घणाच्या घावाचा नाद मोहनलाल लोहारांच्या कानात कायम रुंजी घालत आला आहे. त्यांना आठवतंय, अगदी तेव्हापासून. अगदी तालात पडणारे ठोके आयुष्यभर आपल्या सोबत असणार आहेत हे त्यांना लहानपणीच समजलं होतं.
राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातल्या नंद गावी एका लोहार कुटुंबात मोहनलाल यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी आपले वडील भवराराम लोहार यांना मदत करायला सुरुवात केली. हातोडी आणि इतर लागतील ती अवजारं त्यांना द्यायचं काम असायचं. “मी शाळा पाहिलीच नाहीये. ही हत्यारंच माझी खेळणी होती,” ते सांगतात.
गडुलिया लोहार समाजाचे मोहनलाल मारवाडी आणि हिंदी बोलतात. राजस्थानात त्यांची नोंद इतर मागासवर्गीय प्रवर्गात केली जाते. १९७० च्या दशकात, अधिकच्या कामाच्या शोधात किशोरवयातले मोहनलाल जैसलमेरला आले. आणि तेव्हापासून त्यांनी हरतऱ्हेच्या धातूपासून मोरचांग बनवले आहेत. अल्युमिनियम, चांदी, स्टील आणि अगदी पितळसुद्धा.
“लोहाला नुसता स्पर्श केल्या केल्या कळतं की हे चांगलं वाजणार का नाही ते,” मोहनलाल सांगतात. जैसलमेरच्या वाळवंटात दूरवर वाजणारं मोरचांग हे वाद्य बनवण्यात आजवर त्यांनी २०,००० तास हातोड्याचे घण घातले आहेत.
“मोरचांग बनवणं अवघड असतं,” ६५ वर्षीय मोहनलाल सांगतात. आजवर आपण या वाद्याचे किती नग बनवलेत याची मोजदाद करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. “गिनती से बाहर है वो.”
मोरचांग १० इंचाचं असतं. शंकराच्या पिंडीसारखा थोडाफार याचा आकार असतो. दोन्ही टोकांच्या मधोमध एक धातूची ‘जीभ’ असते. एका बाजूला पक्की बसवलेली ही जीभ वादक समोर दातात धरतो आणि त्यात हवा फुंकतो. एका हाताच्या बोटाने जिभेचं टोक तारेसारखं वाजवत त्यातून वेगवेगळे स्वर काढले जातात. दुसऱ्या हाताने मोरचांगची दोन्ही टोकं घट्ट धरून ठेवली जातात.












