“तुम्ही कसली माहिती गोळा करायला आलाय का?” मी जवळ जाताच त्याने प्रश्न केला.
“नाही”, मी उत्तरले. मी कुपोषणाच्या घटनांवर वार्तांकन करण्यासाठी आले असल्याचं मी त्याला सांगितलं.
आम्ही महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात होतो. या तालुक्यातली ५,२२१ बालकांमध्ये गंभीर कुपोषण असल्याचं आढळून आलं होतं. एकात्मिक बाल विकास विभागाच्या अहवालानुसार राज्यात हा जिल्हा कुपोषणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरापासून आम्ही केवळ १५७ किलोमीटर अंतरावर होतो. मात्र, इथला हिरवागार परिसर आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो.
रोहिदास हा क ठाकूर या अनुसूचित जमातीचा तरुण. पालघर जिल्ह्यात जवळपास ३८ टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. गुरं राखण्याचं काम करणाऱ्या या तरुणाला त्याचं नेमकं वय सांगता आलं नाही. परंतु, तो विशीतला असावा असा अंदाज मी बांधला. एका खांद्यावर छत्री टांगून, गळ्याभोवती सुती पंचा गुंडाळून आणि एका हातात लाकडी काठी घेऊन हा तरुण गुरं राखण्यासाठी रानात चालला होता. त्याच्या दोन म्हशी रानातल्या गवतावर ताव मारत होत्या. रोहिदास म्हणाला, “पावसाळ्याच्या दिवसातच गुरांना पोटभरचारा मिळतो. उन्हाळ्यात दूरदूरपर्यंत [चाऱ्याच्या शोधात] फिरावं लागतं.”






