ढुम-ढुम-ढुम...ढम-ढम-ढम...! शांतीनगर वस्तीतल्या सगळ्या गल्ल्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे असे आवाज येत असतात. इथे छोट्या ढोलक्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ढोल बनतात. त्यांचे आवाज आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. इरफान शेख या अशाच एक ढोलकी तयार करणाऱ्या कारागिरासोबत आम्ही चाललो होतो. मुंबईच्या उत्तरेकडच्या एका उपनगरातली ही स्थलांतरितांची वस्ती. इथल्या कारागिरांशी आमची तो गाठ घालून देणार होता.
इथले जवळपास सगळ्या कारागिरांचे पूर्वज उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीचे. आज या व्यवसायात ५० जण तरी आहेत. “कुठेही बघा, आमच्याच बिरादरीचे लोक तुम्हाला या कामात गुंतलेले दिसतील,” इरफान अगदी अभिमानाने सांगतो. मुंबई किंवा राज्याच्या इतर भागात पोचणारे ढोलक इथेच बनतात असं तो अगदी खुशीत सांगतो.






