अगदी यंत्रासारख्या अचूकतेने महम्मद असगर यांचे हात चालत असतात आणि बोलत असतानाही ते थांबत नाहीत.
“कुछ पल के लिए भी हाथ रुक गया तो काम खराब हो जाएगा (अगदी काही क्षण जरी माझे हात थांबले ना तर सगळं काम वाया जाईल),’’ तीन शतकांपासून चालत आलेली ही कला पुढे नेणारे ४० वर्षीय महम्मद सांगतात.
असगर छापा कारागीर (ब्लॉक प्रिंटिंग करणारे कारागीर) आहे. जवळपास गेल्या दशकभरापासून ते हे काम करतायत.
ब्लॉक प्रिंटिंग करणारे काही कारागीर नक्षी कोरलेले लाकडी साचे रंगामध्ये बुडवून ती नक्षी कापडावर उमटवतात. पण मोहम्मद असगर या कारागिरांपेक्षा वेगळे आहेत. अत्यंत पातळ ॲल्युमिनियम वर्ख वापरुन ते कपड्यांवर धातूची फुलं आणि विविध प्रकारची नक्षी छापतात.
या अत्यंत पातळ ॲल्युमिनियम वर्खाला म्हणतात ‘तबक’. हे तबक जेव्हा छापलं जातं तेव्हा साड्या, शरारा, लेहंगा आणि महिलांचे इतर कपडे एकदम दिमाखदार दिसायला लागतात... अगदी सणासुदीला साजेसे! नेहमीच्या साध्यासुध्या कपड्यांना सणासुदीचा दिमाख देऊ करणारे कोरीव नक्षीकामाचे डझनभर लाकडी साचे त्याच्या मागे असलेल्या शेल्फात नीट मांडून ठेवलेले आहेत.













