तीन बोटं, ओलं कापड आणि हलका हात. “फार नाजूकपणे करावं लागतं.”
विजया पूतरेकुबद्दल बोलतीये. आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशातली ही एक खास मिठाई. तांदळाच्या ओल्या पिठाचे अगदी पारदर्शक कागद तयार करून त्यामध्ये सुका मेवा, गूळ आणि तूप भरायचं. सण-समारंभ असतील तेव्हा हा अगदी आवडीने खाल्ला जाणारा गोडाचा पदार्थ आहे. ही मिठाई करण्यात सराईत असलेली विजया दररोज २०० रेकु तयार करते आणि गावातले मिठाईचे दुकानदार तिच्याकडून ते घेऊन जातात. “पूतरेकु तयार करताना सगळं लक्ष एकवटून काम करावं लागतं. दुसऱ्यांशी बोलता येत नाही,” ती पारीला सांगते.
“आमच्या घरी कुठलाही सणसमारंभ असू दे, पूतरेकुलु पाहिजेच,” जी. रामकृष्णा सांगतात. ते अत्रेयपुरमचे रहिवासी असून इथल्या काही दुकानांना पॅकिंसाठी लागणारा कच्चा माल आणि खोकी इत्यादी मिळवून देण्यात मदत करतात. “मला ही मिठाई खरंच आवडते. कारण यात जरा गंमत आहे. पाहिल्यावर वाटतं कागदच खाणार आपण. पण पहिला घास घ्या आणि चक्क जिभेवर विरघळून जातं. अख्ख्या जगात अशी मिठाई तुम्हाला शोधून सापडणार नाही,” असं सांगताना त्यांच्या आवाजातला अभिमान लपत नाही.
या मिठाईसाठी लागणारा तांदूळ खास असतो. डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात पिकवला जाणारा हा तांदूळ या मिठाईची जान आहे. “हा भात एकदम चिकट असतो. त्यामुळे याचा फक्त रेकुच बनतो,” ही मिठाई तयार करणाऱ्या कायेला विजया कोटा सत्यवती सांगतात. रामचंद्रपुरम तालुक्यातल्या अत्रेयपुरमच्या त्या रहिवासी आहेत. मागच्या वर्षी याच अत्रेयपुरम पूतरेकूला भौगिलिक चिन्हांकन म्हणजेच जीआय टॅग मिळाला. १४ जून २०२३ रोजी विशाखापटणमच्या श्री आर्थर कॉटन अत्रेयपुरम पुतरेकुला मॅन्युफॅक्चरर्स वेलफेअर असोसिएशनला हा जीआय टॅग बहाल करण्यात आला.
आंध्र प्रदेशात आजवर तीन खाद्यपदार्थांना असा जीआय टॅग मिळाला आहे. इतर दोन मानकरी आहेत तिरुपती लड्डू आणि बांदर लड्डू. राज्यातल्या एकूण २१ वस्तूंना आजवर असं चिन्हांकन मिळालेलं आहे. यामध्ये हस्तकला, खाद्यपदार्थ, शेतीतल्या आणि इतरही काही वस्तूंचा समावेश आहे. गेल्या वर्षी आंध्रच्या पूतरेकुसोबत गोव्याच्या बेबिंकाला हा मान मिळाला. आणि या आधी मोरेनाचा गजक आणि मुझफ्फरनगरच्या गुळानेही जीआय टॅग मिळवला आहे.




















