“निवडणूक म्हणजे या भागात सण असतो,” मर्जिना खातून सांगतात. गोधडीच्या चिंध्या आवरता आवरता त्या आमच्याशी बोलत होत्या. “बाहेरगावी, दुसऱ्या राज्यात कामासाठी गेलेले लोक मत द्यायला परत घरी येतात.”
त्यांचं रुपाकुची हे गाव डुबरी लोकसभा मतदारसंघात येतं. इथे ७ मे रोजी मतदान पार पडलं.
पण ४८ वर्षीय मर्जिना आपांनी मत दिलंच नाही. “मी लक्षच देत नाही. लोकांना टाळायला मी घराच्या आत दडून बसते.”
मर्जिना खातून यांचं नाव ‘डाउटफुल व्होटर्स’ म्हणजेच संशयास्पद मतदार म्हणून नोंदलं गेलं आहे. आपण भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी विश्वासार्ह पुरावा देऊ न शकलेल्या अशा ९९,९४२ लोकांची नावं या यादीत टाकण्यात आली आहेत. आणि यातले बहुतेक बंगाली बोलणारे आसामचे हिंदू आणि मुसलमान आहेत.
अख्ख्या देशात फक्त आसाममध्येच ही अशी डी व्होटर्सची यादी तयार करण्यात आली आहे. इथल्या निवडणुकांमध्ये बांग्लादेशातून अवैधरित्या भारतात येणारे लोक हा फार संवेदनशील मुद्दा आहे. १९९७ साली निवडणूक आयोगाने ही पद्धत अंमलात आणली. आणि त्याच वर्षी मर्जिना आपांनी त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी अर्ज केला होता. “त्या काळी शाळेतले शिक्षक मतदार याद्यांमध्ये लोकांच्या नावांची नोंद करण्यासाठी घरोघरी यायचे. मी पण माझं नाव दिलं,” त्या सांगतात. “पण त्यानंतरच्या निवडणुकीत मी मत द्यायला गेले तर मला त्यांनी मतच देऊ दिलं नाही. म्हणाले मी डी-व्होटर आहे.”





