सकाळी ७ वाजता डाल्टनगंजच्या सादिक मंझिल चौकात नुसती लगबग सुरू असते. ट्रकची ये-जा, दुकानदार आपल्या दुकानांची शटर खोलत असतात आणि जवळच्याच एखाद्या मंदिरात कुठे तरी टेपवर हनुमान चालिसा लावल्याचा हलकासा आवाज येत असतो.
एका दुकानाच्या पायऱ्यांवर बसून ऋषी मिश्रा सिगरेट ओढता ओढता त्याच्या भोवती गोळा झालेल्या लोकांशी मोठ्याने काही तरी बोलत होता. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि नवीन सरकार हा त्यांच्या बोलण्याचा विषय. सगळ्यांचं म्हणणं आणि वादावादी ऐकत तंबाखू चोळत असलेले नजरुद्दिन अहमद अखेर मध्ये पडतात आणि म्हणतात, “तुम्ही कशासाठी वाद घालताय? कुणाचं का सरकार येईना, आपल्याला पोटासाठी पैसे कमवावेच लागणारेत ना?”
ऋषी आणि नजरुद्दिन रोज सकाळी ‘लेबर चौक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मजूर अड्ड्यावर येतात. पलामूच्या आसपासच्या गावांमध्ये काहीही काम मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. इथे सादिक मंजिलच्या मजूर अड्ड्यावर किमान २५-३० जण रोजंदारीवर काही तरी काम मिळेल या आशेत ताटकळत उभे आहेत. डाल्टनगंज शहरात असे पाच चौक आहेत जिथे झारखंडच्या छोट्या गावांमधून आलेले मजूर कामाच्या आशेने गोळा होतात.








