एक जण जीवशास्त्रज्ञ, एक सैन्यात जवान, एक गृहिणी आणि एक भूगोलाचा पदवीधर.

उन्हाळ्याची दुपार आहे. हवेत गरमा. रांची शहरातल्या एका शांतशा गल्लीत ही सगळी मंडळी जमली आहेत. सगळे जण पीव्हीटीजी म्हणजेच विशेष बिकट परिस्थितीत जगणाऱ्या आदिवासी समूहांमधले आहेत. झारखंडच्या आदिवासी संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेसाठी सगळे जण इथे आले आहेत.

“आमच्या मुलांना आपली मावणो वाचता आली पाहिजे,” माल पहाडिया आदिवासी असलेला मावणा बोलणारा जगन्नाथ गिरही म्हणतो. हा २४ वर्षांचा युवक डुमकामधल्या आपल्या गावाहून २०० किलोमीटर प्रवास करून इथे पोचलाय. अस्तंगत होऊ घातलेल्या आपल्या मावणो या मातृभाषेचं व्याकरण लिहिण्यासाठी तो रांचीच्या आदिवासी संशोधन संस्थेमध्ये आला आहे.

पण तितक्यावरच तो थांबणार नाहीये. “आम्हाला मावणोमध्ये पुस्तकं छापायची आहेत,” जगन्नाथ सांगतो. बलियाखोरा या त्याच्या गावातला जीवशास्त्र या विषयात एमएससी पदवी घेणारा तो एकटाच असावा. आणि तीही त्याने हिंदी माध्यमातून घेतली आहे. “ज्या भाषेचे जास्त लोक ती भाषा विद्यापिठांमध्ये शिकवली जाते,” तो म्हणतो. “झारखंड कर्मचारी निवड आयोगाचा अभ्यासक्रम अगदी सहजपणे खोरथा आणि संथाली भाषेत उपलब्ध आहे पण आमच्या [मावणो] भाषेत नाही.”

“हे असंच सुरू राहिलं तर माझी भाषा हळूहळू लुप्त होऊन जाईल.” ही भाषा बोलणारे १५ टक्के माल पहाडिया झारखंडमध्ये राहतात आणि बाकी शेजारच्या राज्यांमध्ये.

मावणो ही इंडो-आर्यन भाषा असून तिच्यावर द्रविडी प्रभाव आहे. ही भाषा ४,००० हून कमी लोक बोलतात आणि तिला अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही. झारखंड राज्यातील भारतीय भाषा सर्वेक्षणानुसार मावणो शाळेमध्ये शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरली जात नाही आणि तिची विशिष्ट अशी वेगळी लिपी देखील नाही.

Members of the Mal Paharia community in Jharkhand rely on agriculture and forest produce for their survival. The community is one of the 32 scheduled tribes in the state, many of whom belong to Particularly Vulnerable Tribal Groups (PVTGs)
PHOTO • Ritu Sharma
Members of the Mal Paharia community in Jharkhand rely on agriculture and forest produce for their survival. The community is one of the 32 scheduled tribes in the state, many of whom belong to Particularly Vulnerable Tribal Groups (PVTGs)
PHOTO • Ritu Sharma

झारखंडमध्ये राहणाऱ्या माल पहाडिया आदिवासींसाठी शेती आणि वनोपज हे जीवनाधार आहेत. राज्यातल्या ३२ आदिवासी जमातींपैकी ही एक असून यातल्या बहुतेक जमाती विशेष बिकट परिस्थितीतील आदिवासी समूहांमध्ये समाविष्ट आहेत

माल पहाडियांसाठी शेती आणि वनोपज हेच प्रमुख जीवनाधार आहेत. झारखंडमध्ये त्यांची गणना विशेष बिकट परिस्थितीतील आदिवासी समूहांमध्ये करण्यात आली आहे. प्रामुख्याने डुमका, गोड्डा, साहिबगंज आणि पाकुर या जिल्ह्यांमध्ये त्यांची वस्ती आहे. माल पहाडिया मावणो फक्त घरीच बोलतात. बाकी कामासाठी आणि इतर सगळं संभाषण हिंदी किंवा बंगालीमध्ये होतं. आपली भाषा लवकरच नाहिशी होणार आहे अशी त्यांची भावना आहे.

मनोज कुमार डेहरी मावणो बोलतो आणि त्याला जगन्नाथचं म्हणणं पटतं. मनोज २३ वर्षांचा आहे आणि पाकुरच्या सहरपूरचा रहिवासी आहे. त्याने भूगोल विषयात पदवी घेतली आहे. तो म्हणतो, “राज्यामध्ये हिंदी आणि बांग्ला या भाषांना शिक्षणाचं माध्यम म्हणून प्राधान्य दिलं जात आहे. त्याचा मावणोला फटकाच बसला आहे.” झारखंडच्या बहुतेक शाळांमध्ये हिंदी हीच भाषा शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरली जाते आणि बहुतेक शिक्षकही हिंदी भाषिक आहेत.

अधिकाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या भाषांसोबतच ‘लिंक’ किंवा दुवा म्हणून काम करणाऱ्या भाषांचाही प्रश्न आहेच. आदिवासी समूह अनेकदा इतरांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या आणि त्या भागात अधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या मधली अशी एक संवादाची भाषा तयार करतात.

“प्रत्येक लहान मुलाने सगळ्यांना समजणारी ही संवादाची भाषा बोलावी अशी एक अलिखित अपेक्षा असते. त्यामुळे मुलं आपल्या मातृभाषेपासून अधिकच दुरावतात,” प्रमोद कुमार शर्मा सांगतात. पीव्हीटीजी समूहांना सहाय्य करण्यासाठी आदिवासी संशोधन संस्थेने निवृत्त शिक्षक असलेल्या शर्मांची नियुक्ती केली आहे.

मावणोबाबतीत बोलायचं तर खोरथा आणि खेत्री या दोन संवादाच्या भाषांचा प्रभाव मावणो बोलणाऱ्यांवर पडत आहे. मुळातच मावणो बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे. “मोठ्या लोकांच्या भाषांचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे आम्ही आमची स्वतःची मातृभाषा विसरत चाललो आहोत,” मनोज म्हणतो.

PVTGs such as the Parahiya, Mal-Paharia and Sabar communities of Jharkhand are drawing on their oral traditions to create grammar books and primers to preserve their endangered mother tongues with the help of a writing workshop organized by the Tribal Research Institute (TRI) in Ranchi
PHOTO • Devesh

झारखंडमधील परहिया, माल पहाडिया आणि सबर यासारखे आदिम समूह आपल्या बोली परंपरांचा आधार घेत व्याकरणाची पुस्तकं आणि अगदी साधे सोपे धडे तयार करतायत. रांचीच्या आदिवासी संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेची यासाठी मदत झाली

दोन महिने चालणाऱ्या या कार्यशाळेच्या शेवटी अस्तंगत होत असलेल्या भाषांचे हे लोक आपापल्या भाषेत एक तरी पुस्तक तयार करणार आहेत. यामध्ये आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाची एक सोपी, प्राथमिक मांडणी असेल. भाषातज्ज्ञांनी नव्हे तर भाषा बोलणाऱ्या लोकांनी स्वतः लिहिलेलं हे अशा प्रकारचं पहिलंच पुस्तक असावं. आपल्या प्रयत्नांतून भाषेचा ऱ्हास टाळता येऊ शकेल अशी आशा त्यांच्या मनात आहे.

“इतरांना [आदिमेतर] समाजाच्या लोकांना त्यांच्या भाषेत पुस्तकं मिळतात. आपल्या स्वतःच्या भाषेत शिकल्याने पुढे नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता जास्त असते,” जगन्नाथ सांगतात. पण हे कधी? जेव्हा लोक आपल्याच भाषेत बोलतील तेव्हा. “आज अशी परिस्थिती आहे की फक्त माझे आजी-आजोबा आणि आई-बाबा अगदी अचूकपणे मावणो बोलू शकतात. लहान मुलांना घरी भाषा शिकायला मिळाली तरच ते पुढे जाऊन ती बोलू शकतात.”

*****

२०११ च्या जनगणनेमध्ये भारतातल्या तब्बल १९,००० मातृभाषांची नोंद करण्यात आली होती. संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये यातल्या केवळ आठ भाषांची नोंद आहे. अनेक मातृभाषांना स्वतःची लिपी नाही किंवा ती बोलणाऱ्यांची संख्या घटत जात असल्यामुळे ‘भाषे’चा दर्जा मिळालेला नाही.

झारखंडमधल्या ३१ मातृभाषांना असा अधिकृत भाषेचा दर्जा न मिळाल्याने हिंदी आणि बंगाली या आठव्या सूचीतल्या भाषाच झारखंडमध्ये अधिक बोलल्या जातात, शाळांमध्ये शिकवल्या जातात आणि राज्याची अधिकृत कामकाजाची भाषा म्हणून त्याच वापरल्या जातात. झारखंडमधल्या आदिवासी भाषांपैकी केवळ संथाली भाषेला आठव्या सूचीत भाषा म्हणून स्थान मिळालं आहे.

इतर ३१ भाषा बोलणाऱ्यांना, त्यातही आदिम समाजाच्या भाषांना लुप्त होण्याचा फार मोठा धोका आहे.

“हमारी भाषा मिक्स होती जा रही है,” सबर समुदायाचा महादेव (नाव बदललं आहे) सांगतो. तो सैन्यात जवान आहे.

PHOTO • Devesh

झारखंडमध्ये ३२ वेगवेगळ्या मातृभाषा असून त्यातली केवळ संथाली ही आठव्या सूचीत समाविष्ट असणारी अधिकृत भाषा आहे. राज्यामध्ये आजही हिंदी आणि बंगाली भाषांचं प्राबल्य अधिक आहे

भाषा जेव्हा परिघावर टाकल्या जातात तेव्हा त्याचा परिणाम ग्राम पंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आदिवासींच्या प्रतिनिधित्वावरही होतो. “सबर सगळे विखुरलेले आहेत. [जमशेदपूरजवळ] आम्ही ज्या गावात राहतो तिथे आमची फक्त ८ ते १० घरं आहेत.” इतर घरं दुसऱ्या आदिवासींची किंवा  इतर समाजाच्या लोकांची आहेत. “माझी भाषा अशी मरत चाललेली पाहून काळजाला पीळ पडतो,” तो सांगतो.

महादेव सांगतो की त्याच्या सबर भाषेला भाषासुद्धा गणलं जात नाही. “जी भाषा लिहिली जाते ना तीच सगळ्यात आधी ऐकली पण जाते.”

*****

आदिवासी संशोधन संस्था १९५३ साली स्थापन करण्यात आली होती. आदिवासीच्या सामाजाकि, आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलूंचा अभ्यास करून ‘आदिवासी समूहांचा इतर समूहांशी संपर्क स्थापन करण्याच्या उद्दिष्टाने’ संस्थेची स्थापना करण्यात आली.

२०१८ सालापासून आदिवासी संशोधन संस्थेने अनेक आदिवासींच्या भाषांमध्ये छोटी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. यामध्ये असुर आणि बिरिजा यांसारख्या आदिवासी समूहांचा समावेश आहे. या पुस्तकसंचांमध्ये या भाषांमधल्या म्हणी, वाक्प्रचार, लोककथा, कवितांचा संग्रह आहे.

खरं तर आदिवासी समूहांनी स्वतः पुढाकार घेऊन हे काम हाती घेतलं असलं तरी त्याला फारसा यश मिळालेलं नाही. “संस्थेतल्या कपाटांमधली ही पुस्तकं शाळांपर्यंत पोचली तरच मुलांना आपापल्या मातृभाषेत वाचता येऊ शकेल,” जगन्नाथ म्हणतो.

संस्थेचे माजी संचालक राजेंद्र कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात यामध्ये पुढाकार घेऊन ही पुस्तकं छापली होती. ते म्हणतात, “जिथे अशा आदिम समूहांमधली मुलं शिकतायत त्या शाळांमध्ये ही पुस्तकं पोचली पाहिजेत, तरच या कामाचं खरं ध्येय साध्य होणार आहे.”

The TRI had launched the initiative of publishing the language primers of several endangered and vulnerable Adivasi languages of Jharkhand since 2018 including Asur, Malto, Birhor and Birjia. The series of books further includes proverbs, idioms, folk stories and poems in the respective languages
PHOTO • Devesh

२०१८ सालापासून आदिवासी संशोधन संस्थेने अनेक लुप्त होत असलेल्या आणि धोक्यात असणाऱ्या आदिवासी भाषांमध्ये पुस्तकं छापण्याचा उपक्रम हाती घेतला असून यामध्ये असुर, मालटो, बिरहोर आणि बिरिजा या भाषांचाही समावेश आहे. या पुस्तकसंचांमध्ये त्या त्या भाषेतल्या म्हणी, वाक्प्रचार, लोककथा आणि कविता समाविष्ट आहेत

या कामातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे या भाषा उत्तमरित्या बोलता येणारी माणसं शोधणं. प्रमोद कुमार शर्मा म्हणतात, “या भाषा एकदम अस्खलितपणे बोलणाऱ्यांना अनेकदा लिहिता येत नसतं.” त्यामुळे मग नाईलाज म्हणून ज्यांना इतकं चांगलं बोलता येत नाही पण लिहिता येतं, आणि ते मिश्र भाषा वापरू शकतात अशांना ही व्याकरणाची पुस्तकं लिहिण्यासाठी बोलावलं जातं.

“या कामासाठी तुम्ही भाषातज्ज्ञ असायला पाहिजे अशी काही आमची अट नाही.” तुम्हाला ती भाषा माहीत हवी. “आमचं असं मत आहे की बोली भाषेमध्येच व्याकरण तयार केलं तर ते जास्त सोयीचं होईल,” शर्मा सांगतात. ते या आधी झारखंड शैक्षणिक संशोधन मंडळासोबत अध्यापन करत होते.

खेदाची बाब ही की ही भाषेवरची पुस्तकं, आदिम समूहांच्या भाषांवरची पुस्तकं देवनागरी लिपीत लिहिली गेली आहेत. जर एखादं अक्षर किंवा स्वर हिंदीमध्ये वापरला जात असेल पण आदिवासी भाषेत नसेल तर त्यांनी ते विशिष्ट अक्षर किंवा स्वर आदिवासी भाषेतून वगळून टाकला आहे. “ण हे अक्षर मावणो भाषेत आहे पण सबरमध्ये नाही. त्यामुळे आम्ही सबरमध्ये लिहिताना ण न लिहिता न लिहितो,” प्रमोद सांगतात. तसंच एखादं अक्षर हिंदीमध्ये नाही पण विशिष्ट आदिवासी भाषेत असेल तर ते अक्षर तिथे देऊन पुढे त्याचं स्पष्टीकरण किंवा तपशील देण्यात आले आहेत.

“आम्ही ही लिपी फक्त ‘उसनी’ घेतली आहे. अक्षरं किंवा शब्द ज्या त्या भाषेत जसे उच्चारले जातात तसेच लिहिले आहेत,” साठ वर्षीय शर्मा सांगतात.

*****

Left: At the end of the workshop spanning over two months, each of the speakers attending the workshop at the TRI will come up with a primer — a basic grammar sketch for their respective mother tongues. This will be the first of its kind book written by people from the community and not linguists.
PHOTO • Devesh
Right: Rimpu Kumari (right, in saree) and Sonu Parahiya (in blue shirt) from Parahiya community want to end the ‘shame’ their community face when they speak in their mother tongue
PHOTO • Devesh

डावीकडेः दोन महिने चाललेल्या या कार्यशाळेच्या शेवटी इथल्या प्रत्येक सहभागीने एक प्राथमिक पुस्तक तयार करावं अशी अपेक्षा आहे. यामध्ये त्यांच्या मातृभाषेचं मूलभूत व्याकरण मांडावं. भाषातज्ज्ञांनी नाही तर ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी स्वतः लिहिलेलं हे असं पहिलंच पुस्तक असेल. उजवीकडेः परहिया आदिवासी रिंपू कुमारी (उजवीकडे, साडी नेसलेली) आणि सोनू परहिया (निळ्या सदऱ्यात). आपल्या मातृभाषेत बोलत असताना जी ‘शरम’ या आदिवासींना सहन करावी लागते ती संपवण्याचा या दोघांचा निर्धार आहे

संध्याकाळ झालीये. जगन्नाथ, मनोज आणि महादेव इतर सहभागींसोबत मोराबादी चौकात चहा प्यायला बाहेर पडतात. भाषांवरची चर्चा आता इतर मुद्द्यांकडे वळते. स्वतःची मायबोली बोलताना वाटणारी लाज किंवा बोलू का नको हे द्वंद्व हा त्यातला एक मुद्दा.

आणि जरी ते आपल्या भाषेत बोलले तरी ती सगळ्यांना कळेल याची काय खात्री? परहिया आदिवासी असणाऱ्या रिंपू कुमारीचा असाच अनुभव आहे. तिने आठवीत शाळा सोडली. संपूर्ण दिवस अगदी गप्प बसून असलेल्या रिंपूने अखेर आपलं मौन सोडलं आणि बिचकतच ती सांगू लागली, “मी परहियात बोलू लागले की लोक हसतात.” रिंपू २६ वर्षांची आहे आणि तिचं लग्न तिच्या जमातीबाहेरच्या व्यक्तीशी झालं आहे. “आता बाकी जगाला काय सांगणार? माझ्या सासरचेच माझी खिल्ली उडवतात.”

आपल्या लोकांनी आपली स्वतःचीच भाषा बोलताना वाटत असणारी शरम रिंपूला संपवून टाकायची आहे. जाता जाता ती इतकंच म्हणते, “त्याबद्दल मी इथे आणखी काहीच बोलणार नाहीये. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल ना, माझ्या गावाला यावं लागेल.”

या वार्तांकनासाठी रणेंद्र कुमार यांची मदत झाली आहे. त्यांचे आभार.

भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत आणि सामान्य माणसांच्या शब्दांत नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे.

Devesh

देवेश एक कवी, पत्रकार, चित्रकर्ते आणि अनुवादक आहेत. ते पारीमध्ये हिंदी मजकूर आणि अनुवादांचं संपादन करतात.

यांचे इतर लिखाण Devesh
Editor : Ritu Sharma

रितू शर्मा हिने भाषाशास्त्रात एमए केले असून तिला भारताच्या विविध बोली भाषांचं जतन आणि पुनरुज्जीवन यासाठी काम करायचं आहे. सध्या ती लोप पावत असलेल्या भाषाविषयक एका प्रकल्पावर पारीसोबत काम करत आहे.

यांचे इतर लिखाण Ritu Sharma
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे