच्या आदिवासींचं जगणं, उपजीविका आणि सणांच्या गोष्टी लिहिल्या. शालिनी सिंग हिने यमुनेच्या पुरात विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली, ऊर्वशी सरकार हिने खेकडे पकडणाऱ्या महिला मच्छीमार आणि सुंदरबनमध्ये मासिक चालवणाऱ्या एका संपादकाशी आमची ओळख करून दिली. कविता अय्यर हिने ओडिशातल्या दुर्गम गावांमधल्या शाळा बंद झाल्याचा मुलांवर कसा परिणाम होतोय ते लिहिलं तर जिग्यासा मिश्राने लग्नासाठी मुलींची कशी विक्री होते त्याचं सत्य समोर आणलं. उमेश सोलंकी यांनी लिफाफे आणि चाळण्या तयार करणाऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या आणि आकांक्षाने मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये सारंगी वाजवणाऱ्या किशनभैय्यांची गोष्ट लिहिली. स्मिता तुमलुरुने तमिळ नाडूच्या इरुलार समाजाबद्दल आणखी लेखन केलं.

शिक्षण आणि अध्यापनक्षेत्रातल्या काहींनी पारीसाठी लेखन केलं. डॉ. नित्या राव यांनी कडलूरच्या मच्छीमार महिलांवर आणि डॉ. ओवी थोरात यांनी हिमालयातल्या पशुपालनावर लिहिलं. त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी पारीसाठी वार्तांकन केलं. ते अभ्यासत असलेल्या समाजांबद्दल, लोकांबद्दल लिहीत असताना आम्हाला विमुक्त भटक्या जमाती, बिहारमधल्या नाच करणाऱ्या मुली आणि महिला, कोचीचे धोबी स्त्री-पुरुष आणि त्यांचं जगणं जवळून पाहता आलं. एका शालेय विद्यार्थिनीने गावातल्या एका पोस्टमनची गोष्ट पारीसाठी लिहिली.

PHOTO • PARI Team
PHOTO • Ishita Pradeep

आदिवासी मुला-मुलींनी काढलेल्या चित्रांचा संग्रह आम्ही पारीवर प्रकाशित केला (डावीकडे). मुंबईतल्या आरेतील आदिवासींना काढलेल्या मोर्चाचं वार्तांकनही पारीवर प्रकाशित झालं (उजवीकडे)

आता येत्या काही दिवसांमध्ये २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या पारीवरील सर्वोत्तम या सदराची छोटी झलक.

सुरुवात करणार आहोत नक्षी विभागातल्या सर्वोत्तम लेखनाने. या वर्षी आमच्या संग्रहाला अनेक नवे आयाम देणाऱ्या कविता आणि गीत-संगीताचा मागोवा यामध्ये घेतला जाईल. त्यानंतर या वर्षी आमच्या ग्रंथालयात दाखल झालेल्या निवडक पुस्तकांची आणि अहवालांची झलक पारी ग्रंथालयाच्या लेखात तुम्हाला मिळेल. या वर्षी पारी फिल्मने अनेक सुपरहिट फिल्म तुमच्यासाठी आणल्या. अनेक नवे चित्रपटकर्ते आमच्या कामात सहभागी झाले. गेल्या वर्षी बिहारशरीफचा मदरसा अझीझिया चाळून बेचिराख करण्यात आला त्यावरची श्रेया कात्यायनीची फिल्म असो किंवा जैसलमेरच्या देवराया वाचवण्याच्या प्रयत्नांसंबंधी ऊर्जाने केलेली फिल्म. कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जगण्याविषयीची, कामाच्या हक्काविषयीची कविता कार्नेरोची फिल्म पारीवर आकर्षण ठरली. पारी फिल्मच्या लेखात तुम्हाला या सगळ्याची छोटी झलक पहायला मिळेल.

‘पारीवर प्रकाशित होणारा प्रत्येक मजकूर १४ भाषांमध्ये अवतार घेतो.’ आमच्यासाठी पारीवरच्या लेखांचे, कहाण्यांचे अस्खलित अनुवाद म्हणजे या कहाण्यांचं अगदी अचूक नवं रुप आहेत आणि पारीचा अवकाश अधिकाधिक लोकशाही आणि समावेशक करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल. हे घडू शकतं केवळ पारीभाषा या संपादक आणि अनुवादकांच्या गटामुळे. त्यांनी घेतलेला वर्षभराच्या कामाचा आढावा पाहिल्यावर त्यांच्या कामाचा पसारा आणि आवाका तुमच्या लक्षात येईल.

फोटो किंवा छायाचित्र पारीच्या कामाचा गाभा आहेत. २०२३ सालातील पारीवरच्या छायाचित्रांच्या दुनियेची सफर करत असताना तुमच्या हे लक्षात येईल. विद्यार्थ्यांसोबत पारीच्या कामाचा, इंटर्नशिपचाही आम्ही आढावा घेतला आहे. या वर्षी समाजमाध्यमांवर पारीने काय काय पोस्ट केलं ते एका रीलमध्ये तुम्ही पाहू शकाल. या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात पारीच्या चेहरे प्रकल्पाच्या लेखाने होणार असून भारतीयांच्या चेहऱ्यांमधलं वैविध्य तुम्ही पुन्हा एकदा या कामाद्वारे अनुभवू शकाल.

२०२३ मध्ये नव्या पुरस्कारांची भर पडली आणि नऊ वर्षांत पारीला मिळालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची एकूण संख्या ६७ इतकी झाली आहे. आणि यातला अगदी अलिकडचा म्हणजे पारीची सह-संस्थापक शालिनी सिंग हिला मिळालेला यूएन करस्पॉन्डन्ट्स असोसिएशनतर्फे दिला गेलेला पुरस्कार. ज्यांनी त्यांचं जगणं आमच्यापाशी उलगडलं ते या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत असा आमचा ठाम विश्वास आहे. हे पुरस्कार म्हणजे ज्या वार्ताहरांनी या कहाण्या आमच्यासाठी लिहिल्या, ज्यांनी त्यातला मजकूर, फोटो, फिल्म इत्यादीचं संपादन केलं आणि अनुवादकांनी त्या इतर भाषांमध्ये नेल्या त्या सर्वांच्याच पाठीवर कौतुकाची थाप असते.

पारीचे संपादक वार्ताहरांसोबत अगदी जवळून काम करतात. आवश्यक तिथे त्यांना मार्गदर्शन करत त्यांचं लेखन अधिकाधिक प्रभावी व अचूक होण्यासाठी मदत करतात. पारीसोबत काम करणारे इंग्रजी आणि इतर भाषांचे संपादक, फोटो संपादक आणि निवडक लेखांवर काम करणारे मुक्त संपादक आमच्या कामात मोलाची भूमिका निभावतात.

एक ऑनलाइन वार्तापत्र आणि एक जिताजागता संग्रह उभा करण्याचं काम पारी डेस्क अगदी प्रभावीपणे करत असतं. लेखातल्या तथ्यांची पडताळणी, लेखाची मांडणी, सगळं काही. वार्ताहरांसोबत संपर्क राखत लेखाची मांडणी करण्यापासून ते अगदी बारीक बारीक तपशील, बदलांची दखल घेत शेवटपर्यंत ते तितक्याच प्रभावीपणे काम करतात. कोणताच मजकूर प्रकाशित करणं त्यांच्या आवाक्याबाहेर नाही. मजकूर काय आहे त्यावर त्याची मांडणी ठरावी हे पारीचं सूत्र या कामात अगदी तंतोतंत पाळलं जातं.

आमच्या नियमित प्रकाशनांना २ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा सुरुवात होईल. अगरताळ्यातील मौत का कुआँ, बिहारमधलेय छापा कारागीर, महाराष्ट्रातला धार्मिक उन्माद, मेरठचे लोहार आणि बरंच काही...

येत्या वर्षात आम्ही अधिकाधिक कहाण्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. उत्तम वार्तांकन, उत्तम चित्रण, उत्तम लेखन आणि उत्तम अनुवाद केलेल्या या कहाण्या कुणा थोरामोठ्यांच्या नसतील त्या असतील साध्यासुध्या माणसांच्या रोजच्या जगण्याच्या गोष्टी.

कळावे,

पारी
Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

यांचे इतर लिखाण Priti David
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे