“तुम्ही प्रकाशात जन्माला आलायत आणि आम्ही अंधारात,” नंदराम जामुनकर म्हणतात. अमरावती जिल्ह्यातल्या खडीमाळ गावात आपल्या मातीच्या घराबाहेर ते बसलेले होते. २६ एप्रिल रोजी इथे लोकसभेचं मतदान होणार होतं. आणि ते बोलतायत तो अंधार खराखुरा आहे. महाराष्ट्राच्या या गावात आजवर कधीही वीजच आलेली नाही.

“दर पाच वर्षांनी कुणी तरी येतं आणि वीज येईल असा शब्द देऊन जातं. अहो विजेचं सोडा, सांगणारी माणसं सुद्धा परत येत नाहीत,” ४८ वर्षीय नंदराम म्हणतात. इथल्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत त्या अमरावती मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत.

चिखलदरा तालुक्यातल्या १९८ उंबरा असलेल्या या गावात पोटापाण्यासाठी बहुतेकांची भिस्त मनरेगावर आहे. काही जणांची थोडी फार शेती आहे तीही कोरडवाहू. त्यात मका घेतली जाते. खडीमाळचे बहुतेक रहिवासी आदिवासी असून इथे नळाला पाणी आणि वीज काय असते हे फारसं कुणाला माहितही नाही. नंदराम कोरकू आहेत आणि ते कोरकू भाषा बोलतात. २०१९ साली आदिवासी विभागाने लुप्त होणाऱ्या भाषांमध्ये तिचा समावेश केला आहे.

‘एकाही राजकारण्याला गावात येऊ देणार नाही. खूप वर्षं त्यांनी आम्हाला वेडं बनवलंय. बास झालं’

“गेली ५० वर्षं आम्ही काही तरी बदल होईल म्हणून मत देतोय. पण सगळ्यांनी आम्हाला वेड्यात काढलंय,” दिनेश बेलकर म्हणतात. ते नंदराम यांच्या शेजारी बसून त्यांची समजूत काढतात. त्यांनी आपल्या मुलाला १०० किलोमीटर लांब एका निवासी शाळेत शिक्षणासाठी पाठवलंय. गावात एक प्राथमिक शाळा आहे पण पक्के रस्ते नाही, प्रवासाची साधनं नाहीत आणि शिक्षकसुद्धा नियमितपणे येत नाहीत. “ते आठवड्यातून दोनदा येतात,” ३५ वर्षीय दिनेश म्हणतो.

“किती तरी जण इथे येतात. बस सुरू करू वगैरे शब्द देतात,” राहुल सांगतो. “निवडणुका झाल्या की सगळे गायब.” २४ वर्षांचा राहुल मनरेगावर काम करतो. प्रवासाची साधनं नाहीत म्हणून त्याला त्याची काही कागदपत्रं वेळेत सादर करता आली नाहीत. “आम्ही आता शिक्षणाचं नावच टाकलंय,” तो म्हणतो.

“शिक्षण वगैरे सगळं नंतर, आधी आम्हाला पाणी पाहिजे,” हे सांगताना नंदराम यांना भरून येतं. आवाज चढतो. कित्येक वर्षांपासून मेळघाटच्या वरच्या पट्ट्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे.

PHOTO • Swara Garge ,  Prakhar Dobhal
PHOTO • Swara Garge ,  Prakhar Dobhal

डावीकडेः नंदराम जामुनकर (पिवळा टीशर्ट) आणि दिनेश बेलकर (केशरी गमछा) अमरावती जिल्ह्याच्या खडीमाळचे रहिवासी आहेत. या गावाने आजवर नळाला पाणी आणि वीज पाहिलेच नाहीयेत उजवीकडेः गावापासून १५ किलोमीटरवर एक ओढा आहे पण तोही आता आटून गेलाय. पावसाळ्यात मात्र या भागातले सगळे जलस्रोत अगदी तुडुंब भरून वाहतात. त्यामुळे रस्ते धुऊन जातात आणि पुलांची दुरुस्ती तर होतच नाही

गावकऱ्यांना दररोज पाणी भरण्यासाठी १०-१५ किलोमीटर अंतर चालत जावं लागतं आणि हे काम अर्थातच बायांचं असतं. इथल्या एकाही घरात पाण्याचा नळ नाही. इथून तीन किलोमीटरवरच्या नवलगावमध्ये पाणी पोचवण्यासाठी सरकारने पाइपलाइन टाकली होती. तिथल्या विहिरीचं पाणी पिण्यालायक नाही. “बहुतेक वेळा आम्ही अगदी गढूळ पाणी पितो,” दिनेश सांगतो.

खडीमाळच्या बायांची रोजची सकाळ तीन ते चार तास लांबवरून पाणी भरण्यात जाते. “कधी पोचतोय त्यावर सगळं आहे. तीन-चार तास रांगेत थांबून पाणी भरावं लागतं,” ३४ वर्षांची नम्या रामा धिकर सांगते. सगळ्यात जवळचा हापसा सहा किलोमीटरवर आहे. नद्या आटून गेल्यामुळे जंगली जनावरं देखील पाणी प्यायला इथेच येतायत. मेळघाटाच्या सेमाडोह व्याघ्र प्रकल्पातले वाघ आणि अस्वलंसुद्धा इथे दिसतात.

पाणी आणणं हे दिवसभरातलं केवळ पहिलं काम आहे. सकाळी आठ वाजता मनरेगाच्या कामावर जाण्याआधी नम्यासारख्या बाकी महिला घरातलं सगळं काम उरकून घेतात. दिवसभर अंगमेहनतीची कामं केल्यानंतर, बांधकामाचं अवजड साहित्य हाताने ओढून नेल्यानंतर ७ वाजता परत एकदा पाण्यासाठी पायपीट करावी लागते. “आरामच नाही. आजारी असलो तरी पाणी भरायचं, दोन जिवाची असली तरी,” नम्या म्हणते. “बाळ झाल्यावरसुद्धा दोन-तीन दिवसच आराम.”

PHOTO • Swara Garge ,  Prakhar Dobhal
PHOTO • Prakhar Dobhal

डावीकडेः मेळघाटाच्या वरच्या पट्ट्यात पाण्याचं कायमच दुर्भिक्ष्य आहे आणि दिवसातून दोनदा पाणी भरण्याचा बोजा अर्थातच बाईवर येऊन पडतो. ‘कधी पोचतोय त्यावर सगळं आहे. तीन-चार तास रांगेत थांबून पाणी भरावं लागतं,’ नम्या रामा धिकर सांगते. उजवीकडेः सगळ्यात जवळचा हापसा गावापासून सहा किलोमीटरवर आहे

PHOTO • Prakhar Dobhal
PHOTO • Swara Garge ,  Prakhar Dobhal

डावीकडेः इथले बहुतेक सगळे जण मजुरीसाठी मनरेगाच्या कामावर जातात. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आणि प्राथमिक शाळा असली तर वर्ग नियमित भरत नाहीत. उजवीकडेः नम्या रामा धिकर सांगते की बायांना कामापासून उसंतच नाही, अगदी बाळंतपणानंतरही

या वर्षी निवडणुका आल्या त्याबद्दल विषय निघताच नम्या म्हणते, “गावात नळ येत नाही तोपर्यंत मी मतच देणार नाही.”

गावातल्या सगळ्यांचं असंच काहीसं म्हणणं आहे.

“गावात रस्ता, वीज आणि पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही मत देणार नाही,” खडीमाळचे माजी सरपंच, सत्तरीचे बबनू जामुनकर म्हणतात. “एकाही राजकारण्याला गावात येऊ देणार नाही. खूप वर्षं त्यांनी आम्हाला वेडं बनवलंय. बास झालं.”

Student Reporter : Swara Garge

स्वरा गर्गे एसआयएमसी, पुणे येथे एमएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून ती २०२३ साली पारीमध्ये इंटर्न होती. गावाकडच्या गोष्टी, संस्कृती आणि अर्थकारणामध्ये तिला रस असून दृश्यांमधून आपला विषय मांडण्याची तिला आवड आहे.

यांचे इतर लिखाण Swara Garge
Student Reporter : Prakhar Dobhal

प्रखर दोभाल एसआयएमसी, पुणे येथे एमए करत आहे. प्रखरला छायाचित्रण आणि बोधपट तयार करण्याची आवड असून ग्रामीण भागातील समस्या, राजकारण आणि संस्कृती या विषयांमध्ये त्याला रस आहे. तो २०२३ साली पारीसोबत इंटर्न म्हणून काम करत होता.

यांचे इतर लिखाण Prakhar Dobhal
Editor : Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

यांचे इतर लिखाण Sarbajaya Bhattacharya
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे