रविवारची सकाळ आहे, पण ज्योतिरिंद्र नारायण लाहिरी कामात बुडालेले आहेत. हुगळी जिल्ह्यातल्या आपल्या घरातल्या एका खोलीच्या कोपऱ्यात उभे राहून ५० वर्षीय ज्योतिरिंद्र बाबू एक नकाशा न्याहाळत आहेत. हा आहे; मेजर जेम्स रेनेल यांनी १७७८मध्ये तयार केलेला सुंदरबनचा पहिला नकाशा.
“ब्रिटिशांच्या सर्वेक्षणावर आधारित असलेला सुंदरबनचा हा पहिला अस्सल नकाशा आहे. या नकाशात थेट कोलकात्यापर्यंत पसरलेलं कांदळवन दाखवण्यात आलंय. खूप काही बदललंय तेव्हापासून...’’ नकाशावर बोट ठेवत लाहिरी सांगतात. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना लागून असलेलं सुंदरबन हे जगातलं सगळ्यात मोठं कांदळवन किंवा खारफुटीचं बन आहे. अफाट जैवविविधता आणि अर्थातच रॉयल बंगाल टायगर (पॅन्थेरा टायग्रिस) यासाठी ते ओळखलं जातं.
त्यांच्या खोलीतली कपाटं सुंदरबन संदर्भातल्या जवळपास प्रत्येक विषयावरच्या शेकडो पुस्तकांनी भरलेली आहेत – वनस्पती, प्राणी, दैनंदिन जीवन, नकाशे... आणि इंग्रजी व बंगाली भाषेतलं बालसाहित्य. २००९ साली आलेल्या आयला चक्रीवादळानंतर इथे होत्याचं नव्हतं झालं. त्या पार्श्वभूमीवर लाहिरी यांनी सुंदरबनविषयीचं ‘सुधू सुंदरबन चर्चा’ हे त्रैमासिक सुरू केलं. या अंकांचं नियोजन आणि संशोधनाचं काम इथे चालतं.
“या भागातली परिस्थिती न्याहाळण्यासाठी मी वारंवार दौरे केले. भीती वाटावी असं होतं ते,’’ लाहिरी आपल्या स्मृती जागवतात. मुलांची शाळा सुटली, लोक बेघर झाले, असंख्य पुरुषांनी स्थलांतर केलं आणि सगळ्या गोष्टींचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली ती महिलांवर. नद्यांवरचे बांधबंधारे धड राहतील की कोसळतील, यावर लोकांचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून होतं.’’
या आपत्तीविषयी प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या लाहिरी यांना अगदी जेमतेम आणि वरवरच्या वाटल्या. “माध्यमं सुंदरबनबद्दलच्या रूढीबद्ध गोष्टीच पुन्हा पुन्हा उगाळत राहतात. त्यात आपल्याला वाघांच्या हल्ल्यांची किंवा पावसाची वर्णनं सापडणारच. पाऊस किंवा पूर नसेल, तेव्हा सुंदरबन क्वचितच चर्चेत असतं,’’ ते सांगतात. “माध्यमांचा आवडता मसाला म्हणजे- आपत्ती, वन्यजीव आणि पर्यटन.’’









