नावः वजेसिंग पारगी. जन्मः १९६३. गावः इटावा. जिल्हाः दाहोद, गुजरात. पंचमहाली भिल आदिवासी. कुटुंबातील सदस्यः वडील चिस्का भाई, आई चतुरा बेन. पाच भावंडांमधले वजेसिंग सगळ्यात थोरले. कुटुंबाचा व्यवसायः शेतजमुरी
एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्माला आल्यावर वारशाने काय मिळालं? वजेसिंग यांच्या स्वतःच्या शब्दात, ‘आईच्या पोटातला अंधार.’ ‘ वाळवंटाइतकं अथांग एकटेपण’. ‘विहीरभर घाम.’ आणि ‘भूक’, ‘दुःखाची निळाई’ आणि ‘काजव्यांचा उजेड’. शब्दांवरची मायाही जन्मतःच मिळालेली.
कधी तरी, त्यांच्या तरुणपणी कुठलं तरी भांडण लागलं होतं, आणि त्यांच्या नकळत बंदुकीची गोळी त्यांचा जबडा आणि मानेतून पार झाली. जखम झाली त्यात त्यांच्या आवाजावर परिणाम झाला. सात वर्षं उपचार, १४ वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि कर्जाचा डोंगर झाल्यानंतरही ते त्यातून पूर्ण बरे झालेच नाहीत. मुखर नसलेल्या एका समाजात जन्माला आलेल्या या तरुणाकडे स्वतःचा आवाज होता पण तोही क्षीण झाला. पण त्यांची नजर मात्र अगदी तीक्ष्ण राहिली, कायम. गुजराती साहित्यातली सर्वात उत्तम मुद्रितशोधन करणारी व्यक्ती म्हणजे वजेसिंग पारगी. त्यांच्या स्वतःच्या लिखाणाला मात्र आवश्यक ती थाप मिळाली नाही.
पंचमहाली भिली भाषेत आणि गुजराती लिपीमध्ये लिहिलेल्या या कवितेत त्यांच्या मनातलं द्वंद्व ते मांडतात.


